स्पेशल रिपोर्ट

मानसीचा चित्रकार तो...!

राहुल रणसुभे, मुंबई
कुठल्याही राष्ट्राचा इतिहास कलेतूनच अधिक स्पष्टपणं जाणून घेता येतो. महाराष्ट्राला चित्रकलेचा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. या विस्तीर्ण कालखंडात वेळोवेळी झालेल्या स्थित्यंतरांमुळं त्यात बदल होत गेले. या सर्व कालखंडात मऱ्हाटी मातीतील चित्रकारांनी आपापल्या परीनं चित्रकलेला वेगळं परिमाण देऊन ती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. अलीकडचे एम. एफ. हुसेन यांच्यापासून ते वासुदेव कामतांसारखे ख्यातकीर्त चित्रकार याच कडीतील. सरकारपासून समाजापर्यंत सर्वच जण चित्रकलेबाबत उदासीन असतानाही वासुदेव कामतांसारखे कलाकार जे प्रयत्न करतायत त्यातून भविष्यात मऱ्हाटी मातीतील चित्रकलेचा कॅनव्हास जगाच्या पाठीवर बहरेल, अशी आशा करायला जागा आहे.
 

 

Kamat 26भारत आणि चित्रकलेचा संबंध
शिल्पकला, संगीत, नृत्य, साहित्य, चित्रकला यांमधून त्या त्या ठिकाणच्या जीवनशैलीचा अभ्यास करता येतो. इतिहासात पाहायला गेलं तर, भीमबेटकातील चित्रं, अजिंठा, वेरूळ लेणी, अनेक ऐतिहासिक मंदिरं यांपासून चालत आलेली ही परंपरा आजतागायत कायम आहे. याचं उदाहरण म्हणजे मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेचं भारतीय कला इतिहासात महत्त्वाचं योगदान आहे. १८५७ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत भारताला अनेक जागतिक दर्जेचे कलाकार दिले आहेत. वासुदेव कामत त्यापैकीच एक. लॅण्डस्केप्स, पोर्ट्रेट्स, स्टिल लाईफ यांसारखे सगळे विषय कामत यांनी हाताळले असून त्यांना सुचलेल्या कल्पनांच्या आधारावरही त्यांनी चित्रं काढली आहेत. तसंच पौराणिक विषयांचा अभ्यास करून ते विषय वास्तववादी शैलीमध्ये चितारण्याचा प्रयत्नही त्यांनी केलाय. या चित्रांना ते बोधचित्र असं म्हणतात. पोर्ट्रेट्स या विषयात त्यांची हुकुमत असून त्यासाठी त्यांना अनेक सन्मान देऊन गौरवण्यातही आलंय. 'माय वाईफ' या पोर्ट्रेटसाठी त्यांना २००६ मध्ये मानाचा समजला जाणारा 'द पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका' या संस्थेचा 'ड्रेपर ग्रॅण्ड' पुरस्कार मिळालाय. 1977 पासून त्यांच्याकडे पुरस्कारांची मालिका सुरू झाली ती आजपर्यंत. भारतातील चित्रकलेला वाहिलेल्या अनेक नामांकित संस्थांनी त्यांचा विविध पुरस्कार देऊन गौरव केलाय. जहाँगिर आर्ट गॅलरीसह देशभरातील सर्व महत्त्वाच्या गॅलरींमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं झालीत आणि त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या चित्रांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमतही मिळतेय. त्यांच्याशी साधलेला संवाद.

 

Kamat 9कोणतीही कला बहरण्यासाठी सौंदर्यवादी दृष्टिकोन आवश्यक असतो. भारतात, महाराष्ट्रात तो कितपत जाणवतो?
कामत : भारतात पूर्वी सौंदर्यवादी दृष्टिकोन होता. परंतु तो आज आपण पूर्णपणे घालवलाय. आज आपण इतर कलांच्या जितक्या जवळ गेलोय तितकंसं चित्रकला आणि शिल्पकलेच्या जवळ जाऊ शकलो नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात या कलांबाबतची दरी थोडी जास्तच आहे. भारतीय नागरिक घरासाठी टाईल्स, फर्निचर, सुशोभीकरणाच्या वस्तू यांवर खर्च करायला तयार असतो, परंतु काही हजार किमतीचं एखादं चांगलं चित्र आपल्या घरात असावं, असं त्याला सहसा वाटत नाही. आपल्या इथं सर्व गोष्टींना उपयोगितेच्या माध्यमातून बघितलं जातं. त्यामुळं लोक चित्रांकडं पाठ फिरवताना दिसतात. याचा अर्थ लोकांना सौंदर्याची जाण नाही, असं नाही. परंतु त्या सौंदर्य जाणीवेला दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी कोणीही तयार नाही. पूर्वी घराच्या भिंतीवर आढळणाऱ्या कॅलेंडरवर अनेक कलाकारांची, निसर्गाची, देव-देवतांची चित्रं असायची. ही कॅलेंडर आज असली तरी त्यावरील चित्रं हरवलीत. 'शिवराय जन्मावा पण शेजारच्या घरात' अशा उक्तीप्रमाणं आपल्या घरात चित्रकार व्हावा, असं सहसा कोणाला वाटतच नाही. मुलगा अभ्यासाशिवाय चित्रकला, अथवा खेळांमध्ये रमलेला दिसला की, त्याला दामटून अभ्यासाला बसवलं जातं. त्याच्या खेळापासून, चित्रकलेपासून त्याला दूर करण्यात येतं. त्यामुळं कला ज्याप्रमाणात भिनायला पाहिजे तेवढी भिनली नाही. परिणामी पूर्वी भारतात ज्याप्रमाणात वास्तू उभारल्या गेल्यात तशा आज आपण उभारू शकलो नाही. सध्या जगभरात भारताचं जे काही नाव घेतलं जातं ते याच शेकडो वर्षांपूर्वीच्या कलाकृतींसाठीच. याच कलाकृती पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक इथं भेटी द्यायला येतात. आपण केलेल्या एकाही कलाकृतीला आज जागतिक बाजारपेठेत फारशी किंमत मिळताना दिसत नाही. आजही आपण अनेक नैसर्गिक, पौराणिक स्थळांना भेटी देतो, परंतु एखाद्या चित्रप्रदर्शनाला किती जण भेट देतात? किती जण आर्ट गॅलरीत आवर्जून जातात?

 

Kamat 32चित्रकला हे करियर ऑप्शन होऊ शकतं का?
कामत : खरं तर आपण चित्रकलेला करियर ऑप्शन म्हणून पाहतो, इथंच सर्व गाडी अडते. जर उत्तम चित्रकार बनून चित्रकलेत स्वतःचं असं विशिष्ट योगदान दिलं तर तो चांगल्या प्रकारे या क्षेत्रात स्थिरावू शकतो. जपानसारख्या देशात चित्रकाराला पूर्ण वेळ कलाकार म्हणून उभं राहणं अवघड आहे. तसंच काहीसं चित्र अमेरिकेतही आहे. परंतु, भारतात असं होत नाही. इथं अनेक कलाकार, शिल्पकार फक्त कलेवरच आपली उपजीविका भागवू शकतात. आज मी माझा विचार केला तर सध्या माझ्याकडे इतकं काम आहे की, ते मी या एका जन्मात पूर्ण करू शकत नाही. प्रत्येक चित्रकारानं त्याच्या कलेत स्वतःचं असं योगदान किती आहे हे तपासलं पाहिजे. जर तसं योगदान तो चित्रकार देऊ शकला तर कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला त्याचं चित्र हवंहवंसं वाटेल. इतर कोणत्याही शिक्षणात फक्त पदवी घेतली तर त्याला त्या क्षेत्रात नोकरी मिळवणं सोप होतं. परंतु चित्रकलेत 'बाप दाखव नाही तर श्राध्द घाल' अशी परिस्थिती आहे. इथं पदवीपेक्षाही तुमच्या कामाला जास्त महत्त्व आहे. त्यामुळं या क्षेत्राकडं करियर ऑप्शन म्हणून पाहताना अगदी शालेय जीवनापासूनच विचार होणं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं अत्यावश्यक ठरतं.

 

भविष्यात चित्रकला इंडस्ट्री म्हणून उभी राहू शकेल का?

कामत : सध्या चित्रकलेमध्ये अॅनिमेशन, अप्लाईड आर्ट ही क्षेत्रं स्वतंत्रपणं इंडस्ट्री म्हणून उभी राहताहेत. परंतु चित्रकलेत कामाचा तोचतोचपणा आणि संख्यात्मक वाढ करून इंडस्ट्री निर्माण होऊ शकत नाही. चित्रकला हा विषय वैयक्तिक विकासावर आधारित आहे. प्रत्येक कलाकाराचं काम हे त्याच्या शैलीवर, त्याच्या पध्दतीवर आधारित असतं. त्यामुळं याला इंडस्ट्री म्हणता येणार नाही. परंतु, कलाकाराचा हा वैयक्तिकपणा जर जास्तच वाढला तर त्याच्या कलेत विरळता येण्याची भीती असते. सध्याच्या कलांमध्ये सामूहिक योगदानाची नितांत गरज आहे, असं मला वाटतं. आपण अनेक लेणी पाहतो. त्यातील चित्रं, शिल्प पाहतो. मंदिरं पाहतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की, हे काम एक-दोन वर्षं नव्हे तर तब्बल शतकानुशतकं चालत आलेलं आहे. अगदी तसंच योगदान या चित्रकलेतही व्हायला हवं. विविध प्रकारच्या संस्था, महाविद्यालयं, अकादमी यांनी आता एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर यात सरकारचाही वाटा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु सरकार याकडं कानाडोळा करतानाच दिसतं. महाराष्ट्र सरकारकडे सांस्कृतिक मंत्रालय असूनही त्यांचं लक्ष फक्त चित्रपट, नाट्य, संगीत, लोककला यापुरतंच मर्यादित आहे. परंतु चित्रकला, शिल्पकला या दृष्यकलांकडे सरकार उदासीन नजरेनं पाहतंय, असंच आम्हा कलाकारांचं स्पष्ट मत आहे. तरीही सरकारच्या मदतीशिवाय आम्ही कलाकारांनीच स्वतःहून पुढं यायचं ठरवलंय. किल्लारीच्या भूकंपात भूकंपग्रस्तांना बांधून दिलेल्या घरांमध्ये संस्कार भारतीच्या चित्रकारांनी आपापली चित्रं त्यांच्या भिंतीवर लावण्यासाठी दिली. जेणेकरून त्या चित्रांना पाहून ते त्यांचं दुःख क्षणभर का होईना विसरतील, हा त्यामागचा उद्देश होता. हे कलाकारांचंच सामाजिक योगदान आहे.

Kamat 38

तरीही ही चित्रं सर्वांनाच परवडतील असं नाही. परंतु, आपल्या घरातील लहान मुलानं काढलेलं चित्र जर नीट फ्रेम करून घरात लावलं तर मुलालाही आनंद होईल. तसंच घरात आलेले पाहुणेसुध्दा ते चित्र पाहून त्या मुलाचं कौतुक करतील. यामुळं घरात क्षणभरात एक आनंदाचं वातावरण तयार तर होईलच त्याचबरोबर त्या मुलालाही प्रोत्साहन मिळेल. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की, मुलांना बाजारातून आयती पुस्तकं आणून द्यायची आणि त्यांना त्यात रंग भरा म्हणून सांगायचं. मग पुढं काही दिवसांनी ती पुस्तकं कुठं जातात, हे पालकांनाही माहीत नसतं आणि त्या मुलालाही. त्या मुलाला त्याची बॅट मिळते, बॉल मिळतो, परंतु त्याच्या चित्रकलेची वही काही मिळत नाही. हेच जर असंच चालू राहिलं तर चित्रकलेच्या भविष्याबाबत बोलणं कठीण होईल.

 

brush 5महाराष्ट्रातील चित्रकला प्रशिक्षणाबद्दल काय? चांगल्या संस्था आहेत का?

कामत : तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, संपूर्ण भारतामधील इतर प्रांतांपेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त आर्टस् स्कूल आहेत. पावसाळ्यात जशा कुत्र्याच्या छत्र्या निर्माण होतात अगदी तशी आर्ट्स स्कूल निर्माण झालीत. परंतु त्यातील एकाही कॉलेजमधील विद्यार्थ्याची संख्या अजूनही पूर्ण भरलेली नाही. या महाविद्यालयात विद्यार्थी शिकत असतात, काम करत असतात, पण त्यांच्या पुढील भविष्याबाबत कोणीही कसलाच विचार करत नाही. त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणारा अभ्यासक्रमही नाही.

 

प्रत्येक विद्यार्थी, चित्रकार, कलाकार हा स्वतंत्रपणं साधना करत असतो. परंतु तो कधी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. मी माझ्यासाठी चित्र काढतो. मला समाधान मिळतं म्हणून मी केलं. परंतु कधी हे लक्षात घेत नाहीत की, चित्र फक्त त्याच्याखाली सही करेपर्यंत ते चित्रकाराचं असतं, एकदा सही केल्यानंतर ते चित्र स्वतंत्रपणं जगायला लागतं. म्हणून प्रत्येक चित्र हे कोणाला तरी दाखवण्यासाठी, भिंतीवर लावण्यासाठी अशा प्रकारचा प्रदर्शनाचा हक्क घेऊन जन्माला येतं. जर त्याचा सांभाळ केला, त्याला नीट ठेवलं तर ते कलाकारापेक्षाही दिर्घकाळ जगतं. परंतु त्याचा तशा प्रकारे सांभाळ करण्याची मानसिकता आपल्याकडे जास्त दिसून येतं नाही, ही वाईट गोष्ट आहे.

 

प्रेक्षकांनी चित्रावर प्रेम करण्यासाठी प्रथम चित्रकारानं आपल्या चित्रावर प्रेम केलं पाहिजे. त्या चित्राला व्यवस्थित ठेवणं, माऊंटिंग करणं, त्याच्यावर प्रेम करणं या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. जर कलाकार चित्र सांभाळू शकला नाही तर त्या कलाकारापर्यंत रसिक तरी कशाला येईल? तसंच कलाकारानं आपलं चित्र लोकांना समजावून सांगायला हवं. त्यांच्यापर्यंत आपलं चित्र पोहोचवायला हवं, तेव्हाच लोकांमध्ये चित्राविषयीची आवड निर्माण होईल.

 

Kamat 13कलेचे संस्कार महत्त्वाचे
आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, की आऊटडोअरला जा... स्केचिंग करा, लॅण्डस्केप करा. याचं कारणही हेच आहे. जेव्हा एखादा चित्रकार आऊटडोअरला चित्र काढण्यासाठी जातो, तेव्हा तो चित्र काढत असताना त्याच्या आजूबाजूला लोक जमायला लागतात. त्याच्या चित्राचं निरीक्षण करायला लागतात. त्यामुळं चित्रकाराला त्यांना आपल्याला कलेशी जोडून घेता येतं. कलाकार जे समोरचं दृष्य कागदावर उतरवत असतो ते पाहताना लोकांना मिळणारं प्रात्यक्षिक हे कोणत्याही कॉलेजच्या तासापेक्षा, प्रदर्शनापेक्षा जास्त प्रभावशाली असतं. हे चित्र घडताना त्या लोकांच्या मनावर कलाकार संस्कार करत असतो. इथून होणारे हे संस्कार कलाप्रदर्शनाला अत्यंत पोषक असे ठरतात. लोककलाकारांना दैवी देणगी प्राप्त असते, असं म्हणतात. ते एवढ्या विस्तृत आणि व्यापक पध्दतीनं कलाकारांकडे बघत असतात याचं भान कलाकाराला असणं आवश्यक आहे.


कलेत संस्कारवाहकता हवी
कामत : कलाकार कोण्या एका व्यक्तीचं स्केच करतो, पोर्ट्रेट करतो तेव्हा तो त्या व्यक्तीशी जोडला जातो. त्याला त्या व्यक्तीस समजून घेता येतं, तसंच आपल्या चित्राबाबतही त्याला समजून सांगता येतं. त्यामुळं ही कलेची देवाणघेवाण आवश्यक असते. मी अनेक नेत्यांची पोर्ट्रेट केली आहेत. पोर्ट्रेट काढत असतानाच्या वेळात होणाऱ्या संवादात या राजकीय लोकांपर्यंत आम्ही कलाकारांच्या व्यथा, समस्या मांडू शकतो. त्यामुळं कलाकारानं लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. चित्रात फक्त सौंदर्यचा दृष्टिकोन, मनोरंजन या गोष्टींबरोबरच संस्कार वाहकता असणं खूप महत्त्वाचं आहे. उगाचंच एखादा स्टंट करून लोकांचं मन दुखावणं, चित्रावर काळं कापड लावण्याची वेळ आणणं, यापेक्षा काही तरी चांगलं करून कलाकारानं लोकांना आनंदित करावं.

 

Kamat 6ग्रामीण भारतातील निसर्गावर आधारित चित्रं चांगल्या किंमतीला विकली जातायत...
कामत : मी भारताला भारतच म्हणतो, इंडिया हे भारताकडे बघण्याचा पाश्चात्त्य दृष्टिकोन आहे. एकेकाळी भारतात सुवर्णयुग होतं. त्यावेळीही याला भारतच म्हणत होते. परंतु आजच्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणानं भारताला इंडिया केलंय. परंतु या पाश्चात्त्य अनुकरणानं आपण आपलं स्वत्त्व गमावून बसणार असू, तर ही बाब चिंताजनकच आहे. सध्या आपल्याकडे असलेली संस्कृती, मंदिर, लेणी, राजवाडे ते आपण सर्वांनीच पाहायला हवेत. त्यातील कला समजून घ्यायला हवी. ती नीट ठेवण्याची जबाबदारीही सर्वांनीच उचलायला हवी. बाहेर देशातील पुरातन वास्तू या अत्यंत चांगल्या अवस्थेत आहेत. परंतु भारतात तसं काही दिसत नाही. आपल्याकडे या वास्तूंवर नाव लिहिण्याची अत्यंत वाईट सवय लोकांमध्ये रुजली आहे, आणि हे करत असताना त्यांना काहीच चुकीचं वाटत नाही. हैदराबादचा चार मिनार, आग्र्याचा ताजमहाल, कोल्हापूरचा राजवाडा येथील चित्रांवर शिल्पांवर लोकांनी हात पोहोचेल इथपर्यंत नावं कोरली आहेत. ज्या चित्रांच्या, शिल्पांच्या किमतीचा आपण विचारही करू शकत नाही इतक्या अमूल्य कलाकृती खराब करताना या लोकांना जराही चुकीचं वाटत नाही. हा दृष्टिकोन कुठंतरी बदलायला हवा. यासाठी सकारात्मकतेनं काम करण्याची आजच्या काळाची गरज आहे.

 

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून होणाऱ्या कलेच्या आदानप्रदानामुळं कलाक्षेत्रात बदल झालेत का?
कामत : आज इंटरनेटमुळं संपूर्ण जग जवळ आलंय, असं आपण म्हणतो. परंतु पूर्वी एखाद्या चित्राचे, पुस्तकांचे रेफरन्स मिळवायचे म्हणजे अनेक दिवस जात. तशी पुस्तकं शोधण्यासाठी वाचनालयं, फुटपाथ, रद्दी केंद्र अशा अनेक गोष्टी धुंडाळून पाहाव्या लागत. परंतु आता इंटरनेटच्या माध्यमातून मिनीटभरात आपल्याला हवे ते रेफरन्स मिळतात. यामुळं हे एक फार मोठं वरदानच म्हणावं लागेल. परंतु तरीही मी म्हणेन की, कलाकारानं फक्त शॉर्टकटच्या आधारावर राहू नये. पूर्वीपासून जे मूळ माध्यम चालत आलेलं आहे त्यात कसलाच बदल करता येत नाही. त्यामुळं प्रत्येक कलेत वैयक्तिक योगदान आणि कसरत ही महत्त्वाचीच असते. आज कुठलंही गाणं मिनीटभरात आपल्याला ऐकायला मिळत असेल, तरीही गायकासाठी रियाज काही चुकला नाही. त्याला रियाज सातत्यानं करावाच लागतो. आपल्यातील कला, कौशल्य बाहेर आणायचं असेल तर स्वयंभू प्रयत्न करावेच लागतात आणि हेच करण्याची गरज नव्या पिढीला गरज आहे. अनुकरणातून काहीही साध्य होणार नाही. परंतु नेहमी नवनिर्माणाचं ध्येय समोर ठेवून जर काम केलं तर जगासमोर एक नवा इझम, नवी कलाकृती समोर येईल. या दृष्टिकोनातून नव्या कलाकारांना विचार करावा लागेल.

 

vlcsnap-2013-04-30-19h20m25s87.png'माय वाईफ' या चित्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल काय सांगाल?
कामत : भारतात पोर्ट्रेट या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे. परंतु या पोर्ट्रेट चित्रांची परंपरा महाराष्ट्रात चांगल्या तऱ्हेनं जोपासली गेली आहे आणि थोड्याफार प्रमाणात पश्चिम बंगालमध्येही आहे. परंतु आपल्याकडे पोर्ट्रेट चित्रांबाबत अनेक गैरसमज आहेत. पोर्ट्रेट पेंटिंग ही कला नाही. यात फक्त समोर बसलेल्या व्यक्तीचा अनुकरण करतात, यासारख्या गैरसमजुती आहेत. परंतु खरं म्हटलं तर पोर्ट्रेटमध्ये समोर बसलेल्या व्यक्तीचं हुबेहूब चित्रणच नाही, तर त्याचा स्थायी भाव चितारणं, त्याचं व्यक्तिमत्त्व, शिवाय रचना, रंगसंगती, त्याचं बॅकग्राऊंड या सर्वांचा विचार करून एक चांगलं पोर्ट्रेट साकारणं ही कला आहे. मी २००६ मध्ये एका आंतरराष्ट्रीय मासिकात दि पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका यांच्याबाबत वाचलं होतं. ही संस्था नऊ वर्षांपासून जगभरातील पोर्ट्रेट कलाकारांना एकत्र आणून चार दिवसांची कॉन्फरन्स भरवते असं कळलं. आपल्याकडे जो विषय एक तास समजावून सांगणं कठीण होतं अशा विषयावर ही संस्था चार दिवसांचं शिबिर भरवते ही फार कौतुकास्पद गोष्ट होती माझ्यासाठी. त्यामुळं मी या शिबिरास जायचं ठरवलं. तिथं गेल्यावर असं कळलं की, ही संस्था पोर्ट्रेट स्पर्धचं आयोजनसुध्दा करते. तेव्हा मी या स्पर्धेस आपलं पेंटिंग पाठवायचं ठरवलं. यासाठी मी तीन चित्रं पाठवली. त्यातील माझं एक चित्र निवडलं गेलं. या स्पर्धेस तेव्हा १२ फायनलिस्ट निवडले गेले. तब्बल १२०० प्रवेशिकांमधून आम्हा सर्वांची निवड झाली होती. या स्पर्धेचा नियम असा होता की, ज्याचं पेंटिंग सिलेक्ट होईल त्यानं स्वतः या स्पर्धेत उपस्थित राहावं. तेव्हा मी तिथं गेल्यावर असं कळलं की, मीच पहिला भारतीय होतो जो या स्पर्धेत पोहोचलो होतो. यानंतर या चित्रांचं परीक्षण होतं. या परीक्षणासाठी जवळपास जगभरातून ७००-८०० डेलीगेट्स आले होते. या सर्वांच्या व्होटिंगमधून माझ्या 'माय वाईफ' या चित्राला सर्वात जास्त मतं मिळाली. आम्हा १२ फायनलिस्टमधून पुन्हा एक ग्रॅण्ड प्राईज होतं. जेवढ्यांनी भाग घेतला त्या सर्वांनाच बक्षिसं होती. परंतु जेव्हा ११ जणांची नावं घेण्यात आली तेव्हा मला थोडा एकटेपणा जाणवायला लागला. तरीही मला आतून असं वाटायला लागलं की, मी इथं भारताचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. जेव्हा ग्रॅण्ड प्राईजसाठी माझं नाव घेण्यात आलं तेव्हा मी राष्ट्रगीत पुटपुटत स्टेजवर चढलो. त्यावेळी मी जरी इंडियन आर्टिस्ट म्हणून ओळखला जात होतो तरी त्या बक्षिसाचा स्वीकार करत असताना मी भारतीय कलाकार म्हणूनच त्याचा स्वीकार केला.

 

Kamat 37सध्या भारतात, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आहेत का?
कामत : या स्पर्धेत ज्या एंट्री आल्या होत्या किंवा तिथं ज्या कलाकारांच्या कामाच्या स्लाईड दाखवण्यात आल्या होत्या त्या प्रकारचं काम करणारे अनेक कलावंत आज भारतात आहेत. आणि त्यांचं काम खूपच उच्च दर्जाचं आहे. यामध्ये सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, भार्गवकुमार कुलकर्णी, विजय आचरेकर अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील. यातील काही हॉबी म्हणून, तर काही शिकलेले कलाकार आहेत. आपल्याकडे अशा उमद्या कलाकारांचा जत्था आहे. यासारखे अनेक कलाकार जागतिक स्तरावर पोहोचू शकणारे कलाकार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचाच समावेश जास्त आहे. परंतु तरीही महाराष्ट्र सरकार या चित्रकारांबाबतीत योग्य निर्णय घेताना दिसत नाही ही खरंच कलाक्षेत्रासाठी मोठी खंत आहे. आज या जागतिक स्तरावरील कलाकारांसाठी सरकार काहीच करत नाही, त्याचं सर्व लक्ष आहे ते फक्त क्रिकेटवरतीच.

 

brush 1नव्या पिढीला काय सांगाल...?
कामत : असाच एक प्रश्न पं. भीमसेन जोशी यांना विचारला असता त्यांनी अत्यंत समर्पक असं उत्तर दिलं होतं. हे उत्तर जरी संगीताशी निगडित असलं तरी ते जगभरातल्या सर्वच कलांना लागू पडणारं होतं. ते म्हणाले की, तुम्ही "फक्त तुमच्या गळ्याने गा...” त्यांच्या या उत्तरातून त्यांनी सर्वच गोष्टी पुसून टाकल्या होत्या. म्हणजे प्रत्येक कलाकारामध्ये दडलेला जो कलाकार आहे त्याला बाहेर येऊ द्यावं. आपण कोणत्याही कलाकाराच्या कलेचं अनुकरण करण्यापेक्षा त्या कलाकाराच्या तपश्चर्येचं करा. प्रत्येकाची अभिव्यक्ती त्याच्या त्याच्या कलेमधून दिसत असते. त्यामुळं स्वतःच्या अभिव्यक्तीचा शोध घेणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक कलाकारानं आपल्या आत दडलेलं असं काही वेगळं योगदान आपल्या कलेव्दारे दाखवावं. परंतु नुसत्या अनुकरणानं तुमच्यातील कला ही आतच गुदमरत असते. तिला वाट मोकळी करून दिली पाहिजे. कधीही कोणत्याही गुरूला आपला शिष्य आपल्यासारखा गातो आहे असं पाहून कधीच आनंद होत नाही, तर त्या गुरूला आपला शिष्य आपल्यापेक्षा पुढं गेल्यावर जास्त आनंद होतो. त्यामुळं प्रत्येक कलाकारानं आपल्यातील सच्च्या कलाकाराचा शोध घ्यावा आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण जगाला काय नवीन देतो आहोत यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.