स्पेशल रिपोर्ट

रेल बाजारच्या भेंडीचा लंडनमध्ये डंका!

अजय पालीवाल, जळगाव
भरमसाठ किंमतीच्या रासायनिक खतांचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागलेत. त्यामुळं ग्राहक आणि शेतकरी दोघंही सेंद्रीय पद्धतीच्या शेतीकडं वळतायंत. धरणगाव तालुक्यातील रेल बाजार इथल्या तरुण शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा वापर करुन अभिनव पद्धतीनं भेंडी उत्पादन केलंय. लहरी निसर्गाचा सामना करीत त्यांना भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळाल्यानं ही सेंद्रीय भेंडी आता थेट लंडनला जाऊन पोहोचलीय. ही यशोगाथा पाहून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा ओढा सेंद्रीय पद्धतीनं भाजीपाला घेण्याकडं वाढलाय.
 

 

रेल बाजारचा अभिनव प्रयोग...
गिरणा नदीच्या काठावर वसलेलं रेल बाजार हे छोटंसं गाव. शेती हाच गावाचा मुख्य व्यवसाय. गाळाच्या सुपिक जमिनीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून कपाशीसह ज्वारी, मका आदी पिकांची शेती करणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांनी भेंडी उत्पादनात हात आजमवायचं ठरवलं. त्यानंतर खरिपात मुगासारखं अल्प मुदतीचं पीक घेतल्यावर तसंच कपाशी पिकाची काढणी झाल्यानंतर भेंडीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आणि अल्पावधीतच त्यांच्या या अभिनव प्रयोगाला यश आलं.

 

bhendi-1मिळतोय 70 टक्के नफा...
प्रशांत पाटील हे असेच इथले एक तरुण, प्रयोगशील शेतकरी. त्यांनी सात एकरात भेंडीची लागवड केलीय.
कोणत्याही प्रकारचे रासायनिक औषधं आणि खतं न वापरता त्यांनी सेंद्रीय पद्धतीनं ही भेंडीची शेती केली. एका वेळी सुमारे पंधरा क्विंटल, असं ते एक दिवसाआड भेंडीची तोडणी करून ती मुंबई बाजारातून थेट लंडनला पाठवतात. लागवडीचा आणि उत्पादनाचा ३० टक्के खर्च वगळता त्यांना नक्त सत्तर टक्के नफा मिळतोय. विशेष म्हणजे, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रासायनिक खतं आणि किटकनाशकांचा वापर कमी करण्यास सुरवात केलीय. त्यामुळंच निर्यातदारांमार्फत भेंडींची निर्यात करणं त्यांना शक्य झालंय. विशेष म्हणजे, पूर्णपणे सेंद्रीय शेती करुन आरोग्यदायी शेतमालाचं उत्पादन करणं, हेच त्यांनी उद्दिष्ट ठेवलंय.

 

चांगला दर आणि समाधानही...
तीन वर्षांपूर्वी सेंद्रीय पद्धतीनं भेंडीचं पीक घेण्यासाठी प्रेरित झालो. आता दर्जेदार उत्पादन घेणं हा हातखंडा झालाय. व्यापाऱ्यांमार्फत ही भेंडी परदेशात निर्यात होऊन चांगला दरही मिळतोय.
मुख्य म्हणजे, रसायनांना फाटा देऊन आरोग्यदायी शेतमालाचं उत्पादन करतो, याचं विशेष समाधान आहे, असं प्रशांत पाटील यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.

 

 
तरुण शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा..
ही यशोगाथा पाहून गेल्या वर्षभरापासून रेल्बाजार गावातील चार-पाच तरुण शेतकऱ्यांनी मिळून सेंद्रीय शेती करण्यास सुरवात केलीय.  त्यांना दिलीप देशमुख या तज्ज्ञाचं मार्गदर्शनं मिळतंय. कपाशी, ज्वारी, मका यांसारख्या मुख्य पिकांसोबत भेंडीचं पीकही ते घेवू लागलेत. निर्यातदार त्यांच्याकडून भेंडी घेताना त्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी कीडनाशक अवशेषांच्या दृष्टीने करतात. त्यानंतरच परदेशी बाजारपेठेत माल पाठवतात.

 


bhendi-6निर्यातीच्या चांगला दर आणि वावही...
तोडणी सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या काळात दीड एकरांतून एक दिवसाआड एक ते दीड क्विंटल भेंडी निघते. त्यानंतर हे प्रमाण वाढत जातं. एकूण सुमारे 70 तोडे होतात. प्रति तोडा 250 ते 400 किलोंच्या दरम्यान माल मिळतो. एकूण सुमारे साडेसतरा टन उत्पादन मिळतं. म्हणजे एकरी सरासरी 10 ते 11 टन उत्पादन मिळतं. या भेड्याचं पाच किलोच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग केलं जातं. प्रति किलो 22, 25, 30, 35 ते कमाल 43 रुपयांपर्यंत दर निर्यातदारांकडून मिळतो. दीड एकरात चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. त्यात सुमारे एक ते दीड लाख रुपये उत्पादन खर्च असतो. रासायनिक शेतीच्या तुलनेत हा खर्च कितीतरी कमी आहे. लोकल मार्केटमध्ये भेंडीली जेव्हा प्रति किलो 10 ते 12 रुपये दर असतो, त्या वेळी निर्यातीसाठीच्या भेंडीला किमान 22 रुपये तरी भाव मिळतो, असा या तरुण शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
सेंद्रीय भाज्या तसंच फळांची आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पाहता महाराष्ट्रातील यांचं उत्पादन अगदीच अल्प असून विस्ताराला भरपूर वाव आहे, असा स्वानुभवही हे शेतकरी सांगतायत.

 

या सेंद्रीय शेतीची वैशिष्ट्यं -
- खरिपात मुगाचं पीक घेतल्यानंतर दरवर्षी सुमारे दीड एकरावर भेंडीची लागवड
- भेंडीचे चार किलो बियाणं दीड एकरावर वापरलं जातं.
- लागवडीपूर्वी प्रति एकरी सहा ते सात ट्रॉली शेणखताचा वापर. घरची 12 ते 13 जनावरे. त्यांच्या माध्यमातून खत उपलब्ध होतं.
- गोमूत्राचाही वापर केला जातो.
जैविक पद्धतीच्या निविष्ठा वापरण्यावर अधिक भर असल्याने रासायनिक कीडनाशकांचे अवशेष शेतमालात राहण्याची जोखीम कमी होते.
या तरुणांच्या यशोगाथेमुळं परिसरातील शेतकरीसुद्धा करतायत अनुकरण

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.