स्पेशल रिपोर्ट

महागाईत आधार स्वस्त भाजी केंद्रांचा!

रोहिणी गोसावी, मुंबई
भाजीविक्रेत्यांच्या मनमानीला कारभाराला आळा बसून मुंबईतील गृहिणींना रास्त भावात ताजा भाजीपाला मिळावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं (एपीएमसी) शहरात स्वस्त भाजीपाला केंद्रं सुरु केलीत. थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करुन बाजार समितीच्या केंद्रांमार्फत तो ग्राहकांना वितरीत केला जातो. यामुळं दुप्पट, तिप्पट जादा दर आकारुन विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर तर आटोक्यात आलेच. शिवाय दररोज ताजी, स्वच्छ भाजी मुंबईकरांना मिळू लागलीय. या योजनेला मिळालेलं यश लक्षात घेऊन पुणे आणि नंतर मोठ्या शहरांतून ही योजना राबवण्याचा संकल्प राज्याच्या कृषी, पणन खात्यानं केलाय.
 

  

विक्रेत्यांच्या मनमानीला आळा बसला 

वाढत्या माहगाईचा फटका सगळ्यात आधी कोणाला बसत असेल तर तो गृहिणींना. रोजच्या जेवणाचा विषय मार्गी लावण्यासाठी मार्केटमध्ये गेलं, की महागाईच्या झळा बसायला सुरवात होते. साधी कोथिंबीरीची एक जुडी घ्यायची म्हटली तरीही 20 रुपये मोजावे लागतात. जेवण बनवण्यासाठी आवश्यक सर्व भाजीपाल्याची हीच अवस्था.Vegetable 1 गावाकडं भाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडं चौकशी केली तर त्यांना मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत चौपट, पाचपट दर. म्हणजे मधला सगळा पैसा विक्रेते आणि कमिशन एजंटांच्या खिशात. भुर्दंड मात्र ग्राहकांना. याबाबतच्या मुंबईतील गृहिणींच्या भावना लक्षात घेऊन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृषी व पणन मंत्रालयामार्फत ही स्वस्त भाजीपाला केंद्र सुरु केली. यामुळं भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याला दोन पैसे जादा मिळू लागलेत आणि ग्राहकांनाही रास्त दरात ताजी भाजी मिळतेय. साहजिकच याल मुंबईकर गृहिणींचा तुफान प्रतिसाद मिळतोय.

 

 

मुंबईत सुरू आहेत 120 केंद्र
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग, पणन मंडळ आणि घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम सुरु सुरु करण्यात आलाय. शेतकरी एपीएमसीत ज्या भावानं भाजीपाला खरेदी करतात त्याच भावानं सर्व प्रकारची भाजी या स्वस्त भाजी विक्री केंद्रात विकली जाते. एपीएमसीत भाजीपाला आल्यानंतर त्याचं वर्गीकरण केलं जातं, मग पॅकिंग होतं. क्रेटमध्ये व्यवस्थित ठेवलं जातं, आणि नंतर ट्रकनं हे क्रेट या स्वस्त भाजीविक्री केंद्रांवर पाठवले जातात. एपीएमसीत रोज भाज्यांची खरेदी होते, त्यांमुळं या केंद्रांवर जाणार भाजीपाला हा ताजा भाजीपाला असतो. मुंबई, मुंबई उपनगरं आणि ठाण्यात मिळून 112 ठिकाणी ही स्वस्त भाजीपाला विक्री केंद्र गेले चार महिन्यांपासून सुरु आहेत, अशी माहिती एपीएमसीचे अप्पर आयुक्त आणि सचिव सुधीर तुंगार यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिली.


लाखो रुपयांची उलाढाल
मुंबईला रोज जवळपास तीन हजार टन भाजीपाला आणि कांदा बटाटा लागतो, त्यापैकी 200 टन भाजीपाला कांदा बटाटा सध्या या स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रांमार्फत पुरवला जातो. म्हणजे रोज जवळपास 80 लाखांची उलाढाल या स्वस्त भाजीविक्री केंद्रामार्फत होते. अशीही माहिती सुधीर तुंगार यांनी दिली.

 

Vegetable 7स्थानिक संस्थांची मदत
नागरिकांना त्यांच्या घराजवळ स्वस्त भाजीपाला उपलब्ध करुन देण्यासाठी 'अपना बाजार' सारख्या सहकारी संस्थांची मदत घेण्यात आलीय. मुंबई आणि उपनगरांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी 'अपना बाजार' सुरु आहे त्या-त्या ठिकाणी या भाजीपाला विक्री केंद्रांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून घाऊक बाजारात भाजी खरेदी करून ती त्याच दरात या केंद्रांवर विकली जाते. त्यामुळे बाजारात असलेल्या भावापेक्षा जवळपास 30 ते 50 टक्के कमी दरात मुंबईकरांना हा भाजीपाला उपलब्ध होतोय. भाजीपाला विक्री केंद्रांची वेळ सायंकाळी ६ ते रात्री ८ अशी असली , तरी ग्राहकांच्या गर्दीमुळं ही केंद्रं रात्री उशिरा १०पर्यंत सुरू असतात. प्रत्येक केंद्रावर तीन असे ११२ केंद्रांवर मिळून ३३६ कर्मचारी व त्यावर देखरेखीसाठी २४ अधिकारी कार्यरत आहेत. भाजीपाला विक्रीची वेळ सायंकाळची असली तरी भाजीपाल्याची निवड, पॅकिंग, ग्रेडिंग करण्याचं काम सकाळी ६ वाजताच सुरू होतं.

 


सुकाणू समिती

स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रं सुरु करण्यासाठी, त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आलीय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग, पणन मंडळ आणि घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ या चारही संस्थांचे प्रतिनिधी या समितीत आहेत. परिसरात भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकरी गटांचा आढावा घेणं, नवीन गट निर्माण करणं, सध्या कार्यरत असणाऱ्या गटांना सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करणं, शहरामध्ये भाजीपाला पुरवठा करण्यासाठी संकलन आणि वितरण केंद्र सुरु करण्यासाठी जागा निश्चित करणं, थेट भाजीपाला विक्री केंद्रांना भाजीपाला पुरवठ्याचं नियोजन करणं, भाजीपाल्याचं वितरण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था निर्माण करणं, थेट भाजीपाला विक्री व्यवस्था शाश्वत करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि अंमलबजावणी करणं, अशी कामं ह्या सुकाणू समितीचे फिल्ड ऑफिसर्स करतात. एकंदरीत स्वस्त भाजीपाला विक्री केंद्राचं नियंत्रण या सुकाणू समितीकडं आहे.

 

टोल फ्री नंबरवर नोंदवा तक्रार किंवा सूचना
भाजीपाला विक्री केंद्रांबाबत तक्रारी, सूचना करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी 8002214 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आलाय. या नंबरवर सकाळी 7.00 ते रात्री 10.00 पर्यंत नागरिक आपल्या सूचना, स्वस्त भाजीपाला विक्री केंद्राबद्दलचा अनुभव किंवा तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांनी याचा लाभ घेऊन ही योजना लोकाभिमुख करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन सुधीर तुंगार यांनी केलंय.

 Vegetable 10Vegetable 12 Vegetable 8

भविष्यात केंद्रं वाढवण्याचा निर्धार
या केंद्रांमुळं शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेल्या शेतीमालाची किंमत ठरवण्याचे अधिकार मिळाले. वाहतूकदार, अडते, मापाई - तोलाईवाले, हुंडेकरी यांचा हस्तक्षेप टळला. त्यामुळं शेतकऱ्यांची लूट थांबली. मध्यस्थाविना शेतीमाल थेट विक्रीस जाऊ लागल्यानं शेतकऱ्यांना 15 ते 20 टक्के फायदा मिळू लागलाय. ग्राहकांनाही चांगल्या प्रतीचा शेतीमाल 30 ते 50 टक्के कमी किमतीत मिळू लागल्यानं त्यांचाही मोठा फायदा झालाय, त्यामुळं या योजनेचा भविष्यात मुंबईत आणि मुंबईबाहेर विकास करण्याचा मानस कृषी व पणन खात्यानं व्यक्त केलाय.

 

भाजीपाला विक्री केंद्राची नावं व दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे-
• सुपारीबाग मध्यवर्ती ग्राहक संघ, लक्ष्मण निवास, सेंट्रल रेल्वे वर्कशॉपच्या समोर, चढ्ढा बिल्डिंग, डॉ. आंबेडकर रोड, परेल, मुंबई 12, (022-24131395)

• सुपारीबाग मध्यवर्ती ग्राहक संघ, धनतेरस बिल्डिंग, लाडूसम्राट जवळ, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई, (9869058944)

• अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स नायगांव, 106-ए. जी.के.रोड, हिंदमाता टॉकीजजवळ, मुंबई-14, (022-24125341, 9821218665)

• अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स सायन, सरदार नगर नं.1, हौसिंग कॉलनी, सायन, कोळीवाडा, मुंबई -22, (022-24094605)

• अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स टिळकनगर, सहकर टॉकीजसमोर, टिळकनगर, चेंबूर, मुंबई-89, (022-25297922)

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.