'ऑफ रोड ड्रायव्हिंग' हा श्रीमंत आणि हौशी लोकांचा शहरी खेळ, आतापर्यंत फक्त टीव्हीवर पाहिलेला. पण सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजमधील आणि परिसरातील नागरिकांना तो प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोहिते कुटुंबियांनी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. बैलगाड्यांच्या शर्यती अनुभवण्यासाठी जशी गर्दी होते तशी गर्दी ठिकठिकाणी लोकांनी केली होती. कोण म्हणायचं...नव्हं या डबक्यातून गाडी कशी नेणार? या चढावर कसं व्हायचं हो? या राडारोड्यात चाकं रुतणार नाहीत व्हंय? इथं गाडी फेल तर हुणार नाय नव्हं? पाहणाऱ्यांचे असे नाना प्रश्न. पण स्पर्धकांनी हे सर्व अडथळे पार केले आणि प्रेक्षकांना तोंडात बोटं घातली. महिंद्रा थार....जीप्सी.....अशा फक्त टीव्हीवर दिसणाऱ्या गाड्या...त्यांचे वेगळे आणि मोठमोठे टायर्स....सगळंच नविन आणि त्यांच्यासाठी कुतुहलाचा विषय होता. रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या डोगरांतून, खडड्यांतून कशा चालतात, याचचं सर्वांना अप्रुप होतं.
ग्रामीण भागात वाढता प्रतिसाद
परदेशात होणारा हा खेळ आता भारतीयांच्यही आकर्षणाचा विषय होत चाललाय. 'ऑफ रोड ड्रायव्हिंग'चा ह खेळ भारतात आणि महाराष्ट्राच्या काही भागात सुरु झालाय. कोल्हापूर, सातारा या ठिकाणी दर वर्षी अशी स्पर्धा घेण्यात येते. अकलूजसारख्या छोट्या शहरात ही स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आली. महाराष्ट्राबरोबरच राज्याबाहेरुन कर्नाटकातून काही जण यात सहभागी झाले होते. जीप, जीप्सी, पजेरो अशा जवळपास 50 गाड्यांनी यात सहभाग घेतला होता.
'ऑफ रोड ड्रायव्हिंग' चं वेगळेपणं...
'ऑफ रोड ड्रायव्हिंग' स्पर्धेमध्ये कोणतीही चढाओढ नसते, कोणाला हरवणं नसतं... कुठलंही बक्षीस नसतं... कसले नंबर्स काढले जात नाहीत. फक्त अडथळे पार करत फिनीश पॉईंटला जाणं. त्यामुळं यात असते ती फक्त धम्माल आणि एन्जॅायमेंट. अनेक ठिकाणी गाड्या अडकतात, पुढे जाऊ शकत नाही... अशा वेळी जोपर्यंत ती गाडी निघणार नाही तोपर्यंत स्पर्धा संपत नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणं, कोणालाही मागं न सोडणं, हा या स्पर्धेचा अलिखीत नियम असतो. त्याचं तंतोतंत पालन इथही झालं.
स्पर्धेतील गाडीचं वेगळपण
साधारणपणे शहरी भागात वापरल्या जाणाऱ्या गाड्या ह्या ग्रामीण भागात चालत नाहीत. तिथले रस्ते, चढउतार, यासाठी धडधाकट गाड्या लागतात. या खेळासाठीही अशाच वेगळ्या हटके गाड्या लागतात, कारण तिथं रस्तेच नसतात आणि गाडी चालवायची असते. कुठं सरळ खडकाळ चढण तर कुठे कमरेएवढं पाणी आणि चिखल. म्हणुनच सर्वसाधारणपणे रस्त्यावर धावताना दिसणाऱ्या चारचाकी गाड्या, या 'ऑफ रोड ड्रायव्हिंग' साठी चालत नाहीत. जीप, जीप्सी अशा गाड्यांचा वापर केला जातो. पण कंपनीकडुन येणारी गाडीही जशीच्या तशी वापरता येत नाही. त्यातही बदल करावा लागतो. गाडीत विशिष्ट बदल करुन त्या या स्पर्धेसाठी वापरतातं. त्यासाठी त्यांना वेगळे टायर्स टाकले जातात जे पाण्यात, चिखलात, डोंगरावर सहज चालू शकतील. कधी-कधी झाडांतून, जंगलांतून जाताना झाडं काचेवर येऊ नयेत म्हणुन बोनेटपासून दोन्ही बाजूंना ब्रान्च कटर लावलं जातं. जास्त पाटे लावले जातात, कधी गाडी उलटली तर गाडीचं फार नुकसान होऊ नये म्हणून गाडीच्या मागच्या भागाला रोलकेज लावले जातात. जेणेकरुन गाडी उलटली तर रोलकेजवर गाडीचा भार येतो आणि ड्रायव्हरला इजा होत नाही. अशा प्रकारे गाडीत बदल केले की गाडी 'ऑफ रोडींग'साठी तयार होते.
हवी असते मनाचीही तयारी...
या खेळासाठी जशी गाडी तयार करावी लागते, तसंच मनाचीही तयारी होणं खूप महत्वाचं असतं. कारण नेहमीच्या रस्त्यावर गाडी चालवणं आणि अशा 'ऑफ रोड'वर खाचखळग्यांमध्ये गाडी चालवणं यात खूप फरक आहे. 'ऑफ रोड ड्राइव्ह' करायला एक तर स्वत:च्या ड्रायव्हिंगवर आणि स्वत:वर विश्वास हवा. जबर आत्मविश्वास हवा. ड्रायव्हिंग स्किल यायला हवीत, चढ असेल तर कुठल्या गिअरवर गाडी चालवायची, उतार असेल तर कशी गाडी चालवायची याचं प्रशिक्षण आणि माहिती असायला हवी.
साहसी खेळ...
एक साहसी खेळ म्हणजेच 'अॅडव्हेंचर स्पोर्ट' म्हणुन हा खेळ चांगला असला तरीही तो सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाहीये. कारण या खेळासाठी लागणाऱ्या गाड्या वेगळ्या आहेत. ज्या घेणं सर्वसामान्यांना परवडणारं नाहीये. तसंच या खेळात गाडीचं किती नुकसान होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळं एका खेळानंतर गाडीसाठी कीती खर्च करावा लागेल, याचा अंदाज नाही. म्हणूनच 'ऑफ रोड ड्रायव्हिंग'चा हा खेळ चित्तथरारक आणि साहसी असला तरी सामान्य माणसापासून तेवढाच दूर आहे. तरीही त्यातील साहस आणि चित्तथरारकपणामुळं तो पाहणं हे मोठं मनोरंजक असतं. अकलूजकरांनी त्याचा पुरेपूर अनुभव घेतला.
Comments (1)
-
चित्तथरारक असा अनुभव... स्वतः गाडी चालवावी आणि ह्या साहसी खेळात सहभागी व्हावं, असं ही बातमी पाहून वाटतं.