आंबा, फणस पिकवणाऱ्या कोकणात आता विदेशी भाज्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढतंय. पारंपरिक पिकांसोबत इथला शेतकरी आपल्या लाल सुपीक मातीत विदेशी भाज्या पिकवू लागलाय. येळणे गावच्या महेश केळकर यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या रंगबेरंगी शिमला मिरची आणि लाल कोबीची मुंबई, पुण्याच्या मार्केटमध्ये निर्यात तर होतेच आहे. शिवाय त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्शही ठेवलाय.
सुपीक मातीत बॉम्बी आणि ऑरबिल
बॉम्बी आणि ऑरबिल या रंगीत भोपळी मिरचीची जात मूळची हॉलंडची. लाल आणि पिवळ्या रंगाच्या या शिमला मिरच्या इथं पिकवण्यात आल्या. या जातीला कोकणातलं वातावरण अत्यंत पोषक आहे. इथली माती सुपीक असून पीएचही सहा ते साडेसहापर्यंत आहे. एका एकरात फ्ल़ड सिंचन केल्यावर एक टन बॉम्बी आणि ऑरबिलचं उत्पादन मिळतं. शेतकऱ्यांनी जर ठिबक सिंचनानं पाणीपुरवठा केला, तर पाण्याचीही बचत होईल आणि उत्पन्नही वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. मिरचीच्या या दोन्ही जातींना पुण्याच्या मार्केटमध्ये प्रती किलो १५-४० रुपये दर सहज मिळतोय. बॉम्बी आणि ऑरबिलबरोबरच भावनगरी मिरची म्हणून प्रसिद्ध असणारी पिकॅडोची लागवड महेश केळकर यांनी केलीय. पिकॅडोचं एका एकरमध्ये ९ टनाच्या आसपास उत्पादन घेता येऊ शकतं. पिकॅडोला मुंबई, पुण्याबरोबर स्थानिक बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. भावनगरी अर्थात पिकॅडो मिरचीची प्रती किलो १५–२५ रुपयानं विक्री होतेय.
रोगावर संशोधन होण्याची आवश्यकता
माती चांगली म्हटल्यावर पिकांना मातीतून होणारे रोग होत नाहीत. मात्र पिकॅडो मिरचीला कीटकांनी प्रचंड हैराण केलं, अशी माहिती केळकरांनी दिली. फ्रूट बोअर कीटकांमुळं सर्वाधिक नुकसान झालं. कोकणच्या येळणे, केळशी या पट्ट्यात हेलिकोवर्ता, हेलिओथीस आर्मीजेरा, स्पोडोपटेरा या कीटकांच्या जातींचा त्रास जाणवतो. त्यासाठी केळकरांनी सापळाही लावला, पण त्यात या कीटकांना कैद करण्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळं यावर संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी सांगितलं. बॉम्बी, ऑरबिल आणि पिकॅडोचं फ्रूट बोअररनं तीन टनापर्यंत नुकसान केलं. कोकण कृषी विद्यापीठानं यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना कीटकांच्या प्रादुर्भावापासून मुक्त केलं पाहिजे, अशी विनंती केळकर यांनी केली.
आकर्षक रेड कॅबेज आणि ब्रोकोली
कोकणात विदेशी मिरचीबरोबरच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सॅलडसाठी मागणी असणाऱ्या रेड कॅबेज अर्थात लाल कोबी आणि ब्रोकोलीची शेतीही चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. ब्रोकोली अत्यंत आकर्षक आणि त्याला हिरव्या रंगाचे गड्डे असतात. हेक्टरी ७ टनापर्यंत ब्रोकोलीचं उत्पन्न घेता येऊ शकतं. ब्रोकोलीला थंड आणि कोरडं हवामान मानवतं. त्याचबरोबर रेताड, मध्यम, काळी, निचऱ्याची जमीन त्याला पोषक ठरते. ब्रोकोलीला मुंबईत चांगली मागणी असून त्याचा दर प्रती किलो ६०-७० रुपयांपर्यंत मिळतो. रेड कॅबेजही दिसायला अत्यंत आकर्षक असते. त्याला प्रती किलो १५-२५ रुपयांपर्यंत दर मिळतो.
मार्केटमध्ये भरपूर मागणी
जी मंडळी हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्याकडून या परदेशी भाज्यांना चांगलीच मागणी मिळतेय. त्यामुळं पिकॅडो, रेड कॅबेज आणि ब्रोकोली इत्यादींच्या विक्रीला मार्केट चांगलं आहे, दरही चांगला मिळतोय. त्यामुळं 'खूप पिकवणं म्हणजेच शेती' हा शेतकऱ्यांचा एक भ्रम दूर होताना दिसतोय. कष्टाला बुद्धीची जोड दिली की नवीन संशोधनातून शेती करण्यात वैविध्य येतं. शिवाय मार्केटिंगवर भर दिला तर बाजारपेठांमध्ये मालाला अधिक मागणी मिळते हे यातून स्पष्ट होतंय. त्यामुळं आता गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची.
Comments (1)
-
तुम्ही कॅप्सिकम शेड नेट किवा पोली house मध्ये घेतले असते तर उत्पादन जास्त घेतले असते