स्पेशल रिपोर्ट

रांगड्या तांबड्या मातीतला पठ्ठ्या!

धनंजय बुगडे, मुंबई
भारताला ऑलिंपिकमध्ये पहिलं पदक मिळालं ते कुस्तीत, आणि ते मिळवून दिलं कृष्णाकाठच्या खाशाबा जाधव यांनी. आता काळ बदलला असला तरी  मुंबईमधील कांदिवलीतील साई क्रीडा संकुलातील ऑलिंपिकपटू नरसिंग यादवनं राज्याचं आणि देशाचंही नाव कुस्तीत उज्ज्वल केलंय. हा पठ्ठ्या कुस्तीत भारताचं नाव आणखी उज्ज्वल करील, असा आशावाद सर्वांनाच वाटतोय.
 

NArasing 1.pngकुस्तीपटूच बनायचं स्वप्न
'भारत4इंडिया'शी बोलताना त्यानं आयुष्याचा पट उलगडताना मी देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल करीन, असा आशावाद बोलून दाखवलाय.नरसिंगचं लहानपण मुंबईतील जोगेश्वरी या उपनगरात गेलं. घरची श्रीमंती नव्हती, तो एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला. पण त्याला लहानपणापासूनच कुस्तीचं वेड. मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या बघायला तो जायचा. मल्लांचं बलदंड, पीळदार शरीर, त्यांचे जिंकण्याचे डावपेच, जिंकल्यानंतरचा त्यांचा आनंद सारं काही अनुभवण्यात त्याला एक गंमत वाटायची. शाळेत असल्यापासून डॉक्टर, इंजिनीयर न बनता आपण कुस्तीपटूच बनायचं हे स्वप्न त्यानं लहानपणापासून मनाशी ठाम केलं होतं. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यानं कुस्तीच्या आखाड्यात डाव खेळायला सुरुवात केली. यासाठी त्याला त्याच्या वडिलांचीही साथ मिळाली. शालेय, महाविद्यालयीन पातळीवर खेळताना बऱ्याच स्पर्धा त्यानं जिंकल्या. त्यामुळं महाविद्यालयानंतर कुस्तीमध्येच करियर करायचं, त्यानं मनाशी पक्कं केलं होतं.

 

कुस्तीतच नाव कमवावं ही वडिलांची इच्छा
वडील पंचमसिंग यादव हे स्वत: कुस्तीपटू. त्यामुळं त्यांनाही कुस्तीची आवड असल्यानं ते लहानशा नरसिंगला घेऊन कुस्तीच्या आखाड्यात जायचे. त्यांनाही आपल्या मुलानं कुस्तीतच नाव कमवावं, असं मनोमन वाटत होतं. यात वडिलांचा पारंपरिक दुधाचा धंदा असल्यामुळं घरात दुधा-तुपाला तोटा नव्हता. दूधदुभतं आणि कुस्ती यांचे यादवांचे तसे प्राचीन संबंध आहेत. घरातच उपलब्ध असणाऱ्या दूध, तूपावर नरसिंगची शरीरयष्टीही कुस्तीसाठी पोषक झाली होती.

 

NArasing 3.pngस्पोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षण
वडिलांनी २००० मध्ये नरसिंगला ‘साई’ अर्थात स्पोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या कांदिवली येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल केलं. गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वसामान्य कुटुंबातून, ग्रामीण भागातून आलेल्या युवक-युवतींमधील गुणवत्ता हेरून त्या गुणवत्तेला योग्य परिमाण देत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनवण्याचं काम ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था करते. इथला अधिकारी वर्ग आणि दर्जेदार प्रशिक्षक वर्ग या युवक-युवतींचा पालक असतो. यानुसार इथल्या प्रशिक्षकांनीही त्याच्यावर चांगली मेहनत घेऊन त्याच्याकडून कसून सराव करून घेतला. वयाच्या दहा वर्षांपासून येथील प्रशिक्षक, कर्मचारी हेच त्याचे सहकारी अन् खेळाडू झाले. इथले प्रशिक्षक जगमालसिंग यांनी नरसिंगमधील उपजत गुण ओळखून एक यशस्वी कुस्तीपटू म्हणून त्याची जडणघडण केली. कठोर मेहनत आणि खेळातील योग्य प्रशिक्षण देत त्याला घडवण्याचं काम जगमालसिंग यांनी केलं.“एकामागोमाग यशाची शिखरं गाठत असताना २००९मध्ये माझ्या पायांना दुखापत झाली. मी पुन्हा खेळू शकेन, असं मला वाटत नव्हतं. त्यावेळी शस्त्रक्रिया करावी लागली. आठ-नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर मी दुखापतीतून सावरत नव्या उमेदीनं पुन्हा आखाड्यात उतरलो. काही तरी करून दाखवायचं हे मात्र मनात पक्क होतं. माझ्या देशासाठी, माझ्यावर अथक मेहनत घेतात, प्रेम करतात त्या घरच्यांसाठी नव्या जोमानं मी सराव करण्यास सुरुवात केली,” अशी आठवण सांगताना नरसिंग भावविभोर होतो.

 

नावावर विविध मानमरातब
कुस्तीची सुरुवात अंगाला माती लावून आखाड्यात उतरण्यानं झाली असली तरी नरसिंगनं आपल्या गुणवत्तेच्या ताकदीवर मॅटच्या कुस्तीसाठीही तयारी केली. जिद्द आणि गुण यामुळं वयाच्या १७व्या वर्षीच ज्युनियरऐवजी सीनियर्समध्ये खेळवण्याचा निर्णय प्रशिक्षकांनी घेतला. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत कॅनडात झालेल्या कॉमनवेल्थ रेसलिंग चॉम्पियनशिपमध्ये त्यानं रौप्यपदक पटकावलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशाची पताका फडकवत ठेवताना त्यानं २००५मध्ये जपानमध्ये कांस्यपदक, २००८मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, २००९ कॉमनवेल्थ रेसलिंग चॉम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, रशियातील बेलारूस इथं २०१०मध्ये झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवलं. सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळवणाऱ्या नरसिंगच्या खात्यात आजपर्यंत सहभागी झालेल्या आठ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य, तर एक कांस्यपदक आहेत.

 

NArasing 6.pngसलग दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा
'महाराष्ट्र केसरी' ही महाराष्ट्रातातील प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा. यापूर्वी नरसिंगनं २०११मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. ऑलिंपिकचा मोठा अनुभव असणाऱ्या नरसिंगनं अपेक्षेप्रमाणं २०१२ मध्ये गोंदियात झालेल्या ५६व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय चौधरीवर मात करत अजिंक्यपद पटकावलं आणि सलग दुसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा पटकावली. महाराष्ट्र सरकारनंही त्याचा छत्रपती पुरस्कार देऊन गौरव केलाय. भारत सरकारतर्फे आपापल्या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारा अर्जुन अॅवॉर्ड देऊन नरसिंगचा गौरव केला. “सरकारतर्फे देण्यात येणारा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारामुळं मी घेतलेल्या मेहनतीचं फळ मला मिळालं. यामुळं मला माझ्या खेळात अधिक प्रगती करण्याचं बळ मिळालंय,” असं तो आवर्जून सांगतो.

 

कसून सराव हेच यशाचं गमक
आपल्या यशाचं मोल आपल्याकडून घेण्यात येत असलेल्या सरावाला आणि प्रशिक्षणाला आहे, असं नरसिंग म्हणतो. कुस्तीच्या सरावाबाबत तो म्हणाला, “आमचा सराव सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास असा केला जातो. मॅटवरील टेक्निक प्रॅक्टिस, खेळातील वेगावर जोर देणं, शिवाय शारीरिक व्यायाम यावर सरावाच्या वेळी कसून भर दिला जातो. केंद्र सरकारनं सर्वसामान्य कुटुंबातील गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या या साई संकुलात राहून परिस्थितीशी झगडत यश मिळवताना खूप आनंद होतो.”

 

ऑलिंपिकमध्ये कुस्ती हवीच!
ऑलिंपिकमधून कुस्तीला वगळण्याच्या भूमिकेबाबत तो दुःखी आहे. “संपूर्ण जगात २०० पेक्षा अधिक देश कुस्ती खेळतात. माझ्या मते हा निर्णय चुकीचा आहे. अजून यावर निर्णय झालेला नाहीये. ऑक्टोबरपर्यंत यावर निर्णय होईल असं वाटतं. कुस्तीचा खेळ आता जगभर पोहोचला आहे आणि लोकांमध्येही या खेळाबद्दल आस्था आहे. भारतीय कुस्तीपटूंनीही या खेळात भरपूर प्रगती केलीय. नुकत्याच झालेल्या लंडन ऑलिंपिकमध्ये कुस्तीतच भारताला दोन पदकं मिळाली आहेत. म्हणून या खेळाचा समावेश ऑलिंपिकमध्ये केला जावा यासाठी भारत सरकारनं पाठपुरावा करायला हवा,” अशी अपेक्षाही त्यानं बोलून दाखवली.

 

NArasing 18.pngमॅटवर खेळण्याचा सराव आवश्यक

मातीतील आखाड्यातली कुस्ती आणि मॅटवरील कुस्तीतील फरक सांगताना नरसिंग म्हणाला, “मातीतील कुस्ती आणि मॅटवरील कुस्तीत भरपूर फरक आहे. मातीतील कुस्ती बराच वेळ चालते. तसंच ही कुस्ती खेळण्याचा वेग मॅटवरील कुस्तीपेक्षा खूप कमी असतो. परंतु मॅटवरील कुस्तीत चपळता फार महत्त्वाची आहे. यात दोन-दोन मिनिटांचे तीन राऊंड असतात आणि ही कुस्ती वेगवान पद्धतीनं खेळली जाते. जागतिक पातळीवर जर कुस्तीत गुणवत्ता प्राप्त करायची असेल तर मॅटवर खेळण्याचा सराव कुस्ती खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूनं करायलाच हवा. कारण ऑलिंपिकमधील कुस्ती मॅटवर खेळली जाते. यात प्रगती केल्यानं तो स्वतःचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करू शकेल.”

 

“आता गावागावातही मॅट उपलब्ध झालीय. कुस्ती खेळणाऱ्यांनी मॅटवर कसून सराव केला पाहिजे. शालेय, ग्रामीण, राज्याच्या पातळीवरील स्पर्धेत त्यांनी भाग घेतला पाहिजे. यामधून त्यांची गुणवत्ता दिसून आली की, भारत सरकार अशा गुणवान खेळाडूंची निवड करून साईसारख्या सेंटरच्या वतीनं त्यांची पूर्ण जबाबदारी घेतं. पुढं यातूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतात,” असंही तो म्हणाला.

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिल्यानंतर नरसिंग यादवचं नाव सर्वत्र आदरानं घेतलं जाऊ लागलं. “तो 'साई'त आला तेव्हाच त्याच्यातील गुणवत्ता पाहून हा मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचं मैदान नक्की गाजवणार असं वाटून गेलं. नरसिंगनं आपल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही,” असं त्याचे प्रशिक्षक जगमालसिंग अभिमानानं सांगतात.

 

स्वप्न ऑलिंपिक पदकाचं
कुस्तीपटू नरसिंग यादव अर्जुन पुरस्कारामुळं खुशीत असला तरी लंडन ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याची देशवासीयांची अपेक्षा पूर्ण करता न आल्याची सल त्याला अस्वस्थ करते. येत्या ब्राझील ऑलिंपिकमध्ये देशाला कुस्तीत पदक मिळवून देण्यासाठी आपण कसून सराव करतोय, असं तो म्हणाला. सुशीलकुमार, नरसिंग यासारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामगिरीमुळं देशभरात कुस्तीबद्दल आकर्षण वाढलं आहे. यात नरसिंग भविष्यात या नवोदितांचा आदर्श असेल यात मात्र शंका नाही.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.