स्पेशल रिपोर्ट

वाशी मार्केटने विकले ३०० कोटींचे आंबे!

रोहिणी गोसावी, वाशी, नवी मुंबई
आभाळात मान्सूनचे ढग जमा होऊ लागलेत. घामाने निथळत सगळे पावसाची आतुरतेनं वाट पाहतायत. या उन्हाळ्यानं अगदी घाम काढला असला तरी एका गोष्टीनं मात्र सर्वांचंच तनमन तृप्त केलं. ते म्हणजे मधुर आंबे आणि त्यांचा पिवळाधम्म आमरस! याचा पुरावा म्हणजे नवी मुंबईतल्या वाशी फळ मार्केटनं या सीझनमध्ये तब्बल 300 कोटींचे आंबे विकलेत. या आंब्यांचं गिऱ्हाईक फक्त मुंबईकरच नव्हेत बरं का. तर देश आणि परदेशातही आपल्या या फळांच्या राजानं बाजी मारलीय. त्यामुळं सरत्या उन्हाळ्यासोबत निरोप घेणाऱ्या आंब्याच्या सीझनला 'पुढच्या वर्षी लवकर ये...' अशी आर्जवं आंबाप्रेमी करत आहेत.
 

खरं तर यंदाच्या आंब्याच्या सीझनला 'एलबीटी' आंदोलनाचं मांजर आडवं गेलं होतं. नाही म्हणता त्याचा परिणाम झालाच. पण आंबाप्रेमींनी मात्र आपला हात आखडता घेतला नाही. त्यामुळं एकट्या मुंबईसोबतच इतर राज्यातील तसंच देशाबाहेरही वाशी मार्केटमधून आंबा पोहचवला गेला. यंदा वाशी मार्केटची आंब्याची उलाढाल ही तब्बल 300 कोटींची झाल्याची माहिती वाशीतील एपीएमसीच्या फ्रुट मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी 'भारत4इंडिया'ला दिली.


केवळ कोकणातलेच नव्हेत तर गुजरात आणि कर्नाटकचेही आंबे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम वाशीतलं एपीएमसी मार्केट करतं. एप्रिल महिना सुरू झाला की, या फळ मार्केटमध्ये आंब्यांच्या राशी दिसायला लागतात. दरवर्षी इथं होणारी आंब्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात असते.

APMC FRUIT MARKET 13देशातलं मोठं टर्मिनल फ्रूट मार्केट
भल्या पहाटे जाग्या होणाऱ्या नवी मुंबईतील वाशी इथल्या एपीएमसी मार्केटमध्ये धान्य मार्केट, कांदा-बटाटा मार्केट, भाजीपाला मार्केट, मसाला मार्केट आणि फळ मार्केट असे विभाग आहेत. यातील फळ मार्केटचा विभाग सध्या आंब्यांच्या सीझनमुळं त्यांच्या खरेदी-विक्रीनं फुललाय. हे फळ मार्केट जवळपास २८ एकरांवर वसलंय. इथल्या ११०० गाळ्यांमधून जवळजवळ १४०० फळांचे व्यापारी व्यवसाय करताहेत.

 

APMC FRUIT MARKET 40असं आहे वाशीचं फळ मार्केट
नवी मुंबईचं एपीएमसी मार्केट... या मार्केटला जवळपास 150 वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी शेतकरी आपला माल घेऊन विविध ठिकाणी व्यापाऱ्यांकडे जात, परंतु हे व्यापारी त्यांना योग्य ते पैसे देत नसत. वजनामध्येही या शेतकऱ्यांची फसवणूक होत असे. या विरोधात शेतकऱ्यांनी कुठं दाद मागावी? त्यात मार्केट विखुरलेलं असल्यामुळं शेतकऱ्यांना त्यांचा माल वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जावा लागायचा. परंतु त्यांना योग्य ग्राहक मिळत नव्हते. या शेतकऱ्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात. त्यांच्या मालाला रास्त भाव मिळण्यासाठी सरकारनं १९६३ मध्ये कृषी उत्पादन बाजार समित्यांचा कायदा अस्तित्वात आणला. त्यानंतर हे वेगवेगळे बाजार एकत्र करून त्यांना नवी मुंबईत एकाच ठिकाणी जागा देण्यात आली. आणि अशा तऱ्हेनं फळ मार्केट, धान्य मार्केट, भाजीपाला मार्केट, मसाला मार्केट, कांदा-बटाटा मार्केट असे विविध बाजार एकाच आवारात सुरू झाले.

 

APMC FRUIT MARKET 36वार्षिक 400 कोटींची उलाढाल
एपीएमसीचा हा फळबाजार देशातलं एक महत्त्वाचं आणि सर्वात मोठं टर्मिनल फ्रूट मार्केट म्हणून ओळखलं जातं. जवळपास 400 कोटींची उलाढाल दरवर्षी या मार्केटमध्ये होते. महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातलीही विविध प्रकारची, वेगवेगळ्या जातींची फळं या बाजारात उपलब्ध असतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवगड-रत्नागिरीचे हापूस आंबे, गुजरातचे आंबे, कर्नाटकचे आंबे, काश्मीरची लिची, काश्मीरची सफरचंदं, जपानची संत्री, भारतातली मोसंबी, चायनीज सफरचंदं अशी वेगवेगळी फळं सीझनप्रमाणं मुबलक प्रमाणात, घाऊक दरात इथं उपलब्ध असतात. अनेक ऑपशन्सही या ठिकाणी उपलब्ध आहेत. आंब्याच्या सीझनमध्ये भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून इथं आंबे विक्रीसाठी येतात. उदा. रत्नागिरी- देवगड हापूस, कर्नाटकचा तोतापुरी आंबा, गुजरातचा केशर आंबा असे वेगवेगळ्या जातींचे आंबे या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्रातल्या आंब्यांचा सीझन संपला की गुजरातमधील आंब्यांचा सीझन सुरू होतो. यावेळीही गुजरातच्या हापूस, केशर अशा आंब्यांचीही मोठी आवक या बाजारात होतेय. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत या फळबाजाराचा मोठा हातभार आहे.

 

आलेल्या फळांची होते प्रतवारी
APMC FRUIT MARKET 10या मार्केटमध्ये जवळपास 300 गाड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्यात विविध ठिकाणांहून शेतकऱ्यांनी पाठवलेला वेगवेगळ्या प्रकारचा माल असतो. त्यात समजा आंब्याची जर ५० पेट्या गाडीमध्ये आल्या, तर त्या ५० पेट्यांमध्ये ५ डझनाच्या २ पेट्या, ६ डझनाच्या १० पेट्या, ८ डझनाच्या २० पेट्या असं वर्गीकरण करून नंतर त्यांचा लिलाव केला जातो. विविध ठिकाणांवरून जी फळं मार्केटमध्ये येतात त्यांची प्रतवारी करणं हेही एक तितकंच महत्त्वाचं काम असतं. एक नंबर, दोन नंबर अशा प्रकारे या फळांची त्यांच्या क्वालिटीनुसार वर्गवारी करण्यात येते. एक नंबर असलेल्या फळांची किंमत जास्त असते. जमिनीची प्रत किंवा पोत, हवामान, वातावरण या सगळ्या गोष्टींचा फळांच्या क्वालिटीवर परिणाम होतो, असं इथले फळ व्यापारी सांगतात.


APMC FRUIT MARKET 43एलबीटी आंदोलनाचा फटका
मे महिना संपता संपता आता गुजरातच्या आंब्यांचं मार्केटमध्ये आगमन झालंय. पुढे मंचरच्या आंब्यांचं आगमन होईल. म्हणजे आता फक्त 15-20 दिवस आंब्यांचा हंगाम शिल्लक राहिलाय. आंब्यांचा हंगाम संपताना बाजारात लिची, किवी अशा विविध फळांची आवक झाल्यानं आंब्याची मागणी थोडी कमी झालीये. यंदाचा आंब्याचा सीझन चांगला असला तरी या आंब्याच्या सीझनमध्ये आंबा व्यापाऱ्यांना एलबीटीच्या आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका बसलाय. त्यांना डझनमागे जवळजवळ 100 रुपयांचा फटका बसला.

 

मार्केटची दुरवस्था आणि घाणीचं साम्राज्य

APMC FRUIT MARKET 33एवढा मोठा आवाका... करोडोंची उलाढाल... असं असलं तरीही या मार्केटची अवस्था मात्र चांगली नाहीये. इथल्या गाळ्यांची अवस्था बघितली तर हे गाळे असलेल्या सगळ्याच इमारती जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. याशिवाय इथल्या स्वच्छतेचीही प्राधान्यानं काळजी घेण्याची गरज आहे. कारण पावसाळ्यात तर इथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं. हे मार्केट 28 एकरावर वसलेलं असलं तरीही वाढणाऱ्या व्यापाऱ्यांमुळं आहे तीही जागा अपुरी पडतेय. यावर उपाय म्हणजे इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी योग्य नियोजन केलं तर आहे त्या जागेचा सदुपयोग होईल. मुंबईसह देशाला फळांचा पुरवठा करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचं गणित मांडणाऱ्या या मार्केटकडं सरकारनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.