स्पेशल रिपोर्ट

आजोळच्या 'बाळ'लिला !

प्रवीण मनोहर, अमरावती
बाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. त्यांचं पार्थिव जिथं अनंतात विलीन झालं, त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच त्यांच्या लाखो चाहत्यांची रिघ लागलीय. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहली जातेय. पण परतवाडा जरा अंमळच भावूक झाला. त्याला कारणही तसंच खास आहे. हा देशाचा साहेब इथं बाळ म्हणूनच वावरला. साहेब होण्याचे संस्कार त्याला इथल्याच मातीत मिळाले.


अमरावती जिल्ह्यातलं परतवाडा हे बाळासाहेबांचं आजोळ...1927च्या सुमारास इथल्या उघडेवाड्यातल्या दोन खोल्यांत त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई यांनी संसार थाटला होता. त्यावेळी प्रबोधनकार तिथल्या कोर्टात बेलिफ म्हणून काम करायचे. 1927 ते 1936 या काळात प्रबोधनकार या वाड्यात राहिले. बाळासाहेबांचं बालपणही याच वाड्यात गेलं. तोच हा वाडा. ज्या मातीत ते खेळले, तो वाडा आजही अस्तित्वात आहे; पण त्याची अवस्था वाईट झाली आहे. आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या बालपणाच्या आठवणी सांगत या वाड्याभोवतालचा परिसर मराठी अस्मिता जागवतो.


aajolपरतवाड्यातील 9 वर्षांचा सहवास
बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला असला, तरी त्यांचं बालपण परतवाड्यातच गेलं. प्रबोधनकार ठाकरे यांचे स्वातंत्र्याच्या चळवळीतील कर्तृत्व पाहून परतवाडा शहरातील रघुनाथराव काळे यांनी शहरातील गुप्ते व ठाकरे घराण्याचे संबंध जुळवून आणले. त्यानुसार येथील गुप्ते घराण्याची रमा हिच्याशी प्रबोधनकार ठाकरे यांचा विवाह झाला. त्यानंतर ते पुण्यात राहू लागले. पुण्यातील कारभार आटोपून प्रबोधनकार परतवाड्यात मुक्कामी आले. येथील नारायणराव व चंपालाल उघडे यांच्या प्रचंड मोठ्या वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन खोल्यांत प्रबोधनकार राहू लागले. या वेळी ते येथील अचलपूर कोर्टात बेलिफचे काम करीत. त्यामुळं बाळासाहेबांचं बालपण इथंच गेलं. बालपणापासूनच त्यांच्या अंगात धडाडी होती. इथं ते आपल्या सवंगड्यांसोबत हुतुतु, कबड्डीसारखे अन्य खेळ खेळत. त्यांच्याबरोबर असे खेळ करणारे अनेकजण इथं आजही आहेत. कालांतरानं प्रबोधनकार आपल्या कुटुंबासह मुंबईतील दादर भागात स्थायिक झाले. पुढे मुंबई हीच त्यांची कर्मभूमी झाली. पण ज्या वाड्यात आपलं बालपण गेलं, त्या वाड्याला बाळासाहेब कधी विसरले नव्हते. त्यांनी अनेकवेळा इथं भेटीही दिल्या होत्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेते पदाधिकारी इथं येत असतात.

प्रबोधनकारांची कर्मभूमी असलेला हा परतवाड्यातील उघडे वाडा जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यांच्या कर्तृत्वाच्या आठवणी जागवत आज इथंही पणती पेटलीय.

 

Aaditya-Thackerayयुवासेनेची स्थापना...
परतवाड्यातील या स्नेहामुळं की काय पण बाळासाहेबांचं सुरुवातीपासूनच विदर्भावर अतोनात प्रेम होतं. बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनीही युवासेनेची मुहूर्तमेढ अमरावतीतच रोवली. खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपूत्र कॅप्टन अभिजित अडसूळ, गायक अभिजित सावंत यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक सभागृहात डिसेंबर २०१० मध्ये युवासेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

 

विदर्भावर होतं विशेष प्रेम
मातृतीर्थ सिंदखेडराजा इथून १९९५ मध्ये बाळासाहेबांनी विदर्भात झंझावाती प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी युतीचं सरकार आल्यास सिंदखेडराजा येथील मातृतीर्थाचा कायापालट करू, असा शब्द त्यांनी दिला होता. सरकार आल्यानंतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणं मातृतीर्थाचं सौंदर्यीकरण केलं. बुलडाणा जिल्ह्यातून त्यावेळी मेहकर मतदार संघातून प्रतापराव जाधव, बुलडाण्यातून विजयराज शिंदे, जळगाव जामोदमधुन कृष्‍णराव इंगळे, खामगावातून नाना कुकरे, चिखलीतून रेखाताई खेडेकर, मलकापुरातून चैनसुख संचेती हे युतीचे उमेदवार विजयी झाले होते. सिंदखेडराजा हा एकमेव मतदार संघ असा होता, जिथं युतीचा उमेदवार पराभूत झाला होता. तिथुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे विजयी झाले होते.

 

माझ्या सभेला वाघ बसतात...
विदर्भात १९९० मध्ये आरमोरी मतदार संघातून हरिराम वरखडे हे शिवसेनेचे पहिले आमदार निवडून आले. नंतर १९९५ मध्ये आरमोरी मतदार संघातून रामकृष्‍ण मडावी या नवख्या तरुणासाठी वडसा-देसाईगंज इथं बाळासाहेबांची घेतली आणि त्यांना जनतेनं निवडून दिलं. जिल्हाप्रमुख पद सांभाळणारे विजय वडेट्टीवार १९९८ मध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर बाळासाहेबांनी वडेट्टीवार यांना विधान परिषदेत घेवून २००५ मध्ये चिमूर मतदार संघातूनही संधी दिली. १९९० मध्ये माओवाद्यांच्या हिंसक करावाया असतानाही बाळासाहेबांनी सेनेचे उमेदवार विलास कोडाप यांच्या प्रचारासाठी गडचिरोलीत जाहीर सभा घेतली. वर्ध्यांत २६ जानेवारीला घेतलेली सभा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अशीच. खरेतर बाळासाहेब वर्ध्यात सभा घेण्यासाठी आले नव्हते. परंतु कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्थानिक वृत्तपत्रातून आज बाळासाहेबांची सभा अशी बातमी ‌दिली होती. हा पेपर बाळासाहेबांच्या हाती पडला. त्यानंतर बाळासाहेबांनी वर्धेतील मुक्कामाच्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘२६ जानेवारीला सभा. अरे आजच्या दिवशी तरी माझ्या तोंडून काही कुणाबद्दल अपशब्द निघू नये.’ खरे तर ही सभा पूर्वनियोजित नव्हती, त्यामुळे बाळासाहेबांच्या जागी दुसरा नेता असता तर कदाचित गेलाही नसता पण शिवसैनिकांनी दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी पूर्वकल्पना नसतानाही आयोजित केलेल्या सभेला बाळासाहेबांनी उपस्थिती नोंदविली. ते व्यासपीठावर आले, त्यावेळी पावसाला सुरुवात झाली होती. आपल्या भाषणाला सुरुवात करताच बाळासाहेब म्हणाले ‘माझ्या सभेला वाघ बसतात, शेळ्या मेंढ्या नाही.’ बाळासाहेबांचे हे उद्गार ऐकताच घराघरातून लोक बाहेर पडले आणि सभास्थळ गर्दीने भरलं.


वाशीम जिल्हा होण्याची मुहूर्तमेढ रोवली...
३ जानेवारी १९९९ रोजी एका प्रचार सभेसाठी बाळासाहेब अकोल्यात आलेत. अकोल्यातील त्यांची सभा खुपच गाजली. त्यावेळी अकोला आणि वाशीम हा एकच जिल्हा होता. दिवंगत माजी खासदार पुंडलीकराव गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी बाळासाहेब आले होते. त्यानंतर त्यांनी शेतकरी मेळाव्यालाही मार्गदर्शन केलं. भर दुपारी रखरखत्या उन्हात रिसोडपासून १२ किलोमीटरवर झालेल्या या सभेतला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. प्रास्ताविक भाषणात गवळी यांनी त्यावेळी वाशीम जिल्हा झालाच पाहिजे, ही मागणी केली. त्यानंतर बाळासाहेबांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांचे पहिले वाक्य होते ‘तालुका खोडा, वाशीम जिल्हा लिहा’. याच वेळी स्वतंत्र वाशीम जिल्ह्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

 

खा. भावना गवळींचा रेकॉर्डब्रेक विजय
तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, युतीचे उमेदवार पुंडलीकराव गवळी यांनी त्यावेळी पुसदमध्ये सभा घेतली. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक यांना त्यांनी आपल्या भाषणात इशारा दिला. त्यावेळी बाळासाहेबांनी पुंडलीकराव गवळी विजयी होतील, असं जाहीरपणे सांगितले होतं. माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या विरोधात सामान्य उमेदवार असं चित्र निवडणुकीत त्यावेळी होतं. बाळासाहेबांच्या सभेनंतर इतिहास घडला आणि मतदार संघावर भगवा फडकला. त्यानंतर भावना गवळींच्या प्रचारार्थ बाळासाहेब पुन्हा वाशीममध्ये आले. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार होते मनोहर नाईक. बाळासाहेबांची सभा झाली अन् इतिहासाची पुनरावृत्ती झाली. रेकॉर्डब्रेक मतांनी भावना गवळी विजयी झाल्या. भावना गवळी जेव्हा लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या तेव्हा त्यांचे नाव सर्वांत कमी वयाच्या महिला खासदार म्हणून घेतलं जाऊ लागलं. बाळासाहेबांच्या झंझावातामुळं विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट झाली. या भक्कम राजकारणामागं परतवाड्याच्या आजोळचा जिव्हाळा होता...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.