स्पेशल रिपोर्ट

जीएमओ आणि मानवी आरोग्य

डॉ. शैला वाघ, आरोग्य तज्ज्ञ
जीएमओ म्हणजेच जेनेटिकली मोडिफाईड ऑर्गेनिझम याचाच अर्थ असा की जनुकीय बदल केलेला जीव. प्रत्येक जीव जातीचे गुणधर्म त्यांच्या जनुकांवर अवलंबून असतात. ही विशिष्ट जुनके त्या त्या वनस्पती अथवा प्राणी किंवा जंतुंच्या पेशीत स्थित असतात.

kiwi-orange        प्रयोगशाळेत बियाणे तयार करताना एखाद्या वेगळ्या प्राण्यांची जनुकं बीजामध्ये टाकण्यात येतात. ज्याजोगे त्या प्रजातीच्या गुणधर्मातच बदल होतो आणि एक नवीन अनोळखी जीव तयार होतो. जेसे की बी.टी. कापूस- कापसाच्या बियाण्यात बॅसिलस थिरुजेन्सीस (B.T.) या जंतुची जनुके घालण्यात आली. ज्यामुळे कापसाच्या रोपातच किटकनाशक तयार होते. संपूर्ण रोपच विषमय होऊन किटकांपासून वाचू शकते. शिवाय ते तणनाशक प्रतिबंधकही बनते. ज्यायोगें प्रभावी तणनाशकाचा मारा केल्यास आजूबाजूच्या वनस्पती, किटक नष्ट होऊन केवळ कापसाचे रोप फोफावते. वरवर पाहता हे फायद्याचे वाटले तरीही ही पद्धत अनैसर्गिक, प्रदूषणकारी, पर्यावरण आणि आरोग्याला घातक ठरत आहे. हे अनेक अभ्यासकांच्या अनुभवावरुन सिद्ध झालंय.

           जीएम पिकांबद्दल अनेक दावे केले जातात. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी जीएम तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही असा प्रचार बियाणे कंपन्या व त्यांना अनुकूल राजकारणी करत आहेत. परंतु हे सर्व दावे फोल आहेत. जीएम पिकांमुळे किटकनाशकाचा वापर कमी होईल असं सांगितलं जातं. पण इथे पूर्ण वनस्पती स्वत:च किटकनाशक बनते हे विसरुन कसे चालेल? शिवाय प्रकृतियमांनुसार किटकांची प्रतिकार शक्तीही वाढू शकते. मग एकाऐवजी अनेक जनुके बदलणें इतर नवनवीन किटकनाशकांचा वापर अनिवार्य बनते.
तणनाशकाचा मारा जीएम पिक सहन करु शकते. त्यामुळे अत्यंत जालीम ग्लायफोसेट वापरण्यात येते. ज्यायोगे जमिनीतील गांडूळ, किटक आणि इतर वनस्पती नष्ट होतात. जमिनीचा कस कमी होतो. पारंपरिक शेती पद्धतीत शेतकरी एकाच शेतात एकाच वेळी २ किंवा ३ पूरक पिकं घेतो. नैसर्गिकरित्या जमिनीचा कस राखला जातो. जीएमओ पद्धतीत हे शक्य नाही. हळू हळू जमीन क्षारयुक्त व नापिक बनते. कृत्रिम युरिया खते अनिवार्य बनतात. कधी कधी तणही (superweeds) तणनाशकांना जुमानीत नाही. मग अधिक शक्तीमान औषधे मारावी लागतात.
जीएम शेती म्हणजे केवळ बड्या कंपन्यांचा फायदा आणि आपल्या सुजलाम सुफलाम भूमिची नासाडी. गंभीर म्हणजे जी कंपनी बियाणे विकते तीच किटकनाशक व तणनाशकही विकते. शेतकऱ्याला स्वत: चे बियाणे तयार करण्यावर प्रतिबंध घालण्यात येतो. त्याच्या न कळत जरी त्यांच्या शेतात जीएमओ उगवले तरीही तो कायद्याने दंडाला पात्र ठरतो. जीएम पिके फायद्याची व कमी खर्चाची अजिबात नाहीत. उलट नैसर्गिक, पारंपरिक किटकनाशक विरहीत शेती अधिक यशस्वी व आरोग्यदायी आहे हे सिक्कीम, आंध्रप्रदेश व अन्य काही प्रांतांच्या अनुभवावरुन सिद्ध झालंय.
जीएम पिकं मनुष्य आणि इतर प्राण्यांसाठी पूर्णत: सुरक्षित आहेत असाही दावा केला जातो. केवळ नव्वद दिवस प्रयोगशाळेतीत प्राण्यांवर प्रयोग करुन हा निष्कर्ष काढण्यात आला. परंतु हा कालावधी अतिशय अपुरा असून बियाणे कंपन्यांद्वारा केलेल्या अभ्यासात अनेक महत्त्वाच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.

जीएम तंत्रज्ञान वारुपन तयार केलेल्या अन्नामुळे तीन प्रकारे धोका संभवतो.
१) बियाण्यात जनुकबदल केल्यानं रोपात जे बीटी अथवा अन्य टॉक्झिन तयार होते ते सुक्ष्म प्रमाणातही आपल्या शरीरात गेले तरी कालांतराने इंद्रियांना हानी पोहचू शकते.
२)जनुकबदल केल्यानं अन्नाचे गुणधर्म, पोषक तत्वे बदलू शकतात याचाही परिणाम शरीरावर होतो.
३) जीएम पद्धतीत तणनाशक व नवनवीन किटकनाशके वापरणे गरजेचे बनते. राऊंडअप रेडी (Roundup Ready) हे व्हिएतनाम युद्धात संहारक ठरलेले कुप्रसिद्ध तणनाशक मुख्य: वापरले जाते. याचा अंश अन्नात, जमिनीत, पाण्यात उतरुन अनेक व्याधींचे कारण बनु शकतो. विशेषत: गर्भवती स्त्रिया, गर्भ, अर्भक व बालके या परिणामांना बळी पडण्याची जास्त शक्यता आहे.Brinjal-Varieties

नामांकित प्रयोगशाळांच्या अभ्यासात जीएम अन्नाचे प्राण्यांवर परिणाम दिसून आले. यात आतड्याला सूज येणे, क्षेत (ulcer), ट्यूमर, कॅन्सर अशा व्याधी दिसून आल्या. बिजांड, यकृत, मुत्रपिंड यांच्या कार्यात बिघाड होतो असं आढळून आलं आहे. जीएम प्रक्रियेमुळे जे नवीन प्रथिन तयार होते त्यामुळे अनेक अॅलर्जिक रिअॅक्शन्स दिसून येतात.
सन २००० मध्ये जीएम मक्याची सरमिसळ झाल्यानं अमेरिकेत अनेकांना जोरदार अॅलर्जिक रिअॅक्शन्स झाल्या. शिवाय सन १९८९ मध्ये अमेरिकेतच एक विचित्र आजार दिसून आला. ज्यात इझिनोफिल रक्तपेशीत वाढ, स्नायुदुखी व पॅरेलिसिसचे रोगी आढळले. (EMS). यामुळे ३७ रोगी मरण पावले व १५०० विकलांग झाले. याच्या कारणांचा शोध घेतला असता L- TRYPTOPHAN ह्या पूरक अन्नघटकामुळे हा आजार झाल्याचे सिद्ध झाले. हा पूरक अन्नघटक जपानमध्ये जीएम तंत्रज्ञान वारुन तयार करण्यात आला होता. ताबडतोब हे पूरक अन्न बाजारातून मागे घेण्यात आले व प्रकरण संपविण्यात आले.
अशा अनेक कारणांमुळे जीएम तंत्रज्ञानाला जगभरातून विरोध होतोय. युरोप व इतर काही देशांत यावर बंदी घातली गेली आहे. परंतू हे घातक तंत्रज्ञान बीटी कापसाच्या रुपाने आपल्या देशात आले. बीटी वांगे प्रखर विरोधामुळे आपल्या देशात येऊ शकले नाही.
आता BRAI बिलद्वारे तांदूळ, मका, सोया, टामॅटो, रबर अशा अनेक प्रकारात ह्या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे शेती, पर्यावरण व आरोग्यासाठी ही धोक्याचीच घंटा आहे.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.