स्पेशल रिपोर्ट

सणासुदीला कांद्याचा वांदा!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
कांद्यानं भाव खाल्ल्यानं इंडियात आरडाओरड सुरु झालीय. कोण काय तर कोण काय म्हणतंय. नाकानं कांदं सोलण्याचा इंडियातला हा प्रकार भारतीय समाज मोठ्या मजेनं बघतोय. साठेखोरी नाही, नफेखोरी नाही, व्यापाऱ्यांचा, हात नाही. अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी आणि पुरवठ्याचं तंत्र बिघडल्यानं भाव वाढलेत. अवकाळी पावसामुळं खरीपाचा कांदा अजून बाजारात आलेला नाही. दिवाळीनंतर तो आला की येतील भाव आटोक्यात. तोपर्यंत ही भाववाढ शेतकऱ्यांना बोनस समजायला काय हरकत आहे? कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होऊन जाऊ दे...असाच सूर शेतकरी, व्यापारी वर्गातून पाहायला मिळतोय.
 
 
  

देशभरात वाढलेत भाव
कांद्यानं गणपतीपासून भाव खायला सुरवात केली. गणपतीच्यावेळी भाव 80 ते 90 रुपये प्रति किलो झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारनं अफगाणिस्तानमधून कांद्याची आयात केली. त्यानंतर भाव हळूहळू खाली येत 40 ते 50 रुपयांवर स्थिरावले होते. आता गेल्या पाच-सात दिवसांपासून भाव परत 80 ते 90 रुपयांवर आले आहेत. सध्या वाशीच्या घाऊक बाजारात 55 ते 60 रुपये भाव असून किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपये प्रति किलो या दरानं कांदा विकला जातोय. संपूर्ण देशभरात अशीच परिस्थिती आहे. पाटण्यात तर कांद्यानं शंभरी गाठली असून दिल्लीच्या बाजारात ९० रुपयानं विकला जातोय.

 

thumbभाव खाल्लाय तरी का?
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत खरिपाच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं टंचाईची परिस्थिती निर्माण झालीय. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन विकास संस्थेनंही याला दुजोरा दिलाय. केंद्र सरकारनं साठेबाजीचा वास येत असल्याचा आरोप केला असली तरी मुळात पीकच कमी झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही हीच बाब अधोरेखीत केलीय. ''महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील पावसाच्या संकटामुळं आवक कमी होऊन कांदा महागलाय. लोकसंख्या वाढल्यामुळे कांद्याची मागणी वाढली आहे आणि दुसरं म्हणजे लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळंही कांद्याची मागणी वाढत आहे. या दुहेरी वाढीला आत्ताचं निघणारं उत्पादन पुरेसं पडत नाही, हेदेखील यामागचं एक कारण आहे,'' असं पवारांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. भाव खाली यायला आणखी दोन ते तीन आठवडे लागतील, याकडंही त्यांनी लक्ष वेधलंय. इराण, पाकिस्तान, इजिप्त आणि चीनकडून कांदा आयात करण्याचा निर्णयही सरकारनं घेतलाय.


वाशी मार्केटमध्येही आवक घटलीkanda

वाशीच्या कांदा मार्केटमध्येही आवक सुमारे निम्म्यानं घटलीये. आज इथं घाऊक भाव 50 ते 55 रुपये प्रति किलो असून किरकोळ बाजारात भाव 80 रुपये झालेत. दिवाळीच्या तोंडावर नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येईल आणि भाव नक्कीच उतरतील, अशी माहिती कांदा व्यापारी आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक देवराम वाळुंज यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिली. यंदा राज्यात झालेल्या तुफान पावसामुळं जूनमध्ये लागण झालेला कांदा वाया गेला. त्यामुळं शेतकऱ्यांनी जुलै मध्यानंतर परत लागण केली. त्यामुळं पीक हातात यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागलाय. आता गेल्या तीन - चार दिवसांपासून पाऊसकळा संपल्यात जमा झाल्यात. त्यामुळं काढणीला वेग येऊन आठ-दहा दिवसांत भाव खाली येतील. सर्वसामान्य माणसाला अंदाजे 40 रुपयानं कांदा मिळायला हरकत नाही, अशी आशावादही वाळुंज यांनी बोलून दाखवलाय.

 

असा आहे कांदा महिमा...
कांदा हा गरीबांपासून श्रीमंतांच्या आहारातील प्रमुख घटक असून लहान व मध्यम शेतक-यांचं ते महत्वाचं नगदी पीक आहे. महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात होते. कांदा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करुन परकीय चलन देखील प्राप्त होते. आजमितीस भारतात सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली असून त्यापासून 74 लाख मे. टन उत्पादन मिळतं. देशातील कांदा उत्पादनापैकी 26 ते 28 टक्के कांदा उत्पादन (24 लाख मे.टन) हे महाराष्ट्रात होतं. मागील वर्षी देशातून निर्यात झालेल्या 9.44 लाख मे.टन कांद्यापैकी 7 लाख मे.टन कांदा हा महाराष्ट्रात उत्पादीत झालेल्या कांद्यापैकी होता.kanda1कांदा साठवणुकीकडं लक्ष द्या

जून ते ऑक्टोबर, प्रसंगी फेब्रुवारीपर्यंत रब्बी हंगामात तयार झालेला कांदा पुरवून वापरला जातो आणि म्हणूनच कांदा साठवणुकीची नितांत गरज भासते. कारण या कालावधीत नवीन कांदा कोठेही उत्पादीत होत नसतो. महाराष्ट्रात स्थानिक व निर्यात लक्षात घेता सन 2013 पर्यंत 8 लाख मे. टन राज्याची साठवणूक क्षमता होणं आवश्यक होतं. हे लक्ष्य शंभर टक्के गाठता आलेलं नाही. खरीप हंगमामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळं तो विकला जातो म्हणून किंवा रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. त्यामुळं स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणं गरजेचं आहे.

 

 

कांदाचाळीला चालना देण्याची गरज...
onion storage

कांदा ही एक जिवंत वस्तू असून तिचं मंदपणे श्वसन चालू असतं. तसंच पाण्याचं उत्सर्जन देखील होत असतं. त्यामुळं योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यास 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं. सध्या नुकसानीची टक्केवारी जास्तच आहे. हे
नुकसान प्रामुख्यानं वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणं इ. कारणांमुळं होतं. कांद्याचं हे नुकसान टाळण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीनं साठवणूक होणं अत्यंत गरजेचं आहे. कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीनं साठवण केल्यास नुकसान 20 ते 30 टक्क्यांपर्यंत खाली आणता येणं शक्य आहे, त्यासाठी कांदा चाळीसारख्या उपक्रमांना सरकारनं चालना दिली पाहिजे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.