स्पेशल रिपोर्ट

धवल क्रांतीनंतर आता 'गो रिव्हॉल्युशन'...

सुमित बागुल, मुंबई
महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा आज अटकेपारच नव्हे तर सातासमुद्रापार फडफडतोय. 'गर्जतो मराठी' या यशोगाथांमधून 'भारत4इंडियानं' देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या महाराष्ट्रवीरांच्या कामगिरीचा आढावा घेतलाय. त्यात अग्रभागी आहेत, गोवर्धन डेअरीचे देवेंद्र शहा. वर्गीस कुरियन यांच्या अथक प्रयत्नानंतर साकारलेल्या धवलक्रांतीनंतर आता शहा यांनी 'गो रिव्हॉल्युशन'ची हाक दिलीय. ही क्रांती आहे, देशातले दुधाचे पदार्थ जगभर पोचवण्याची. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि संपन्न करण्याची...
 

 

तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला आणि कृषिप्रधान भारत देश बघता बघता अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. त्याच दरम्यान डॉ. वर्गिस कुरियन यांच्या पुढाकारानं धवलक्रांती आकाराला आली. १९६०च्या दशकात देशात दुधाचं उत्पादन केवळ २ कोटी मेट्रिक टन होतं. आज ते 13 कोटी मेट्रिक टनाच्या घरात आहे. ही धवलक्रांतीचीच किमया आहे. पण आता देशाला आणि जगाला गरज आहे ती वेगवेगळ्या दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांची. त्यातून देशाच्या अर्थकारणाला, तसंच देशवासीयांच्या आरोग्याला बळकटी प्राप्त होणार आहे. हे व्हिजन लक्षात घेऊनच शहा यांनी 'गो रिव्हॉल्युशन'चा गोवर्धन पेलण्यासाठी दंड थोपटलेत.

 

go'गोवर्धन'चे देवेंद्र शहा
गोवर्धन या ब्रॅण्डच्या डेअरी उत्पादनांची सध्या बाजारात चलती आहे. दही, दूध, लोणी... या पारंपरिक दुग्ध उत्पादनांच्या पुढं जात गोवर्धननं अगदी चीजपासून ते गुलाबजामूनपर्यंत उत्पादनं बाजारात आणली असून, त्यांना वाढता प्रतिसाद मिळतोय. ग्रामीण भागात शून्यातून निर्माण झालेल्या या उद्योगाचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय. गोवर्धन हा 'ब्रॅंड नेम' एवढा प्रसिद्ध झालाय की, 'गोवर्धनचे देवेंद्रशेठ' अशीच त्यांची ओळख निर्माण झालीय.

 

पुण्याजवळील मंचर इथल्या देवेंद्र शहा यांचं शिक्षण कॉमर्स शाखेतून झालं. १९८९ पासून ते डेअरी व्यवसायात सक्रिय झाले. त्यांच्या घरी व्यापारी वातावरण असलं तर डेअरी व्यवसाय हा त्यांच्यासाठी नवीनच होता. त्यातच १९९१मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी उद्योगक्षेत्र परवानामुक्त केलं. डेअरी व्यवसायही त्याला अपवाद नव्हता. त्याची संधी साधत शहा यांनी १९९२मध्ये 'पराग मिल्क फुड्स'ची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी एक कोटीची गुंतवणूक केली. त्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं. या काळात अपुऱ्या सोयीसुविधांमुळे डेअरी व्यवसाय फारसा चालत नव्हता. बऱ्याचदा दूध फेकून द्यावं लागत असे. पण जोखीम पत्करण्याचं बाळकडू घरातूनच मिळाल्यानं त्यांनी मोठ्या धाडसानं पाऊल टाकलं आणि ते यशस्वी करून दाखवलं.


Go 7सुरुवातीचे दिवस...
देवेंद्रशेठ यांची उद्योगाची कारकीर्द सुरू झाली ती पशुखाद्य व्यवसायापासून. १९९१-९२चा तो काळ. यावेळी दुधाचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की, त्यावर प्रक्रिया करण्यासाठीची उपलब्ध असलेली यंत्रणा अपुरी पडू लागली. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या दूध संघांनाही आठवड्यातून दोन-तीन दिवस खाडा करावा लागत असे. त्यामुळं दुधबिलात फरक पडू लागला. या खाड्यातच आमचा फायदा निघून जातो तर आम्ही पशुखाद्याचे पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले. शेतकऱ्यांची ही व्यथा लक्षात घेऊन देवेंद्र शहा यांनी मंचरला 20 हजार लिटरचा प्रोसेसिंग प्लॅण्ट टाकला. मंचरपासून मुंबई-पुणे मार्केट जवळ होती. त्याचा विचार करून जादा दूध घेऊन त्यावर प्रक्रिया करून ते विकायला सुरुवात केली. खाड्यांच्या दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे चार-साडेचार लाख लिटर दूध जास्त असायचं. त्यातूनच वर्षभरात दूध एवढं वाढलं की तीन वेळा त्यांना प्लॅण्टचा विस्तार करावा लागला. त्यानंतर थोड्याफार अडचणी येत गेल्या, मात्र त्यातून मार्ग काढत त्यांनी टप्प्याटप्प्यानं विकास साधत गोवर्धन हा ब्रॅंड म्हणून बाजारात लोकप्रिय केला. कर्नाटक, आंध्र आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांच्या सीमेवर गोवर्धनचे प्लाण्ट आहेत. दूध पावडर तयार करण्याचा प्रोजेक्ट आहे. याशिवाय दही, लोणी, तूप हे उपपदार्थ बाजारात आणले.

 

टर्निंग पॉईंट...

देवेंद्र शहा सांगतात... गोवर्धनच्या विस्तारासाठी मी जगभर फिरत होतो. एकदा असंच सहज युरोपला फिरायला गेलो असताना माझ्या दूध पावडरचे पाच-सात सॅम्पल घेऊन गेलो होतो. पॅरिसमधील एका मोठ्या ग्लोबल ट्रेडिंग फर्ममध्ये जाऊन मी त्यांना दूध पावडरचे सॅम्पल दिले. हे इंडियात बनलेत म्हटल्यानंतर त्यांनी तुम्ही हे थेट फॅक्टरीतून कुरिअर करू शकता का, असा प्रश्न केला. त्यांना हो म्हटलं. भारतात परतल्यावर त्यांच्या लॅबला थेट कुरिअर केलं. काही दिवसांनी ते आपल्या गुणवत्ता विभागातील टीमसोबत आमच्या प्लाण्टला भेट देण्यासाठी मंचरला आले. इंडियात एवढ्या चांगल्या दर्जाची पावडर कशी बनवली जाते, हे त्यांना पाहायचं होतं. यामुळं मला एक वेगळाच आत्मविश्वास आला. त्यानंतर म्हणजेच १९९८पासून मी जगाची बाजारपेठ नजरेसमोर ठेवून विचार केला आणि प्रत्यक्ष निर्यातीलाही सुरुवात केली.Go 46दुधाळ ऐश्वर्या....
याच दरम्यान भारत दूध उत्पादनात क्रमांक एकवर होता. पशुधनाची संख्या विचारात घेता प्रती जनावर मिळणारं दूध इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी होतं. जर्सी, होस्टिनसारख्या गाई अमेरिकेत प्रती वर्ष दहा हजार लिटर दूध देतात. त्याच भारतात 2200 लिटरवर दूध देत नव्हत्या. त्यावर खरं तर संशोधन होण्याची गरज होती. ही गरज ओळखून आम्ही स्वत:चा काऊ फार्म सुरू केला. तिथं पाश्चात्त्य देशातील सर्व सुविधा उपलब्ध करून संशोधन केलं. आज मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की, तिथल्या ज्या गाई आहेत त्या युरोपियन गाईंपेक्षासुध्दा चांगल्या आहेत. फार्ममधील नंबरवन काऊ दिवसाला ५४ लिटर दूध देते. तिला गमतीनं ऐश्वर्या नाव ठेवण्यात आलंय.

 

चीजची निर्मिती
चीज हा पदार्थ मूळचा प्राचीन भारतखंडाच्या कालावधीतला. हिमालयापासून अफगाणमधील हिंदुकुश पर्वतराजीपर्यंतच्या प्रदेशाचा समावेश तेव्हाच्या भारतखंडात होता. अफगाण व्यापारी आपले मसाले आणि मसाल्याचे पदार्थ घेऊन आखाती मार्गानं युरोपियन देशांमध्ये व्यापार करण्यासाठी जात. हा मार्ग वाळवंटी प्रदेशातून जात असल्यानं ते आपलं संपूर्ण सामान उंटांवरून लादून नेत असत. सोबत हे व्यापारी आपल्या खांद्यावर लेदरची बॅग अडकवत असत. या बॅगेचं वैशिष्ट्य म्हणजे वाळवंटातून प्रवास करताना खायला-प्यायला मिळणं अशक्यच, त्यामुळं खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून उंटाचं काढलेलं दूध या लेदरच्या बॅगेमध्ये ते साठवून ठेवत. ही लेदरची बॅग काखेत अडकवलेली असल्यामुळं प्रवासात चालत असताना बॅगेतील दुधाचं चर्निंग व्हायचं, या चर्निंगमुळं दुधातील घट्ट पदार्थाचा लगदा व्हायचा आणि त्यातलं पाणी वेगळं व्हायचं. सर्वसामान्यपणं आपण विरजणासाठी ठेवलेल्या द्हयामध्ये जसं दही वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं त्याप्रमाणं. या प्रक्रियेला वे म्हणतात. हे वेगळं झालेलं पाणी पिऊन तो व्यापारी तहान भागवायचा आणि उरलेल्या घट्ट लगद्यानं तो आपली भूक भागवायचा. या चर्निंग प्रक्रियेनं चीजची निर्मिती केली जाते.

 

Go 10मार्केटिंगचे फंडे
आपल्याला वाटतं आज खूप स्पर्धा आहे, पण त्याही काळात अशीच स्पर्धा होती. माझ्या आजोबा, बाबूशेठ शहा यांचा लसणाच्या बियाणं विक्रीचा व्यवसाय होता. चांगलं उत्पादन देणार लसूण बियाणं जिथं असेल तिथून आणून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असत. एका वर्षी त्यांनी राजकोटहून लसणाचं बियाणं आणलं. त्याचं दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळत असल्यानं मागणी तुफान वाढली. त्याच वेळी राजकोटहून एक व्यापारी आला आणि त्यानं थेट लसूणविक्री सुरू करण्यासाठी हॅंडबिलं वाटली. मार्केटिंगचा भाग म्हणून ही हॅंडबिलं त्यानं चक्क हेलिकॉप्टरमधून पंचक्रोशीत टाकली. स्थानिक शेतकऱ्यांचा माझे आजोबा आणि त्यांचे भागीदार बुवा बाबाजी थोरात यांच्यावर खूप विश्वास होता, तरीही शेतकरी या हेलिकॉप्टर ट्रिकला भाळतील की काय, अशी त्यांना शंका वाटू लागली. त्यात ती कंपनी मोठी. पण तरीही न डगमगता हेलिकॉप्टरला उत्तर देण्यासाठी आजोबांनी त्या काळातील लोकप्रिय राजदूत गाडीचा वापर केला. बियाणं घेऊन मोटरसायकलवरून गावोगावी जायचं. गावात गेल्यानंतर पहिल्यांदा पाटलाच्या दारापुढं उभं राहायचं. पाटील चहा पाजायचा. मग गाडीवरून पाटलाला एक चक्कर मारून आणायची. खूश झालेला पाटील मग लोकांना समजून सांगायचा... ती कोण, कुठली, कंपनी... याची आपणाला काहीच माहिती नाही. हे लोक आपले आहेत. काय कमीजास्त झालं तर यांना जाब विचारता येईल. त्या परक्या लोकांचा काय भरवसा? तेव्हा याचंच बियाणं घ्या. झालं, त्यांच्या हेलिकॉप्टरचा काहीही परिणाम झाला नाही. लोकांनी आजोबांकडूनच बियाणं घेतलं. तर... देवेंद्रशेठ यांच्यात रुजलेलं मार्केटिंगचं बेणं हे असं तीन पिढ्यांचं अनुभवांचं लेणं आहे. त्यांची आतापर्यंतची यशोगाथा लक्षात घेता 'गो रिव्हॉल्युशन'चं त्यांचं व्हिजन नक्कीच प्रत्यक्षात येईल, अशी सर्वांनाच खात्री आहे.

 

गोवर्धनची उत्पादनं आणि वैशिष्ट्य

गो-चीज, गोवर्धन गोल्ड पाश्चराईज्ड काऊ मिल्क, गोवर्धन फ्रेश कॅल्शियमयुक्त दूध, गोवर्धन घी, गोवर्धन बटर, गोवर्धन प्रोसेस्ड चीज, गोवर्धन मोजरेला चीज, गोवर्धन मिल्को (मिल्क पावडर), गोवर्धन डेअरी व्हाईटनर क्रीम, गोवर्धन गुलाबजामून, गोवर्धन दही, गोवर्धन ट्रीम दही (फॅट्स फ्री), गोवर्धन छास, गो-फ्रूट अॅण्ड दही फ्यूजन, गोवर्धन पनीर, गो-स्लिम दूध, गो-चीज स्प्रेड ही आणि अशी जवळजवळ ६४ प्रॉडक्ट सध्या बाजारात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीपासून आजपर्यंत कुठलाही पदार्थ त्यांना बाजारातून परत घेण्याची नामुष्की पत्करावी लागलेली नाही. गोवर्धनचा दर्जा काय आहे, हे सांगायला एवढं पुरेसं आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.