स्पेशल रिपोर्ट

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी!

रोहिणी गोसावी, मुंबई
आज गाय-गोऱ्हांची बारस. संध्याकाळी शेतकरी गोठ्यात दिवे लावतील आणि 'दिन, दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी' असं म्हणत दीपोत्सव सुरू होईल. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! लख्ख उजेड देणारे लाईटचे दिवे घरोघरी आले तरी इवलीशी ज्योत पेटल्यानंतर काळोख दूर करणारी पणती काही माणसाच्या मनातून जात नाही. दिवा मातीचा, धातूचा किंवा सोन्याचांदीचा असो...तो अंधारावर मात करायला शिकवतो. दिवाळीत असे असंख्य दिवे आपआपल्यापरीनं लावले जातात. त्यासाठी घरोघरी दिव्यांची खरेदी होते. त्यामुळंच सूर्य ढळला की आसमंत दिव्यांनी उजळून जातो आणि दीपोत्सव साजरा होतो.
 

 

इवलीशी पणती ते हॅलोजनचा दिवा
माणसाला अग्नीचा शोध लागल्यानंतर अधार उजळण्यासाठी त्यानं ही मातीची इवलीशी पणती निर्माण केली. अंधारावर मात करण्याची तिथंपासून सुरु झालेली माणसाची धडपड आज सूर्यासारख्या तळपणाऱ्या हॅलोजन दिव्यांनी घेतलीय.
तरीही पणतीचं अस्तित्व कायम आहे. दिवाळीत अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या या पणत्याच आसमंत उजळून टाकतात.


Diva-14आगळावेगळा दीपमेळा...
सध्याच्या हायटेक जमान्यात बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील जसे आहेत. तशाच पणत्यासुद्धा आहेत. दिवाळीत आकाशकंदीला एवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त खरेदी होते ती पणत्यांची. देवाऱ्ह्यात चांदीच्या समया जरुर असतात, पण दिवाळीत मान या पणत्यांचाच! आपण त्या मातीच्या म्हणून कमी लेखत नाहीच. पूर्वी पणत्या म्हटलं, की मातीच्या ठराविक आकाराच्या साध्या पणत्या बाजारात मिळायच्या. पण आता पणत्यांचेही वेगवेगळे प्रकार, आकार पहायला मिळतायत. बदलत्या काळानुसार पणत्याही बदलल्यात. विविध आकाराच्या रंगीबेरंगी पणत्या बाजारात आहेत. नवी मुंबईच्या 'अर्बन हाट'मध्ये खास दिवाळीसाठी दीपमेळा आयोजित करण्यात आलाय. यात देशाच्या विविध प्रांतातून विक्रेते इथं आलेत. त्यामुळं पारंपरिक दिव्यांची इथं नुसती रेलचेल झालीय. अनेक ठिकाणाहुन घरी बनवलेल्या पणत्या ग्राहकांना आकर्षित करतायत. पण त्याबरोबरच वेगवेगळ्या आकाराचे, प्रकारचे दिवेही या ठिकाणी पहायला मिळतात. अंगणात दिवा लावताना हवेमुळं तो विझु नये यासाठी बंद असलेले दिवे वेगवेगळ्या नवीन डिझाइन्समध्ये इथं उपलब्ध आहेत.


Diva-1पारंपरिक दिव्यांचे प्रकार...
विविधतेनं नटलेल्या भारतवर्षात दिव्यांचेही नानाविध प्रकार आहेत. समई, निरांजन, दीपमाळ, लामण दिवा हे दिव्यांचे प्रकार सगळीकडंच पहायला मिळतात. कुठल्या प्रसंगी कुठला दिवा लावायचा याचेही संकेत ठेरलेले आहेत. सायंकाळी देवाजवळ समई, औक्षणाला निरांजन, रात्रभर जागणारा नंदादीप, वरवधूच्या मागं धरला जाणारा करादिवा आणि तुळशीजवळ पणती.

 

 

 


diva copy 01भारतभरात असे उजळतात दिवे...!

भारतभरात सगळीकडं दिवाळी म्हणजेच दीपोत्सव साजरा केला जातो. नदीकाठचे लोक कागदाच्या होडीतुन किंवा द्रोणातून दिवे सोडतात. तरंगत दुरवर जाणारे असंख्य दिवे अतिशय शोभिवंत असतात. दुरदेशी प्रेमाचा संदेश पोहोचवणाऱ्या दुतांप्रमाणे ते भासतात. यमदीप दानादिवशी महाराष्ट्रात दक्षिण दिशेला तोंड करुन दीवे उजळतात. ते यमधर्मासाठी उजळलेले दिवे असतात. कथा सांगतात, की मृत्युदेव यमानं एकदा आपल्या दुतांना प्रश्न विचारला की मृत्युलोकतल्या प्राणिमात्रांना हरण करताना तुम्हाला दु;ख होत नाही का? तेव्हा दुतांनी यमाला म्हटलं, की महाराज हे अपमृत्यू टाळता नाही येणार नाहीत का? तेव्हा यमानं आश्वासन दिलं की धनत्रयोदशीपासुन चार दिवस जो कोणी दीवे उजळील आणि दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा पाळली जाते. उत्तर प्रदेशच्या डोंगराळ भागातले लोक आणि सिंधी लोक या रात्री मशालींच्या प्रकाशात नाचून घालवतात. तर पंजाबी लोक हा रामाच्या राज्याभिषेकाचा सोहळा म्हणून दिवे उजळतात. बंगालमध्ये ही रात्र कालीच्या पुजेची, तिच्यासाठी दीप उजळून स्तोत्रे म्हणण्याची रात्र असते. तर आंध्रवासीय लक्ष्मीच्या स्वागताचा सण म्हणून साजरा करतात.

बाकी प्रांताप्रांतात वेगवेगळ्या चालीरिती असल्या तरी दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव हे मात्र अवघ्या भारतवर्षात सार्वत्रिक आहे. त्यामुळं आजपासूनच्या पाच रात्री आकाशकंदीलाबरोबरच पणत्यांनी उजळून निघतील.

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.