आजची 'स्त्री' ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी काम करताना दिसते. इतकंच नव्हे, तर काही वेळा स्त्री ही पुरुषांच्याही पुढं गेलेली पाहता येते. मात्र, असं असूनही वंशाला दिवा हवा म्हणून सर्रास स्त्री-भ्रूणहत्या होतात. मात्र, औरंगाबादच्या बजाजनगरमधील अपर्णा चेंबरोलू हिनं, परंपरेचा बडेजाव मिरवणाऱ्या लोकांपुढं आपल्या कृतीनं एक आदर्शच घालून दिलाय. कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारी तसंच स्वत:च्या पायावर उभं राहून शिक्षण घेणारी अपर्णा आज तिच्या कुटुंबाचा आधार झालीय, आई-वडिलांचा जणू ती मुलगाच आहे.
घरच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव
आंध्र प्रदेशहून अपर्णाचे वडील व्यंकेश्वर चेंबरोलू आणि त्यांचं कुटुंब हे रोजगारासाठी औरंगाबादमध्ये आलं. वाळूज भागातील कॉटन ग्रीव्ह्ज कंपनीत व्यंकेश्वर चेंबरोलू काम करतात. पत्नी अन् दोन मुली असा चेंबरोलू यांचा परिवार. त्यातील मोठी मुलगी कामेश्वरीचं लग्न झालंय. त्यानंतर त्यांनी स्वतःचं घर घेतलं. यामुळं कुटुंबाची जरा आर्थिक ओढाताण सुरू झाली होती. आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी रेणुका चेंबरोलू यांनी मिनरल वॉटरच्या बाटल्यांची कार्टन्स पुरवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. घरातील या परिस्थितीची अपर्णाला पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच तिनं आईच्या निर्णयाला पाठिंबा देत कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेतला.
हळूहळू झाली व्यवसायाची भरभराट
सुरुवातीला वाळूज परिसरातच चेंबरोलू यांचा व्यवसाय सुरू झाला, त्यात त्यांना थोडंफार कामंही मिळू लागलं. मात्र व्यवसाय वाढवायचा असेल तर कमी वेळात अधिक माल कसा पोहोचवता येईल, असा विचार सुरू झाला आणि त्यातूनच त्यांनी कर्जावर टाटा एस (छोटा हत्ती) ही मालवाहू गाडी घेतली. विशेष म्हणजे, मुलगी असूनही मालवाहू गाडी चालवायची कशी? असा विचार अपर्णानं न करता, ती मोठ्या हिमतीनं छोटा हत्ती चालवायला शिकली आणि त्यातूनच आज तिच्या आईनं सुरू केलेल्या व्यवसायाला भरभराट प्राप्त करून दिली. आज तिचा व्यवसाय वाळूज एमआयडीसीपुरता मर्यादित न राहता औरंगाबाद शहर, दौलताबाद, खुल्ताबादपर्यंत पसरलेला आहे.
आई-वडिलांना अपर्णाचा सार्थ अभिमान
चेंबरोलू कुटुंबात दोन्ही मुलीच आहेत, एकीचं लग्न झाल्यावर दुसरी मुलगी म्हणजे अपर्णा हिनं आपली जबाबदारी ओळखून कुटुंबाला मुलाप्रमाणंच आधार देण्याचं धाडस दाखवलं. मुलासारखंच काम करत असताना सुरुवातीला या कुटुंबावर अनेक जणांनी टीकाही केली. मात्र आपल्या कामाच्या जोरावर हिमतीनं आपला व्यवसाय फुलवत अपर्णानं टीकाकारांची तोंडं बंद केली. आज हेच टीकाकार तिची प्रशंसा करताना दिसतात.
व्यवसायाबरोबर कॉम्प्युटर सायन्सचाही अभ्यास
हा व्यवसाय करत असताना अपर्णानं आपलं शिक्षणही व्यवस्थितपणं सांभाळलं. अपर्णा सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७ नंतर कार्टन्स पोहोचवण्याचं काम करते आणि मधल्या वेळेत कॉलेज असा तिचा दिनक्रम असतो. सुट्टीच्या दिवशी ती पूर्णवेळ काम करते. काम करत असताना शिक्षणातही तिनं खंड पडू दिला नाही, सध्या ती देवगिरी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिकतेय. अभ्यासासाठी तिला तिच्या मित्रांची मोलाची मदत होत असल्याचं अपर्णा आवर्जून सांगते. तिच्या या कामामुळं तिच्या मित्रांनाही तिचा आभिमान आणि कौतुक वाटतं. तिची शिकण्याची जिद्द पाहून देवगिरी कॉलेजनंही तिला शैक्षणिक पुस्तकं मोफत पुरवली आहेत. अशा या कुटुंबाचा आधार बनलेल्या मुलीचा पालकांना सार्थ अभिमान वाटणं साहजिक आहे.
मुलगा-मुलगी हा भेदभाव नाही
व्यंकेश्वर आणि रेणुका चेंबरोलू यांना आपल्याला मुलाची कमतरता आहे, असं कधीच वाटलं नाही. आणि त्यांनी आपल्या मुलींनाही तसं जाणवू दिलं नाही, म्हणूनच अपर्णानं घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी तिचे आई-वडील दोघंही ठाम उभे राहिले. अपर्णासोबत तिची आई आणि तिचे मामा तिला अनेकदा सोबतीला असतात. त्यांनाही मुलीनं काही वेगळं करून दाखवावं, असं वाटत होतं, आणि आज अपर्णा त्यांच्या विश्वासाला खरी उतरलेली पाहता येतेय.
मुलगाच हवा हा अट्टहास कशाला?
मुलाएवढाचं आधार जर मुली देत असतील तर मग मुलगाच हवा हा अट्टहास का? समाजात आजही अनेक वृद्धाश्रम आहेत, त्यातही दिवसांगणिक वाढ होत आहे. वृद्धाश्रमातील अनेक दाम्पत्यांना, वृद्धांना त्यांच्याच तथाकथित वंशाच्या दिव्यानं अथवा मुलानं या वृद्धाश्रमाची वाट दाखवली आहे. आजही अपर्णासारख्या अनेक मुली आपल्या कुटुंबाचा आधारवड झालेल्या पाहता येतात. मग मुलगी-मुलगा हा भेदभाव कुठे उरतो. अपर्णाच्या कर्तृत्वानं स्त्री-भ्रूणहत्या करणाऱ्या लोकांपुढे एक आदर्शच घालून दिला.
अॅटिट्यूडला पर्याय नाही
मुळातच महिला या सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक असतात. त्या घरकाम, बाहेरील काम इत्यादी सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज करत असतात, घरातल्या मंडळींना अनेक चांगल्या गोष्टी त्या पटवून देतात, म्हणजेच त्यांच्याकडे चांगली सेल्समनशीपसुध्दा असते. गरज असते ती ऊर्जेची आणि घरातून मिळणाऱ्या पाठिंब्याची. हे मिळालं की उद्योगक्षेत्रात यशस्वी होणं अवघड नसतं आणि अशाच य़शस्वी झालेल्या अपर्णा्च्या या अॅटिट्यूडला 'भारत4इंडिया'चा सलाम...
Comments (5)
-
-
-
शाब्बास अपर्णा ! महिला न डगमगता हिमतीने परिस्थितीवर मत करू शकतात, हेच सिद्ध केलंय तिनं. महिलांना संधी तर देवून बघा त्या त्याचं सोनंच करतील.
-
-