स्पेशल रिपोर्ट

प्रतापगडला साकारलंय शिवकालीन खेडं!

ब्युरो रिपोर्ट, महाबळेश्वर
महाबळेश्वरला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात. जावळीच्या खोऱ्यातील या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. किल्ले प्रतापगडाला भेट दिल्याशिवाय महाबळेश्वर दर्शन पूर्णच होत नाही.  प्रतापगड पाहताना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा डोळ्यासमोर उभी राहते आणि ऊर अभिमानानं भरून येतो. याच ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याला आता भर पडलीय ती शिवकालीन खेड्याची. शिवकाळातील गावगाडा कसा होता, याचं हुबेहूब दर्शन इथं घडतं. त्यामुळं प्रतापगडाची सफर करताना या शिवकालीन खेड्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी.
 

Khede 1.pngप्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या खेड्यात शिवकालीन माणसं, त्यांचं जीवन, राहणीमान, घरं, त्यावेळी केले जाणारे विविध व्यवसाय, या व्यवसायांशी निगडित समाजातील विविध जाती-जमातींचं नियोजन अनुभवायला मिळतं. हा शिवकालीन गावगाडा साकारलाय चंद्रकांत उतेकर या शिवप्रेमीनं. आजच्या आधुनिक पिढीला शिवकालीन जीवन कसं होतं, हे अवगत व्हावं, यासाठी याची निर्मिती केलीय, असं उतेकर यांनी सांगितलं. खुली अर्थव्यवस्था आणि वाढतं शहरीकरण यामुळं गावगाडा लोप पावलाय. बारा बलुतेदार पद्धती संपुष्टात आली. गाव आता पहिल्यासारखा राहिला नाही, असं गाणं प्रत्येक पिढी गात असते. तर शहरात स्थायिक झालेला गावकरी अधीमधी गड्या आपला गाव बरा... असं म्हणत असतो. या पार्श्वभूमीवर या शिवकालीन खेड्याची सफर घडत असेल तर कुणाला आवडणार नाही? तिही शिवशाहीचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडासारख्या किल्ल्याच्या पायथ्याशी.

 

Khede 18.pngबलुतेदार पध्दतीची पार्श्वभूमी
भारतातील गावागावात पूर्वी बारा बलुतेदारी पद्धत होती. गावगाड्याचं आणि देशाचं अख्खं अर्थकारण या बलुतेदारी पद्धतीभोवती फिरत होतं. त्यामुळं गावं स्वयंपूर्ण होती. सुखी, समाधानी होती. खेड्यांत राहणाऱ्या बिगर शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेनं चालत आल्यामुळं त्याला कुलपरंपरागत हक्काचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळंच हे व्यवसाय आणि त्यानुसार त्यांना मिळणारा मोबदला हे प्रत्येक व्यावसायिकाचं वतनी हक्क ठरले. हेच वतनी हक्क ‘बलुतं’ नावानं ओळखले जात. शेतकऱ्‍यांबरोबरच्या इतर लोकांच्या या परस्परसंबंधांना उत्तरेत जजमानी (यजमानी) पद्धत आणि महाराष्ट्रात ‘बलुतेदारी’ म्हटलं जातं. शेतकऱ्‍यांची अधिक महत्त्वाची कामं करणारे, त्यांच्या नित्याच्या गरजा भागवणारे हे ते बलुतेदार. सामान्यपणे पाटील, कुलकर्णी सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने ‘बारा बलुतेदार’ म्हणून प्रसिद्ध होते.

 

Khede 2.pngअसं आहे शिवकालीन खेडं

शहरातील मुलांना 'खेडेगाव म्हणजे काय असतं हे कळावं' यासाठी चंद्रकात उतेकर यांनी हे संपूर्णपणं तत्कालीन खे़डं वसवलंय! या खेड्यामध्ये उतेकरांनी अगदी हुबेहूब वाटणारं तत्कालीन समाजजीवन चितारलंय आणि तेसुध्दा बारा बलुतेदार पध्दतीनं. या शिवकालीन खेड्यात प्रवेश करतानाच प्रवेशव्दाराजवळ उभ्या असलेल्या द्वारपालाची मूर्ती आपल्या स्वागतासाठीच उभी आहे, असं भासतं. प्रवेशव्दारातून आत प्रवेश करताच कुडाची घरं आपलं लक्ष वेधून घेतात. उतेकरांनी साकारलेल्या गावामधील एका घरात वहाणांच्या पसाऱ्यात आपल्या कामात पूर्णपणे गुंतून गेलेला चांभार चप्पल बनवताना दिसतो. ही चांभाराची मूर्ती पाहिल्यास ती मूर्ती नसून तो खराखुराच हाडामांसाचा माणूस असल्याचा भास होतो. दुसऱ्या घरामध्ये चाकावर मातीला आकार देणारा कुंभारही मडकी बनवण्यात मग्न असल्याचं दिसून येतं. समोरच असलेल्या मचाणावर उभं राहून शेतातील पक्ष्यांना उडवणारा शेतकरी पाहिला की गावाकडची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

 

Khede 4.pngमाणसं आणि प्राणीही...
पूर्वी गावांमध्ये मनुष्याइतकंच प्राण्यांनाही महत्त्व होतं. हत्ती, मेंढरं, गाय, म्हैस, बैल, कुत्रा, बकरी, घोडा यांसारखे प्राणी म्हणजे कुटुंबाचे सदस्य. त्यावेळी या प्राण्यांच्या मदतीनं अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवायचे. हातात काठी आणि खांद्यावर घोंगडं घेतलेला धनगर आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या मेंढ्या, कुत्रा पाहून मनात आपसूकच धनगरवाडीची आठवण येऊन जाते. जवळच काही अंतरावरील गोठ्यातील गाय आणि वासरू यांच्या सुंदर प्रतिमा नकळत आपलं लक्ष खेचून घेतात. तर विहिरीवरून कावडीनं पाणी वाहून आणणारा माणूससुद्धा खराखुरा असल्याचा भास होतो.

 

Khede 5.pngशेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणंच त्याची बायकोही घरात अनेक कामात व्यस्त असते. मग तो स्वयंपाक असो, जात्यावरचं दळण असो अथवा विहिरीवर पाणी भरणं असो, अशी हजार छोटी-मोठी कामं स्त्री करत असते. याचीच प्रचीती आपल्याला तेथील एका घरात जात्यावर धान्य दळणाऱ्या महिलेला पाहून येते. या स्त्रीची प्रतिमा इतकी रेखीव आहे की, जणू आपल्याला त्या जात्यावरील ओवी ऐकल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. तर जवळच असलेल्या दुसऱ्या घरात आपल्या कुटुंबासाठी भाकरी थापण्यात मग्न झालेली महिला आणि तिच्या बाजूलाच चुलीजवळ असलेली मांजर आपल्या कायम स्मरणात राहते. विहिरीवर रहाटानं पाणी भरणारी महिला, तसंच जवळच असलेली तिची चिमुकली यांच्या प्रतिमाही लक्षात राहण्यासारख्या आहेत.

 

Khede 16.pngनवीन पिढीला माहिती व्हावी
ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधारभूत असलेली बारा बलुतेदारीची पद्धत आता हद्दपार झालीय. आपापल्या वाढत्या गरजा आणि अपेक्षा भागवण्याकरता सर्वांनाच शहराकडं धाव घ्यावी लागते. याच कारणांमुळं खेड्यातील पूर्वीचं परस्परावलंबन कमी होत चाललं आहे. पैशाच्या विनिमय-माध्यमामुळंही या पध्दतीवर बराच परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. इथं येणाऱ्या पर्यटकांना या खेड्याच्या माध्यमातून जुनी जीवनपध्दती कशी होती, हे समजावं, याच उद्देशानं हे शिवकालीन खेड वसवलंय, असं उतेकर यांनी सांगितलं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.