स्पेशल रिपोर्ट

'बहाडोली'चं जांभूळआख्यान!

रोहिणी गोसावी, जांभूळगाव, ठाणे
दूर डोंगरकुशीत एक टुमदार गाव वसलंय... गावाशेजारी नदी वाहते... नदीकाठी आहेत उंचच उंच जांभळाची झाडं... या झाडांना लटकलीत टप्पोरी, रसाळ जांभळं... या जांभळांना गावकरी पोटच्या लेकराप्रमाणं जपतात. आणि ही झाडंही अख्ख्या गावाचा सांभाळ करतात..! ही काही 'चांदोबा'मधली किंवा आजोबांनी नातवाला सांगितलेली गोष्ट नाही बरं. ही आहे खरीखुरी कहाणी. ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील बहाडोली गावची. नदीकाठची ही बाराशे जांभळांची झाडं गावातल्या तब्बल साडेतीनशे कुटुंबांचा जगण्याचा आधार बनलीत. हे 'जांभूळआख्यान' खरोखर ऐकण्यासारखं आहे...  
 


jambhulstory 1बहाडोली झालंय जांभूळगाव

ठाण्यापासून अहमदाबाद महामार्गावरून जवळपास ७० किलोमीटरचं अंतर कापलं की, येतो मस्तान नाका. या मस्तान नाक्यावरून मनोर गावाकडे जायला लागायचं. मनोर गावातून बहाडोलीसाठी फाटा फुटतो. तिथून जवळपास १५ किलोमीटरचा कच्चा रस्ता पार केला, की बहाडोली येतं. गावाच्या प्रवेशद्वारावरील पाटीवर लिहिलेली जांभूळगाव ही अक्षरं किती सार्थ आहेत याची ओळख पट्दिशी पटते. अवघं बहाडोली हे जांभूळवनाच्या कुशीत वसलंय. आपणाला सर्वसाधारण जांभळांची झाडं जशी दिसतात तशी ही झाडं नाहीत. पुराणपुरुषाप्रमाणं ती भासतात. जांभूळपानांची सळसळ आणि कोकिळेच्या कुहूकुहूची साद निसर्गरम्य वातावरणाला भारून टाकते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ये सुस्वरे आळविती' हे आपल्या तुकोबांचं वचन किती सार्थ आहे, याचीच क्षणभरातच साक्ष पटते. 


जांभळांवरच चालतो गावगाडा

बहाडोलीत जेमतेम ३५० उंबरे आहेत. एकूण लोकसंख्या १६००च्या घरात. पाऊसमान चांगलं असल्यानं गावच्या शेतीवाडीत भात पिकतो. पण अख्ख्या गावाची अर्थव्यवस्था चालते ती जांभळांवरच. गावात जवळपास जांभळाची १२०० झाडं आहेत. जांभळांचा सीझन हा मेपासून सुरू होतो आणि मृगाची धार पडायला लागली की संपतो. या एका महिन्यात हे जांभूळवन गावाला भरघोस पैका देतं. त्यातूनच गाववाले वर्षभराची बेगमी करून ठेवतात. या जांभूळवनाचा पैका वेचणारी ही गावातील तिसरी पिढी आहे. गावातील सर्व जांभळांच्या झाडांची मालकी परंपरेनं चालत आलीय. वाट्याला आलेल्या या झाडांचं जतन तीन पिढ्यांपासून प्रत्येक कुटुंब करत आलंय. वाट्याला आलेल्या झाडांतून प्रत्येक कुटुंबाला बक्कळ जांभळं मिळतात. त्यांचीच उठावेस्तर करता करता नाकीनऊ येत असल्यानं दुसऱ्याच्या जांभळांवर कोणी हात मारायला जात नाही. 


jambhul22तीन पिढ्यांची झालीय बेगमी

ही जांभळाची झाडं म्हणजे जणू पुराणवृक्षच! धिप्पाड अशा या झाडांच्या खोडाला सहज अर्धशतकाहून अधिक काळ लोटला असेल. जांभळाच्या झाडाला पाच वर्षांनी फळ येतं. या झाडांची निगा केवळ श्रमातून होत नाही. त्यासाठी पैसेही खर्च होतात. एका झाडाचा एका हंगामाचा खर्च जवळपास चार ते पाच हजार रुपये आहे. आणि एका झाडापासून एका हंगामात जवळपास २०-२५ हजारांचं उत्पन्न मिळतं. म्हणजे संपूर्ण गावाचा विचार केला तर या जांभळांतून दरवर्षी सुमारे तीन कोटींची उलाढाल होते.
गेले तीन पिढ्या हे लोक जांभळाचा व्यवसाय करत असले तरीही हा व्यवसाय कोणाला सुचला, कोणी सुरू केला याचा इतिहास मात्र यांना माहीत नाही. एवढंच नाही तर जन्मापासून बघत असलेली, वर्षानुवर्षं जांभळं पिकवत असतानाही त्यांना जांभळांच्या जाती किंवा प्रकारही माहीत नाहीत. पण बाहडोलीची जांभळं... म्हणजे आपली जांभळं याचाच त्यांना अभिमान वाटतो, हे त्यांच्याशी बोलताना प्रकर्षानं जाणवतं. 

 

jambhulअनुभवातून साकारलंय जांभूळपुराण

जांभळांबद्दलची शास्त्रोक्त माहिती नसली तरी बहाडोलीतील गावकऱ्यांच्या अनुभवातून आपलं म्हणून एक जांभूळपुराण तयार केलंय. आता हेच पाहा, त्यांच्या लेखी जांभळांचे प्रकार...


एक म्हणजे कालासोना... हे जांभूळ मोठं टपोरं, दाट जांभळ्या रंगाचं, आणि रसरशीत असतं. तर मोठ्या जांभळांना बदलापुरी जांभळं असं म्हणतात.


या बहाडोलीच्या जांभळांचं खास वैशिष्ट्य आहे, ही जांभळं मोठी, टपोरी आणि गोड रसाळ असतात. गर्द जांभळ्या रंगाची ही जांभळं दिसताक्षणी तोंडात टाकण्याची इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. या जांभळांमध्ये कीड लागण्याचं प्रमाणही कमी आहे. या जांभळाच्या झाडावर रोग येण्याची शक्यता खूप कमी असते. दोन प्रकारचे रोग या जांभळांवर पडतात. एक तर अळी पडते. पाऊस पडला की जांभळांना अळी पडते आणि ते निकामी होतं. तसंच कधी कधी जांभळांवर पांढरे डाग पडतात, तेव्हा ती ग्राहकांकडून खरेदी केली जात नाहीत. पण योग्य प्रकारची काळजी घेतली, योग्य औषध फवारणी केली, खतं नीट दिली तर या किडीला आळा घालता येतो. झाडाला मिळणारं पाणी आणि खतांची योग्य मात्रा याच्यावर जांभळाची चांगली प्रत अवलंबून असते. झाडाला जेवढं पाणी मिळेल तेवढी त्याला येणारी जांभळं मोठी आणि रसरशीत असतात. 


...आणि जांभूळगाव नामकरण झालं

इथल्या प्रत्येक कुटुंबाच्या शेताच्या बांधावर जांभळाची झाडं आहेत. २००२ला कोकण कृषी विद्यापीठानं या गावाची पाहणी करून बाहडोलीचं जांभूळगाव म्हणून नामकरण केलंय. कोकण कृषी विद्यापीठानं कोकण बहाडोली वाणही विकसित केलंय. वारा सुटला तर झाडावर पिकलेली जांभळं खाली पडतात आणि त्यांचं नुकसान होतं. पण ही पडलेली जांभळं वाया जाऊ नयेत म्हणून ही जांभळं वाळवून त्यांची घरच्या घरी वाईन बनवली जाते आणि जांभळाचं एक बायप्रॅाडक्ट तयार होतं. 

 

7e53c3839d24a1b2211ceb3e1f9d-grandeहवंय योग्य मार्केट
एवढी टपोरी, रसरशीत जांभळं या ठिकाणी पिकतात, पण त्यांना योग्य ते मार्केट मिळत नाही. बहाडोलीहून ही जांभळं वसई फाट्यावर विकायला जातात. तेच त्यांचं मार्केट. शहरात जेव्हा जांभळं येतात तेव्हा ती ४००-५०० रुपये किलोनं मिळतात, पण या जांभूळ उत्पादकांना मात्र तीच जांभळं अर्ध्यापेक्षाही कमी किमतीला विकावी लागतात. कारण मुंबईत आणून जांभळं विकणं त्यांना परवडत नाही, कारण त्यासाठी लागणारा वाहतूक खर्च या शेतकऱ्यांना परवडत नाही. कधी कधी व्यापारी येऊन जागेवर माल खरेदी करतात. तेव्हा तेही याच भावानं ते खरेदी करतात. त्यामुळं सरकारनं यात लक्ष घालून या जांभूळ उत्पादकांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी किंवा मुंबईपर्यंतची वाहतूक व्यवस्था तयार करून द्यावी, अशी मागणी बहाडोलीकर करतायत.

 

Comments (3)

  • माहिती व्यवस्थित मांडून, बहाडोलीच्या 'जांभूळ'चं येथील शेतकऱ्यांच्या आयुष्याशी असलेलं नातं स्पष्टपणे दर्शवले आहे.
    खुप छान!
    आभार...

  • स्टोरी झकास झालीये...

  • पूर्ण राज्यात जाम्भालाच उत्त्पन्न फक्त ठाणे जिल्ह्य तील पालघर तालुका मधील बहाडोली ह्या सुंदर आणि छोट्याचा गावामध्ये होत असते, हे उत्तप्न्न प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या शेवटी फक्त १५-२० दिवस मिळत असते जांभूळ हे एक फळ आणि त्याचे झाड औषधी असून ते शरीर साठी खूप लाभदायक आहे, असे असूनही आज ह्या फळाला बाजारामध्ये पाहिजे तेवडा भाव मिळत नाही त्यामुळे गावातील शेतकरी मार्केट भावाशी अजिबात खुश मिळत नाही,,,ह्याची दक्षता घ्यावी.........

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.