स्पेशल रिपोर्ट

4 महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं; कर्जाच्या टेन्शनमधून जडले आजार

ब्युरो रिपोर्ट

वर्धा - विदर्भातील शेतकरी आत्महत्येचं चक्र काही थांबता थांबत नसल्याचं स्पष्ट झालंय. आता या आत्महत्यांचा नवाच पैलू समोर येतोय. तो म्हणजे कर्जबाजारी शेतकरी आजाराला कंटाळून आत्महत्या करू लागलेत. एकट्या वर्धा जिल्ह्यातच गेल्या चार महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील बहुतेकांनी टेन्शनमधून निर्माण झालेल्या  आजाराला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचं स्पष्ट झालंय. 

'आधीच कर्ज, त्यात चिकटला जीवघेणा आजार', अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झालीय. कर्जाचं टेन्शन घेतलेल्या शेतकऱ्यांना आता मेंदूच्या विकारांनी ग्रासलंय. 'टेन्शन'चा 'साईड इफेक्ट' म्हणून त्यांना नाना व्याधींनी ग्रासायला सुरुवात केलीय.

आधार गेला

वर्ध्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेलं गव्हा इथं ढगे कुटुंबीयांवर दु:खाची छाया पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच घरातल्या वडीलधाऱ्या महादेव बापुराव ढगे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. कर्जाचं टेन्शन त्यातून उद्भवलेला आजार, त्यावर उपचारासाठी गाठीला पैसाच नाही, अशा दुष्टचक्राला कंटाळून महादेव ढगे यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. त्यांच्यामागं पत्नी आणि दोन तरुण मुलं आहेत.

नापिकीचा फटका

महादेव बापुराव ढगे यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे, या शेतात त्यांनी कापूस पिकवला, मात्र कपाशीवर आलेल्या लाल्या रोगामुळं त्यांना केवळ तीन क्विंटल उत्पन्न मिळू शकलं. त्यानंतर महादेव यांची आशा होती ती मुलाच्या नावानं नदीकाठी असलेल्या दोन एकर शेताकडून. या शेतात त्यांनी सोयाबीनचं पीक घेतलं होतं. मात्र, इथंही त्यांना पुराचा फटका बसला आणि उभं सोयाबीनचं पीक पाण्यात वाहून गेलं.

उपचारासाठी पैसे नाहीत

गेल्या दोन वर्षांपासून महादेव ढगे मेंदूच्या आजारावर सातत्यानं उपचार घेत होते. त्यातच नापिकीमुळं महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं त्यांना शक्य नव्हतं. मात्र, त्यांनी आजारावरील उपचारासाठी महाराष्ट्र बँकेतील आपल्या बचतखात्यात 13 हजार रुपये शिल्लक ठेवले होते. पण बँकेनं ही रक्कम कर्ज खात्यात वळती केली. सोयाबीन पुरात गेलं, कापूसही जेमतेम पिकल्यानं आजारावरील उपचारासाठी पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न त्यांच्यापुढं निर्माण झाला होता. शेवटी त्यांनी गावातील विहिरीत उडी घेऊन, हा प्रश्न संपवला...

पोलीस तपास सुरू

मृत्यूपूर्वी त्यांनी उपचारासाठी पैसे नसल्यामुळं आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त करत प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केलाय.

आत्महत्येचा पॅटर्न बदलतोय

या प्रकरणात महादेव ढगे यांनी जगण्याची आशा सोडली नव्हती. मात्र, उपचारासाठी पैसा उरला नसल्यामुळं त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. यंदा पावसाच्या अनियमिततेनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यातल्या त्यात सततची नापिकी आणि भांडवल समस्येमुळं विदर्भातील आत्महत्येचं चक्र थांबत नाही, हे स्पष्ट झालंय.

महादेव ढगेंप्रमाणेच 40पैकी बहुतेक शेतकऱ्यांना अशा दुष्टचक्राला कंटाळून आपलं जीवन संपवलंय.

वर्ध्याजवळच्या पालोती गावात राहणारे देवीदास उगेमुगे. त्यांनी 11 ऑगस्टला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी आणि त्यातून वाढत जाणारं कर्ज यातून त्यांचं टेन्शन वाढतच गेलं. त्याचा साईड इफेक्ट म्हणून त्यांना डोकेदुखीचा आजार जडला. त्यावरच्या उपचारांचा खर्च परवडेना. त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी अखेर मरणाला कवटाळलं. 

आमला गावातल्या सुधाकर पंजाबराव इंगळे यांचीही कथा हीच. त्यांना डोकेदुखीनं एवढं बेजार केलं होतं की ते अखंड बडबडू लागले. दुखणं सहन न झाल्यानं त्यांनी विहिर जवळ केली.

तळेगाव टालाटुले येथील लता गजानन वांदिले या शेतकरी महिलेनं नऊ नोव्हेंबरला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या महिलेचा नापिकीमुळं कर्जबाजारी झाला होता. त्याचं टेन्शन कुटुंबावर आलं. घरात भांडणं होऊ लागली. यातून लता आजारी पडल्या. डोक्याचा आजार बळावला. त्याला कंटाळून शेवटी त्यांनी जीवन संपवलं.

'डोक्यावरच्या कर्जामुळं शेतकऱ्यांना  'डिप्रेशन येतं. त्यातून त्यांना व्य़ाधी जडतात. त्यातून तणावात वाढ होते. त्याचं टोक गाठल्यावर शेतकरी आत्महत्या करतात.' असं विश्लेषण वर्ध्याच्या आचार्य विनोबा भावे मेडिकल कॉलेजचे डॉ. प्रकाश बेहेरे यांनी केलंय.

'हे प्रकार थांबण्यासाठी राज्यसरकारने तातडीनं हस्तक्षेप करायला पाहिजे. राष्ट्रीयीकृत बँका स्थानिक प्रशासनाला जुमानत नाहीत. वसुलीचे विविध प्रकार वापरतात. अनेकदा जिल्हाधिकारीही त्यांच्यापुढं हतबल ठरतात. परिणामी शेतकऱ्यांना आत्महत्यांशिवाय पर्याय उरत नाही. हे चक्र न थांबल्यास आम्ही व्यापक आंदोलन उभारू', असा इशारा जनआंदोलन समितीचे अध्यक्ष अविनाश काकडे यांनी दिलाय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.