स्पेशल रिपोर्ट

'नॅचरल' जलसंधारण मॉडेल...!

ब्युरो रिपोर्ट, उस्मानाबाद
मराठवाडा नुकताच दुष्काळानं होरपळून निघाला. या आपत्तीनं जनतेला बरंच काही शिकवलं. ही इष्टापत्ती मानून अनेक संस्था, संघटना आणि सेवाभावी लोकांनी जलसंधारणाची कामंही केलीत. नुकत्याच झालेल्या पावसानं या कामांना आता पालवी फुटलीय. बी. बी. ठोंबरे यांच्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्री या आदर्श खासगी साखर कारखान्यानं लोकसहभागातून केलेली जलसंधारणाची कामं त्यापैकीच एक. सौंदना आंबा आणि परिसरातील पंचवीस गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळं आज समाधान झळकतंय.
 


k2आपत्ती इष्टापत्तीत बदलली...

मराठवाड्यात यावर्षी दुष्काळ पडला. प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कुठून मिळणार? त्यामुळं शेतीला विशेषत: उसाच्या पिकाला मोठा फटका बसला. साहजिकच साखर कारखाने अडचणीत आले. नॅचरल साखर कारखानाही त्यातून वाचला नाही. मात्र सेवाभावी वृत्तीनं जनसेवेत कार्यरत असलेल्या ठोंबरे यांनी दुष्काळाला कायमचं संपवण्याचा संकल्प केला. लोकांना संघटित करून त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि लोकसहभागातून २१ जानेवारी रोजी जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ केला. त्याला आता गोड फळं आली असून कळंब तालुक्यातील सौंदना आंबा आणि परिसर जलसंधारणाच्या कामांचं रोल मॉडेल म्हणून पुढं येतोय.

 

नॅचरल साखर कारखान्याचा उपक्रम...
कुणीही यावं आणि राजकीय फायद्यासाठी ओरबडावं, अशा वृत्तीमुळं राज्यातील साखर कारखानदारी पुरती बदनाम झालीय. पण कारखान्यांना दूरदृष्टी असलेलं स्वच्छ नेतृत्व लाभलं तर काय चमत्कार होऊ शकतो, हे नॅचरल कारखान्यानं दाखवून दिलंय. जलसंधारणाच्या कामांमुळं सौंदना आंबा आणि परिसरातील माळरानावर आज अक्षरक्ष: नंदनवन फुललंय. या कारखान्यानं केवळं जलसंधारणाची कामं केलेली नाहीत. तर वीजनिर्मिती, स्टील प्रकल्प, डिस्टिलरी, साखर शुद्धीकरण, डेअरी, शाळा महाविद्यालय, रुग्णालय, रस्ते जोडणी, टेलिफोन एक्स्चेंज, कामगारांना मोफत घरे, नॅचरल पाल्य पेन्शन योजना, पतसंस्था, नॅचरल बाजार आणि आता नॅचरल जलसंधारण मॉडेल अशी विकास कामांची जंत्रीच उभी केलीय. जलसंधारणाच्या या वेगळ्या, चांगल्या प्रयोगामुळं दुष्काळी परिस्थितीनं नेहमी गांजलेला उस्मानाबाद जिल्हा पुन्हा एकदा चर्चेला आलाय.

 


दहा गुंठ्याच्या मालकाला ट्रॅक्टरची स्वप्नं...
जलसंधारणाच्या या प्रयोगामुळे पिकं फुलू लागलीत आणि दहा गुंठेवाला शेतकरीही ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न पाहू लागलाय. नॅचरल कारखान्यानं ऊस पीक घेणार्‍या शेतकर्‍यांना मदत केली आणि त्या मदतीच्या आधारावर श्रमदानातून अनेक ठिकाणी बंधारे उभारले. अनेक ठिकाणी विहीर पुनर्भरणाची कामं झाली. यामुळं आधीमधी पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये दिसणारं पाणी आता इथं बारमाही खळाळतंय. शेतकऱ्यांच्या तळ गाठलेल्या विहिरी आणि कोरड्या पडलेल्या बोअरवेलनाही भरपूर पाणी आलंय, अशी माहिती विलास पालकर या शेतकऱ्यानं दिली.

 

Jalsandharan 3गावचा पाण्याचा प्रश्नही सुटला...
मराठवाड्यातला सगळ्यात दुष्काळी भाग म्हणून सध्या उस्मानाबादचं नाव घेतलं जातं. पण आता आम्ही केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळं ही आमची ओळख बदलणार आहे. सरकारच्या मदतीची वाट पाहता आम्ही जे राबलो, त्याला आता फळं आलीत. पाण्याचा फायदा झालेल्या 25 गावांत कुठंबी जा, अल्पभूधारकापासून ते जमीनदारापर्यंत सर्वजण तुम्हाला सुखी दिसतील. विशेष म्हणजे शेतीबरोबरच गावच्या पाण्याचा प्रश्नही सुटलाय, अशी माहिती धोंडीराम पालकर या शेतकऱ्यानं दिली.

 


‘नॅचरल जलसंधारण मॉडेल’ची वैशिष्ट्यं...
1. दुष्काळी भागात कमी दिवसांत अधिक पाऊस पडतो. त्यामुळं अधिक पाणी साठवण्याची गरज पूर्ण करणारं मॉडेल.
2. भूस्तरावर साठवलेलं पाणी उष्णतेनं वाया जातं, हे लक्षात आल्यानं शिवारावर पडणारं पाणी त्याच शिवाराच्या जमिनीच्या पोटात साठवून ठेवणारं मॉडेल.
3. पहिल्या स्तरात आपापल्या जमिनीत नालाबंडिंग, विहीर पुनर्भरण, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी मुरवून जलस्रोत रिचार्ज करणं.
4. दुस-या स्तरात अतिरिक्त पाणी ओढ्यात आणणं. समतल पाझर तलाव, ओढा रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या माध्यमातून त्याचा वेग कमी करणं आणि साठवणं, जे मुरमाड जमिनीत लगेच जिरायला सुरवात होते. (शिरपूर मॉडेलमध्ये खोलीकरण अधिक खोल आहे, यात ते 4 ते 5 मीटरच आहे.)
5. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी अडवणं शक्य. एक किलोमीटर पाझर कालव्यात 65 हजार घन मीटर पाणी जिरवण्यास फक्त पाच लाख रुपये, तर ओढा खोलीकरणास 5 किलोमीटरसाठी 5 ते ७ लाख रुपये.
6. जमीन संपादनाचा प्रश्न नाही, कारण पडीक आणि हलकी जमीन वापरता येते. जेथे जमीन लागते तेथे शेतकरी स्वत:हून जमीन देतात असा अनुभव.
7. जवळपास 30 किलोमीटर लांबीचे पाझर तलाव आणि ओढा खोलीकरणाची कामे 5 महिन्यांत पूर्ण. म्हणजे कमी काळात हे मॉडेल साकारतं.
9. पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे, मात्र सर्वांनी जलसंधारण केल्याशिवाय ते सर्वांना मिळू शकत नाही, हे मान्य करायला लावणारं मॉडेल.
10. जलसंधारणासोबत गवत आणि योग्य ती झाडं लावण्याचं काम होत असल्यानं जमीन, ओढे, तलावात माती, मुरूम पडणे रोखले जाणार. म्हणजे धूप होणार नाही.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.