स्पेशल रिपोर्ट

एकाच झाडाला ५१ जातींचे आंबे

ब्युरो रिपोर्ट, वाशीम
विविध जातींची आंब्याची झाडं आहेत, हे आपणाला माहितीच आहे. पण आंब्याच्या एकाच झाडाला ५१ प्रकारच्या विविध जातींचे आंबे लागलेत.  हा चमत्कार नव्हे बरं का! वाशीमच्या रवी मारशटीवार या प्रयोगशील शेतकऱ्यानं आपल्या वडिलोपार्जित शेतीमधील एका ५० वर्षांच्या जुन्या गावरान आंब्याच्या झाडावर विविध दुर्मिळ, स्वादिष्ट आणि उच्च दर्जाच्या आंब्यांची कलमं केली आणि ही किमया घडली. आता पंचक्रोशीत आंब्याची बँक म्हणून ओळखलं जाणारं हे झाड विविध जातींच्या आंब्यांनी बहरलंय.
 

 

रवी मारशटीवार हे बीई सिव्हिलपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले उच्चविद्याविभूषित शेतकरी आहेत. मुंबई आणि आखाती देशात दहा वर्षं नोकरी केल्यानंतर मायदेशी शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपण शेती करत असतानाच इतर शेतकऱ्यांनाही आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा, यासाठी त्यांची धडपड असते. त्यादृष्टीनं त्यांनी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेती आणि शेतमाल यांच्या विविध जातींबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

 

AMBA 1५१ जातींच्या १३५० कलमांची बांधणी

आपल्या वडिलोपार्जित शेतामध्ये असलेलं जुनं ५० वर्षीय आंब्याचं झाड तोडण्यात यावं याबाबत मारशटीवार यांचा विचार सुरू झाला होता. मोसमात याला लागणाऱ्या गावरान आंब्यांपासून त्यांना फारसं उत्पन्नही मिळत नव्हतं. पण हे झाड तोडण्यापूर्वी आपण एक वेगळा प्रयोग करावा असा विचार मारशटीवार यांना सुचला. त्यानुसार त्यांनी या झाडावरच विविध जातींची कलमं करण्याचं योजलं. मुळात त्यांना वर्षानुवर्षं पिढीजात जोपासलेल्या आंब्याच्या गावरान जातीचं औत्सुक्य होतं. या जातींचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं, या उद्देशानं मारशटीवार यांनी गोड, रसाळ आणि चवदार आंब्यांच्या जाती जोपासण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते गेली चार वर्षं सातत्यानं प्रयोग करत होते. यासाठी त्यांनी विविध ठिकाणी जाऊन आंब्यांच्या उत्तम जातींची वाणं मिळवली. त्यानंतर वडिलोपार्जित शेतामध्ये असलेल्या या जुन्या ५० वर्षीय आंब्याच्या झाडाला विविध प्रकारच्या ५१ जातींच्या १३५० कलमांची बांधणी केली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत त्यांनी ही कलमं बांधली. त्यांच्या या प्रयोगाला मागील दोन वर्षांपासून फळ मिळू लागलंय. आज त्यांनी राबवलेल्या या प्रयोगातून जुन्या झाडाला ५१ जातींचे आंबे लगडलेले आहेत. कलमी, लंगडा, नारली, घोटी, हापूस, केळी, दशेरीबरोबर इतर गावरान प्रजातींची कलमं या झाडाला बांधून त्यांनी या जुनाट झाडाचं पुनर्वसनच केलंय.


AMBA 4आर्थिक गणितही साधलं

आपल्या या यशस्वी प्रयोगानंतर पहिल्या वर्षी मारशटीवार यांना या झाडापासून मिळालेले गोड, रसाळ आंबे त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना, आपले मित्र असलेल्या डॉक्टर, इंजिनीयर यांना भेटीदाखल दिले. पुढील वर्षापासून त्यांना या एका झाडाच्या आंबा उत्पादनाच्या विक्रीतून २० ते २५ हजारादरम्यान उत्पन्न मिळू लागलंय. आपल्या आंब्याच्या विक्रीसाठी त्यांनी कोणतीही वेगळी विक्रीव्यवस्था उभी केलेली नाहीये. त्यांच्या रसाळ आंब्याची ख्याती सर्वदूर पसरल्यानं ग्राहक स्वतः त्यांना संपर्क साधून जागेवरच या आंब्यांची खरेदी करतात. आंबा उत्पादनाच्या एकूण पाच वर्षांपैकी गेली चार वर्षं ते हा आपला व्यवसाय यशस्वीरीत्या करत आहेत. याशिवाय मारशटीवार यांनी आपल्या अडीच एकर शेतात या मूळ झाडापासून अशाच प्रकारे कलमं करून लागवड केली आहे. आज ही छोट्या रूपात असलेली झाडं पुढील वर्षापासून उत्पन्न देऊ लागतील आणि आपल्याला केलेल्या या नवीन आंबा लागवडीपासून दोन ते अडीच लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याची मनीषा मारशटीवार यांनी व्यक्त केली. अशा प्रकारे त्यांनी आपण राबवलेल्या आगळ्यावेगळ्या प्रयोगातून आपलं आर्थिक गणितही बऱ्यापैकी साधलंय.

 

आंब्यांच्या प्रजातींची जोपासना

या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाबाबत 'भारत4इंडिया'शी बोलताना मारशटीवार यांनी सांगितलं, "आपल्याच बापजाद्यांनी वर्षानुवर्षं जोपासलेल्या आंब्याच्या विविध चवदार जाती आजच्या घडीला लोप पावत चालल्या आहेत. प्रत्येक जण उठसूट फक्त हापूस, हापूसच म्हणतो. आंब्याच्या परंपरागत गावरान जातीही चांगल्या आहेत. त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं, तसंच जैविक विविधता जोपासणं हा या प्रयोगामागचा हेतू आहे. तो जवळपास पूर्ण झाल्याचं समाधान आज मला आहे. याशिवाय आंब्यांचं उत्पादन वाढल्यानं मला चांगला आर्थिक फायदाही झाला. हा प्रयोग आणखी तीन शेतकऱ्यांनीही केला असून त्यांनाही चांगलं यश आलंय.”


AMBA 6जुन्या झाडाचं पुनर्वसन
या यशस्वी प्रयोगामुळं मारशटीवार यांनी पिढीजात जुन्या आंब्याच्या झाडाचं जणू पुनर्वसनच केलंय. यामुळं विविध प्रजातींच्या आंब्यांची बँकच निर्माण झालीय. याशिवाय रवी यांनी आपल्यासोबतच आजूबाजूच्या तीन शेतकऱ्यांच्या शेतातही हा प्रयोग यशस्वीपणे राबवला. आंब्यांच्या फायदेशीर आणि गुणकारी प्रजातींचं रक्षण या प्रयोगामुळं होणार आहे, अशा शब्दात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे अकोला संशोधन केंद्र वाशीमचे अधिकारी बी. डी. गीते यांनी या प्रयोगाचं महत्त्व अधोरेखित केलंय.

आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून बदलत्या हवामानामुळं पारंपरिक जाती लोप पावत चालल्यात. त्यातच फायदा मिळतोय म्हटलं, की सर्व शेतकरी एकच गोष्ट करायच्या मागे लागतात. त्यातून मग एकाच प्रकारच्या शेतमालाची किंवा फळांची भरमसाट आवक वाढते आणि दर पडतात. परिणामी शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज होत नाही. त्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग करून त्यातून परंपरागत गोष्टी नव्यानं पुढं आणण्याची गरज आहे. त्यादृष्टीनं मारशटीवार यांच्या या प्रयोगाचं मोल खूप मोठं आहे.

 

संपर्क : रवी मारशटीवार -  9823748863

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.