स्पेशल रिपोर्ट

बंजारांची दिवाळी रंगते चौसरसोबत!

ब्युरो रिपोर्ट, वाशीम
दिवाळी हा आनंदाचा सण. संपूर्ण भारतवर्षात वेगवेगळ्या पद्धतीनं तो साजरा होतो. प्रांताप्रांताच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी आजच्या हायटेकच्या जमान्यातही त्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न लोकं करताना दिसतात. बंजारा समाजात दिवाळीत खेळल्या जाणाऱ्या चौसर या खेळालाही अशीच परंपरा आहे. हा खेळ म्हणजे जुगार नव्हे. दिवाळीच्या आनंदात भर घालणारा तो मनोरंजनाचा एक प्रकार आहे, हे पटवून देत ही परंपरा कायम ठेवण्यासाठी बंजारा समाजातील जाणते लोकं प्रयत्न करतायत.
 

 

लक्ष्मीपूजनाच्या विविध पद्धती...

भारतवर्षात प्रांताप्रांतात लक्ष्मीपूजन वेगवेगळ्या पद्धतीनं साजरं होतं. हिंदूबरोबरच शीख, पारशी लोकही लक्ष्मीपूजन धुमधडाक्यात साजरं करतात. काही मुस्लीम लोकंही दिवाळी साजरी करतात. खेड्यापाड्यात लक्ष्मीपूजनादिवशी नवीन केरसुणी घरी आणून तिची पूजा करतात. आंध्र प्रदेशात लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर मचाण बांधून महिला त्यावर बसून रात्रभर गाणी म्हणतात. दिवे लावतात. राजस्थानात मांजरीचं लक्ष्मी समजून कोडकौतुक करतात. लंकादहनाचा देखावाही करतात. या दिवशी ध्युत खेळण्याची प्रथा आहे. नेपाळमध्येही तर या खेळाला उधाण येतं. तिकडं तसं न ध्युत न खेळणाऱ्याला गाढवाचा जन्म येतो, अशी कल्पना आहे. बंजारा बहुल भागात चौसर खेळतात.

 

पांडवकालीन परंपरा...!
मुळात हा चौसर पांडवांच्या काळापासून खेळला जातो. त्या काळात त्याला द्युतक्रीडा असं म्हटलं जाई. महाभारतकालीन शकुनी मामा व त्याच्या द्युत (चौसर) खेळाच्या माध्यमातून संपूर्ण महाभारताचा युद्धसंग्राम घडला, असं म्हटलं जातं.

 

chausarकाय आहे चौसर..?
चौसर हा बंजारा समाजातील लोकांचा अत्यंत आवडीचा एक खेळ. परंपरेमुळं या खेळाला विशेष महत्त्वही आहे. महाराष्ट्रात बंजाराबहुल भागात आजही मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या काळात चौसर खेळला जातो. दिवाळीत समाजातील युवक आणि ज्येष्ठ व्यक्ती वयाचं भान विसरून मोठ्या उत्साहात हा खेळ खेळतात. वाशीम जिल्ह्यातील फुल उमरी गावातील बंजारांचा रंगणारा चौसर पाहण्यासारखा असतो. हा खेळ खेळण्यापूर्वी या खेळात भाग घेणारे लोक प्रथम सभोवती कडं करून बसतात. या कड्यामध्ये चौसरची मांडणी केली जाते. हा चौसर अधिक चिन्हाच्या आकाराचा असून तो कापडी असतो. या खेळात दान टाकण्यासाठी सोंगट्या म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. यात सहा कवड्या वापरल्या जातात. पूर्वी या खेळात हस्तीदंताचा वापर करून फासे बनवले जात. एकूण चार-चार किंवा आठ-आठच्या गटानं हे सर्व मोठ्या आवेशानं हा खेळ खेळतात. सोळा साराचा असलेला हा खेळ तासन् तास खेळला जातो. मात्र, या खेळात पराजित झालेल्या संघानं विजयी संघाला दंड म्हणून चहा किवा नास्ता देणं भाग असतं.

 

chausar1जुगार नव्हे निव्वळ मनोरंजन!
शेतातील काम आटोपल्यानंतर विरंगुळा म्हणून हा चौसर खेळ खेळला जातो. हा खेळ खेळताना हे बंजारा कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्याच्या उद्देशानं न खेळता केवळ बुद्धीचा विकास व्हावा आणि मानसिक ताण कमी होऊन तरुण पिढीला या खेळाचं महत्त्व पटावं, हा उद्देश हा खेळ खेळण्यामागील असल्याचं सांगतात. आजच्या हायटेक जमान्यात चौसर टिकवण्यासाठी बंजारा समाजाचा प्रयत्न सुरू आहे. सरकार ज्याप्रमाणं इतर खेळांना प्रोत्साहन देतं त्याचप्रमाणं या खेळालाही सरकारनं सुविधा पुरविल्यास इतिहासप्रसिद्ध असा हा टिकून राहण्यास निश्चितच मदत होईल, असं बंजारा समाजातील लोकं आवर्जून सांगतात. आजमितीला हा खेळ टिकून राहावा यासाठी या खेळाच्या बंजाराबहुल भागात स्पर्धाही भरवल्या जातात.

 

निल्लोडचा चौसर...
निल्लोडमध्येही चौसर झोकात रंगतो. कुटील शमुनीमामांच्या कारस्थानामुळं चौसर या खेळात पांडवांचं राज्य गेलं. याच खेळात हरलेल्या द्रौपदीसाठी महाभारत घडलं. बुद्धीला चालना देणारा हा खेळ या घटनेमुळं बदनाम झाला. त्यालाच सुधारित आणि पांढरपेशा खेळ म्हणून बुद्धिबळाचा उदय झाला.चौसर खेळातून वृद्धांना आनंद मिळतो, असं निल्लोडचे बंजारा समाजातील बुजुर्ग लोकं सांगतात. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सहभागी स्वातंत्र्यसैनिकांची पार्श्वभूमी असलेल्या निल्लोडला शेतीबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. याच गावात मुख्य बसस्थानकावरील मारुती मंदिरासमोरील अंगण म्हणजे वृद्धांचा दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी, सुख-दु:खे आदींची देवाणघेवाण करण्याचा कट्टा आहे. याच कट्ट्यावर आपल्या बुद्धीला तरुण ठेवण्यासाठी एखादा खेळ असावा म्हणून महाभारतकालीन चौसर या खेळाची संकल्पना समोर आली. इथं मात्र दिवाळीचं बंधन नसतं. 12 महिनं अबालवृद्ध चौसर खेळतात.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.