मध्यरात्रीचा बाजार
वेळ मध्यरात्री दोनची. एकापाठोपाठ एक भाज्यांनी खचाखच भरलेले ट्रक या मार्केटमध्ये यायला सुरुवात होते. हे ट्रक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतमाल घेऊन इथं येतात. शेतकरी भाजीपाला पाठवतो त्यावेळीच त्याचं व्यापाऱ्याशी बोलणं झालेलं असतं. त्याप्रमाणं ट्रक वाशीच्या बाजार समितीत आला की, थेट ठरलेल्या व्यापाऱ्याच्या गाळ्यासमोर जाऊन उभा राहतो. मग, लगेचच कामगारांचा ताफा हे ट्रक उतरवण्यासाठी सज्ज होतो. आणि ट्रक आला... आला म्हणताच मिनिटाभरातच खाली होतो. शेतकऱ्याच्या शेतमालाचं मार्केट खऱ्या अर्थानं तिथून सुरू होतं. शेतमाल उतरून घेतानाच व्यापाऱ्याची कसलेली नजर त्याला काय किंमत मिळेल, याचा मनात अंदाज घेत असते.
भाजीपाला मार्केटच्या सर्व गाळ्यांमध्ये असंच चित्र असतं. गाडी आली, खाली केली, गेली, गेली... असा एकच ओरडा इथं सुरू असतो. त्यातच व्यापाऱ्यांची वर्दळ, लिलावानं भाजीपाला घेण्यासाठी आलेले छोटेमोठे विक्रते यांची धावपळ सुरू असते.
...असा होतो लिलाव
माल कुठला, कुठला आलाय. दर काय फुटलाय, याचा अंदाज बांधत मुंबईभरातील छोटेमोठे व्यापारी भाजीपाला घेण्यासाठी इथं भल्या पहाटेच दाखल झालेले असतात. आल्यानंतर पहिल्यांदा तिथल्याच टपरीवर चहा घेताना हमाल, इतर व्यापारी आणि आलेले शेतकरी यांच्याशी चर्चा करून ते खबरबात ठेवतात. जेवढी आवक जास्त तेवढा दर कमी, म्हणजेच मागणीपेक्षा आवक कमी झाली तर भाज्यांचे दर भडकतात... तर अशा भाव खाणाऱ्या भाज्या कोणत्या आहेत, याची माहिती या छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांना पुरेपूर असते. लिलाव सुरू झाला की प्रथम मालाची प्रतवारी पाहिली जाते. त्यानंतर बोली लावली जाते खरी, पण जाहीरपणं नव्हे. कापडाखालील हाताची बोटं धरून लिलाव होतो.
बोटांमध्ये लपलंय काय?
एक बोट म्हणजे एक तर एक रुपया किंवा दहा हजार रुपये, एक लाख किंवा एक कोटी रुपये. याची जर 20 हजार रुपये किंमत असेल तर ती गिऱ्हाईक दोन बोटं करतील. दोन बोटं धरली की 20 हजार रुपये. तुम्हाला वाटलं की याची किंमत बावीस हजार रुपये आहे, तर तुम्ही काय करणार? वीस हजार झाल्यानंतर आणखी दोन बोटं धरली, की मग दोन हजार रुपये, म्हणजे झाले २२ हजार रुपये, हा त्या बोटामागचा अर्थ. उद्या पन्नास रुपये असेल तर पाच बोटं, तसंच पाचशे, पाच हजार, पाच लाख, पाच कोटी असले तरीही पाच बोटंच. थोडक्यात, मालाची सरासरी किंमत काय असेल, यानुसार लिलावातील बोटांची किंमत ठरते. समोरचा शेतमाल पाच रुपयांचा असेल तर पाच बोटं, ती जर पन्नासची असेल तर पन्नास दाखवेल. समजा एकावन्न असेल तर पाच आणि एक, बावन्न असेल तर पाच आणि दोन, पंचावन्न असेल तर पाच आणि पाच असंही इथं असतं. ही कापडाआडची बोटं आणि ती धरणारे हात दोन्हीही या लिलावाला सरावलेत. लिलाव ठरला की, एकमेकांना टाळी देऊन तशी खूण केली जाते. मग लिलाव घेतलेला व्यापारी माल उचलतात.
सर्वाधिक भाजीपाला पश्चिम महाराष्ट्रातून
वाशीच्या मार्केटमध्ये सर्वाधिक भाजीपाला पश्चिम महाराष्ट्रातून येतो. त्यापाठोपाठ कोकण तसंच नाशिक इथून येतो. रोज या मार्केटमध्ये 400 ते 500 ट्रक एवढा भाजीपाला येतो. हंगामात ही संख्या 700 ते 800 ट्रकवर जाते. या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि पालेभाज्या येतात. यामध्ये पालक, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, कोथिंबीर, चवळी, करडई, शेपू, मेथी, मिरची, तोंडले, भोपळा, वांगी, शेवगा आदी पालेभाज्या, तर आलं, गाजर, रताळे, मुळा यांबरोबरच चाईनीज भाज्याही इथं मिळतात. इथं येणाऱ्या भाज्या या सरसकट येतात. त्यामध्ये कसलंच वर्गीकरण करण्यात येत नाही. भाज्या पोत्यांनी येतात. त्यांचे 10 किलोनं दर ठरतात आणि छोटे व्यापारी ते खरेदी करून त्यांच्या दर्जानुसार त्यांचं वर्गीकरण करुन शहरातील विविध भागांत विविध दरांमध्ये त्या विकतात.
वर्गीकरण छोटे व्यापारीच करतात
व्यापाऱ्यांकडं भाजीपाला कसा येतो, याबाबत भाजीपाला व्यापारी गणेश पिंगळे यांनी माहिती दिली. आमच्याकडं विविध प्रकारच्या पालेभाज्या विविध जिल्ह्यांतून येतात. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातून जास्त प्रमाणात भाज्या येतात. भाज्यांमध्ये फ्लॉवर (खेड, निमगाव), कोबी (नाशिक), शिमला मिरची (नाशिक, सांगली), कैरी (कोकण, कर्नाटक, पालघर), इत्यादींचं प्रमाण चांगलं आहे, असंही पिंगळे यांनी सांगितलं. तर संदीप वऱ्हाडी यांच्या गाळ्यात तोंडले, शेवगा, दुधी आदी भाज्या येतात. या भाज्यांविषयी माहिती देताना वऱ्हाडी म्हणाले की, आमच्या इथं असलेले तोंडले हे गुजरातवरून येतात. लहान आणि मोठे असे त्याच्या दोन भागात वर्गीकरण केले जाते. लहान तोंडल्यांना बाजारात जास्त मागणी असते. त्यामुळे लहान तोंडल्याचे भाव जास्त असतात. शेवग्याचेही दोन प्रकार पडतात. एक गावठी आणि लंबा अशी त्यांची नावं आहेत. तर दुधी ही प्लास्टिकमध्ये आली तर तिला जास्त बाजार असतो. आमच्या गाळ्यात सर्वात जास्त तोंडल्याचीच आवक असते.
रविवार हा इथला साप्ताहिक सुट्टीचा दिवस. याशिवायच्या सार्वजनिक सुट्ट्या वगळता वाशीचं भाजीपाला मार्केट बारा महिने सुरू असतं. मध्यरात्रीपासून इथं लगबग सुरू असते म्हणूनच मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात भाज्या शिजतात.
Comments
- No comments found