गांधी विचार संपणार नाहीत...
2 ऑक्टोबरला काय असतं...ड्राय डे! यांसारख्या बाष्कळ विनोदांची निर्मिती असो किंवा 'गांधी विचारांमुळं एकाच्या तरी मनात हिंसा उत्पन्न झालीच ना', यांसारख्या हिंसक प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या विचारांची मांडणी असो. गांधीजींच्या खूनाचं समर्थन करणाऱ्या प्रवृत्तींनी केलेल्या अशा प्रचारातून तावूनसुलाखून निघालेले 'गांधी विचार' आज जगभरात तेजानं झळकतायत. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात महात्मा गांधींच्या विचारांचा जयजयकार करीतच तरुणाई रस्त्यावर उतरते. तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार, गांधी विचारांची परीक्षा देतात आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गांधींजींचे पाईक बनून जीवन जगतात. गांधी विचारांनी प्रेरीत झालेली अशी शेकडो यशस्वी उदाहरणं आजही पहायला मिळतात. काळ कितीही बदलला तरी गांधीजींचे विचार काही संपणार नाहीत, हेच यावरुन सिद्ध होतं.
सोशल नेटवर्कही गांधीमय...
फेसबुकसारख्या सध्या चलती असलेल्या सोशल नेटवर्कमध्ये आज सहज डोकावलं तरी आजची तरुणाई आणि एकूणचं जग किती गांधीमय झालंय याची साक्ष पटते. गांधीचा खून केला म्हणून गांधी विचार काही संपणार नाही. गांधी नावाचा 'केमिकल लोचा' कळत नसला तरी डोक्यातून काही जात नाही. मनात खोलवर कुठंतरी वाटतं राहतं...तुमचेच विचार खरे, यांसारख्या विचारांनी तरुणाईचे वॉल भरुन गेलेत. 'हे महात्म्या, आज तुझीच खरी गरज आहे. ये तू परतूनी...' अशी सादही अनेक तरुणांनी घातलेली पहायला मिळतेय.
सत्याचे प्रयोग...
साबरमतीपासून ते वर्ध्यातील गांधी आश्रमापर्यत तसंच गांधींजींच्या सहवासानं पावन झालेला पुण्याचा आगाखान पॅलेस, मुंबईतील मणिभवन, यांसारख्या गांधी स्मारक असलेल्या या वास्तू पाहण्यासाठी वर्षभर लोकांची रिघ लागलेली असते. विशेष म्हणजे, त्यात तरुणांचा सहभाग मोठा असतो. आमच्या आश्रमाला भेट देणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय असते. केवळ भेट देऊन ते परतत नाहीत तर जाताना गांधी विचारांची पुस्तकं आवर्जून घेऊन जातात, अशी माहिती वर्ध्याच्या गांधी आश्रमच्या व्यवस्थापकांनी दिली. 'सत्याचे प्रयोग' हे गांधीजींचं आत्मचरित्र जगभरातील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतरीत झाले असून त्याला दिवसेदिवसं वाढती मागणी आहे. आजची तरुणाई गांधी विचारांकडं आकर्षित होत असल्याचंच हे द्योतक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
गांधी विचारांचे उपक्रम हाऊसफुल्ल...
जळगावला जैन उद्योग समूहानं उभारलेलं गांधी रिसर्च फाउंडेशन असो किंवा बिर्ला कॉलेजचा गांधीयन स्टडी सेंटरसारखा उपक्रम. इथून होणाऱ्या गांधी विचारांच्या प्रसारातही तरुणाईचीच संख्या जास्त असते. महात्मा गांधींच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून २००७ पासून गांधीयन स्टडी सेंटरच्या माध्यमातून देशभरातील युवकांसाठी युवा शिबिराचं आयोजन करण्यात येतं. हे वर्ग हाऊसफुल्ल असतात. गांधींचे विचार आजही तितकेच परिणामकारक असल्याचं हे द्योतक आहे, असं आयोजनकर्त्यांनी सांगितलं.
जळगावचं गांधी रिसर्च फाउंडेशन...
जळगावच्या जैन उद्योग समूहानं 2004 मध्ये उभारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशनचं नाव तर आता जगभरात झालंय. उद्योगपती भंवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा प्रकल्प पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येतात. इथंही तरुणाईचा मोठा राबता असतो. गांधी रिसर्च सेंटरची नवी वास्तू 50 हजार चौरस फूट जागेत आहे. गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत या रिसर्च सेंटरनं महात्मा गांधी यांच्याबद्दल माहितीचा अमूल्य ठेवा गोळा केलाय. गांधीजींचं साहित्य, त्यांच्या वापरातील वस्तू, नाणी, टपालतिकिटं, वेगवेगळ्या प्रसंगांतील छायाचित्रं, गांधीजींची भाषणं, लेख हे सर्व या ठिकाणी पाहता येतं. इथं गांधीजींच्यावर लिहिलेली 5 हजार 875 पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यात मराठी भाषेतील 596, हिंदी 1 हजार 438, इंग्लिश 2 हजार 569, गुजराती 1 हजार 115 आणि इतर भारतीय भाषांतील 132, विदेशी भाषेतील 25 यांशिवाय गांधीजीलिखित पुस्तकं त्यांची भाषांतरे-अनुवाद इत्यादी : 2 हजार 446 पुस्तकं. तसंच गांधीजींची 4 हजार 156 छायाचित्रं आणि 51 चित्रपट, माहितीपट, असा गांधी विचारांचा अक्षरक्ष खजिना इथं आहे.
जगानं मोहोर उठवलेली गांधीविचार परीक्षा...
मेक्सिकोतील सायटस विद्यापीठ, सिंगापूर येथील शाळा आणि अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाशी "गांधी रिसर्च फाउंडेशन'चा करार झालेला आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून घेतली जाणारी 'गांधीविचार परीक्षा' याच्या यशस्वीतेवर आज जगानं मोहोर उठवलीय. पाचवी ते महाविद्यालयातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. याशिवाय देशभरातील तुरुंगातील कैद्यांसाठीही ही परीक्षा घेतली जाते. लाखो विद्यार्थी आणि हजारो कैद्यांनी ही परीक्षा पास केलीय. या परीक्षेमुळंच शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आज गुणी माणसाचं जीवन जगत आहेत. काही जण तर गांधी विचारांच्या प्रसाराचं काम करीत आहेत. आगामी काळात पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट अभ्यासक्रम राबवण्याचा तसंच 'गांधीविचार परीक्षे'चा जगभरात विस्तार करण्याचा तसंच गांधीजींवर येणाऱ्या नव्या साहित्याचा अभ्यास करण्याचा फाऊंडेशनचा मानस असून त्याला तरुणाईचा आतापर्य़ंतसारखाच उस्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा व्यवस्थापकांना विश्वास आहे.
तरुणाईलाही भुरळ घालतेय खादी...
गांधीजींच्या प्रेरणेतून खादी कपडे वापरण्याची परंपरा जोपासली जाते. पॉलिस्टर, टेरिकॉट, सिंथेटिक आदींना मागे सारत आता खादीनं तरुणाईलाही भुरळ घातली आहे. तरुणांबरोबरच सर्वच वर्गांमध्ये खादीची क्रेझ वाढतेय. टकाटक जीन्सवर खादीचा झब्बा घालून आजची तरुणाई मिरवते आणि वेळ आली तर तेवढ्याच सहजतेनं गांधी टोपी घालून गांधीगिरीसाठी सज्ज होते, असं चित्र पहायला मिळतेय. देशभरातील खादी भांडारात खरेदी करण्यासाठी येणारे कॉंग्रेस कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबरीनं आता युवक आणि युवतीचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढलंय, अशी माहिती खादी ग्रामोद्योगच्या सूत्रांनी दिली. खादी वस्तू भांडारात तयार होणारे विविध रंगी शर्ट युवकांना आकर्षित करीत असून, लेडी टॉप आणि कुर्त्याने युवतींना भुरळ घातली आहे. दिवसेंदिवस खादीच्या खपात चांगलीच वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खादीच्या विक्रीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील १४ लाख ९७ हजार लोकांना खादी वस्त्रोद्योगामुळे रोजगार मिळतो, असं स्पष्ट झालंय.
...आता तुम्हीच सांगा, गांधी नावाचा हा केमिकल लोचा कसा संपेल बरं!!!
Comments
- No comments found