स्पेशल रिपोर्ट

हापूसला साज 'सिंधू'चा!

मुश्ताक खान, रत्नागिरी
कोकणात सध्या हापूसचा सीझन आहे. ''आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो,'' असं कोकणचं वर्णन केलं जातं. कोकणी माणसाला राजा बनवणाऱ्या आंब्याच्या विविध जाती डॉ. बाळासाहेब सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केल्यात. पण या आंब्यामध्ये सिंधू ही जात जरा हटके आहे. कारण ती आहे बिनबाट्याची म्हणजेच कोईविरहित आणि त्याचा शोध लावलाय कोकणातल्या लाल मातीत जन्मलेल्या डॉ. मुराड बुरोंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून इचलकरंजीच्या ‘फाय फाऊंडेशन’चा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळालाय.
 

 

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं आणि लोकांच्या गरजा भागाव्यात यासाठी कोकण कृषी विद्यापीठानं अनेक संशोधनं केली आहेत. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या हापूस, रत्ना, कोकण रुची, कोकण राजा या आंब्यांचा आस्वाद आपण वेळोवेळी घेतलाय. त्यात आता सिंधूनंही आपला ठसा उमटवलाय.

 

kokan11आंब्याच्या १३०० जाती
आंबा उत्पादनामध्ये जगात भारताचा पहिला क्रमाक लागतो. रायवळ वगळूऩ संपूर्ण देशात १३०० पेक्षा जास्त आंब्याच्या जाती आहेत. पण त्यापैकी फक्त २०-२५ जातीच व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं देशभरात फक्त याच विशिष्ट जातीच्या आंब्यांची मोठी लागवड आढळते. आंबा फळ चवीला अत्यंत चांगलं असून त्याला जगभरात मागणी आहे. कोकणातला हापूस तर इतका प्रसिद्ध झालाय की त्याच्या नावावर कर्नाटक आणि इतर देशातले आंबेही लोक चवीनं खातात. यामुळंच हापूस आणि इतर आंब्यांना व्यापारीदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे.

 

संकरातून सिंधूची निर्मिती
आंब्याला मागणी तर खूप आहे, पण त्याच्या उत्पादनाच्या काही अडचणीही आहेत. देशभरात नीलम आणि बंगळूरु वगळता बहुतांश आंबा जातीमध्ये वर्षाआड फळधारणा होणं, हा अनुवांशिक दोष आढळतो. आंब्याची उत्पादकता कमी होण्याचं हे एक ठळक कारण आहे. आंब्याच्या लागवडीतून सरासरी सात टन प्रती हेक्टर उत्पादन मिळतं, तर कोकणातील हापूस या जातीचं तीन ते अडीच टनच उत्पादन मिळतं. त्याचबरोबर हापूस पिकल्यानंतर त्यात साका (बाहेरून चांगला आणि आतून खराब) ही विकृती आढळते. त्यावर उपाय शोधण्यासाठी १९७२ सालापासूनच विद्यापीठानं संशोधनाचं काम हाती घेतलं. kokan2१९७२ ते १९८१ या दरम्यान झालेल्या संशोधनात रत्ना या संकरीत आंब्याच्या जातीची निर्मिती करण्यात आली. रत्ना ही जात हापूस आणि नीलम या आंब्याच्या संकरीकरणातून तयार झाली. रत्ना या जातीची दरवर्षी फळधारणा होते. त्यात साका नाहीये आणि त्यामध्ये ६० -७० टक्के हापूसचे गुणधर्म आलेले आहेत. रत्नामध्ये हापूस या जातीचे गुणधर्म अधिक वाढवण्याच्या दृष्टीनं १९८३ ते १९९१ पर्यंत वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात डॉ. रामचंद्र गुंजाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन झालं आणि हापूस-रत्नामध्ये पूर्वपिढी संकरीकरण करून सिंधू ही जात विकसित करण्यात आली. डॉ. मुराड बुरोंडकर यांची यात महत्त्वाची भूमिका राहिली. प्रा. एम. ए. गोवेकर, डॉ. एम. बी. मगदूम, डॉ. एम. जे. साळवी आणि डॉ. एस. व्ही. माजगावकर यांचाही सिंधूच्या संशोधनात सहभाग होता. सिंधू जातीची नोंद ही जागतिक पातळीवर घेतली गेली आणि १९९१ मध्ये विकसित झालेल्या सिंधूची बातमी प्रत्येक वर्तमानपत्रात गाजली होती.

 

असा आहे सिंधू आंबा...
या आंब्यात कोय ही जवळजवळ नसल्यासारखीच आहे. सिंधूची कोय म्हणेच बाटा फक्त सहा ग्रॅमचा असतो. तर त्यातला गर दीड ते दोन ग्रामचा असतो. सिंधूमध्ये नसल्यासारखा असलेला बाटा रुजत नाही. या फळाचं वजन जरी २१५ ग्राम असलं तरी त्यातला ९० टक्के भाग उपयोगी असतो. सिंधूच्या झाडाला गुच्छ्यानं फळं लागतात. त्याचबरोबर झाडं बुटकी असतात. त्यामुळं हापूसच्या एका झाडाच्या जागेत याची दोन झाडं लावता येऊ शकतात. अर्थात १० X १० मध्ये न लावता ५X५ फूट याप्रमाणं लावण्यात यावी. गर खूप असल्यानं सिंधू ही जात प्रकिया आणि पल्पसाठी सर्वात उपयुक्त आहे. हापूस हवामान बदलालाही संवेदनशील असला तरी सिंधू तेवढा संवेदनशील नाही. हापूसची लागवड करताना 15 ते 20 टक्के सिंधूची लागवड केली, तर परागीकरण होऊन हापूसच्या उत्पादनातही वाढ होऊ शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी सिंधूच्या जातीचा नक्की विचार करावा, असं सिंधूचे जनक डॉ. मुराड बुरोंडकर तळमळीनं सांगतात. सिंधूबरोबरच सुवर्णा आणि कोकण रुचीत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलं.

 

kokan3डॉ. बुरोंडकरांचं योगदान
अभिमान वाटावा अशी अनेक कामं डॉ. मुराड बुरोंडकरांनी केली आहेत. हापूस आंब्याला सलग फळधारणा व्हावी यावरही बुरोंडकर यांनी रामबाण उपाय सुचवला. देशात पॅक्लोब्यूट्राझोल (कल्टार म्हणून प्रसिद्ध)चा वापर करून हापूसला दरवर्षी आंबे येतात. या संशोधनातही त्यांची भूमिका अग्रेसर राहिलीय. त्यांच्या या संशोधनामुळं हापूसच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आणि शेतकऱ्यांना जादाचे पैसे मिळू लागले. देशभारत २० हजार लिटरपेक्षा जास्त कल्टार आता वापरला जातोय. हापूसमधील साका नाहीसा व्हावा यासाठीही त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. एस. ओ. पोटॅशच्या वापरामुळं फळाचा दर्जा सुधारण्यात मदत झाली. त्याचबरोबर साकाही कमी झाला. आंबा न कापता आतमध्ये साका आहे की नाही याचा शोध घेणाऱ्या एक्स-रे मशीनही त्यांनी विकसित केली. त्यामुळं निर्यातदार आंबा शेतकऱ्यांसाठी ही मशीन वरदानच ठरलीय. त्याचबरोबर हापूस आंबा विदेशात पाठवताना वाटेतच पिकून खराब होऊ नये याचा विचार करून त्यांनी अॅण्टिइथलिन (anti-ethylene)चाही शोध लावला. यामुळं आता समुद्रमार्गे आंबा पाठवता येतो आणि तो या प्रवासादरम्यान पिकून खराब होत नाही. एकाच व्यक्तीनं आंब्यासाठी एवढं योगदान दिलंय, यावर कधी कधी लोकांचा विश्वासच बसत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगायचं की, ते अत्यंत हसमुख, कामासाठी सतत धडपड करणारे, इतरामध्ये न पडणारे आदर्श असे संशोधक आहेत. माझ्या संशोधनात विद्यापीठाची भूमिका सगळ्यात जास्त आहे. आज मी जे काही आहे ते फक्त विद्यापीठामुळंच. त्यामुळं हे संशोधन माझं नसून विद्यापीठाचं आहे, असंही ते मोठ्या मनानं आणि तेवढ्याच नम्रतेनं सांगतात. त्यामुळं भविष्यात त्यांच्याकडून आणखी अपेक्षा वाढल्यात.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.