स्पेशल रिपोर्ट

अंधश्रद्धेची इडा पिडा टळो...!

रोहिणी गोसावी, मुंबई
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तातडीनं पकडावं तसंच दाभोलकरांच्या मृत्यूनंतर तातडीनं जादूटोणा विरोधी वटहुकूम काढणाऱ्या सरकारनं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करावा, या मागणीसाठी  मुंबईत (2 डिसेंबर) भव्य मोर्चा काढण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूनल समिती, परिवर्तनवादी संघटना, वारकरी संप्रदाय आण‌ि राजकीय पक्षांनी काढलेल्या या मोर्चानं राजधानी मुंबई दणाणून गेली. सुमारे 10 हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
 

 

14 वर्षांची प्रतिक्षा आता तरी संपावी

भायखळ्याच्या प्रसिद्ध राणीच्या बागेपासून या मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. दाभोलकरांच्या खुन्यांना गजाआड करा, तसंच जादूटोणा विरोधी  मंजूर करा, अशा घोषणा देत आझाद मैदानात सभा होऊन मोर्चाची सांगता झाली.जादूटोणा विरोधी विधेयक संमत होऊन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, यासाठी डॉ. दाभोलकर आयुष्यभर सरकारशी लढले. यासाठी प्रतिगामी तसंच सनातनी वृत्तींशी त्यांना झुंजावं लागलं. या मनुवादी प्रवृत्तींनी निर्माण केलेल्या अनंत अडचणींवर मात करत-करत तब्बल 14 वर्षे जादूटोणा विरोधी विधेयकाचा प्रवास शेवटच्या टप्प्यावर आला. दाभोलकरांनी अत्यंत चिकाटीनं केलेल्या प्रयत्नांचेच हे यश आहे. त्यांच्या या वैचारिक लढाऊ बाण्यापुढं निष्प्रभ व्हावं लागत असल्यानंच त्यांना शेवटी जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. मात्र, त्याला न जुमानता डॉ. दाभोलकर एकाकी लढतच राहिले. अखेर 20 ऑगस्टला पुण्यात बालगंधर्व पुलावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला.च्या खूनामुळं अवघा पुरोगामी महाराष्ट्र हळहळला. जादूटोणा विरोधी  विधेयकाचा तातडीनं वटहुकूम काढणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा एकमुखी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारंन हा वटहुकूम काढला. आता नागपूरला होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात हा वटहूकूम संमत होऊ नये, यासाठी पुन्हा प्रतिगामी संघटनांनी उचल खाल्ली आहे. त्यापार्श्वभूमीवर हा भव्य मोर्चा काढण्यात आला.

 

 8पुरोगामी संघटना, महिलांचा उस्फूर्त सहभाग

पुरोगामी संघटनांची ताकद दाखवून देण्यासाठी राज्यभरातून अनेक छोट्या-मोठ्या संघटना तसंच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते, मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचावचे कार्यकर्ते, घर बचाव घर बनाव संघटना, आत्मभान संघटना, वारकरी संप्रदाय मोर्चात सहभागी झाले होते. अंधश्रद्धेचा सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागणारा घटक म्हणजे महिला. आतापर्यंतच्या अंधश्रद्धेच्या घटनांचा विचार केला तर त्यात अंधश्रद्धेमुळं सगळ्यात जास्त बळी हे महिलांचे गेलेत. त्यामुळं हे विधेयक मंजूर झालं तर सगळ्यात जास्त सुरक्षित महिला राहणार आहेत. म्हणूनच या मोर्चात महिलांचा सहभाग हा वाखाणण्यासारखा होता. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या तरुण कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या महिला उस्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाल्या होत्या.  ज्येष्ठ शेकाप नेते प्रा. एन. डी. पाटील , भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर , भाकपचे प्रकाश करात , खासदार हुसेन दलवाई , शिक्षक आमदार कपिल पाटील , आमदार विद्या चव्हाण आण‌ि सामाजिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आण‌ि चित्रपट-रंगभूमीवरील कलाकारांनी या मोर्चाला हजेरी लावली होती.

 

 

16वारकऱ्यांचाही सहभाग

 जादूटोणा विरोधी विधेयकाला वारकरी संप्रदायाच्या एका गटानं विरोध केल. सरकारनं काढलेला वटहुकूम मंजूर झाला तर वारीला जाता येणार नाही, तसंच सत्यनारायणाची पूजा घालता येणार नाही, अशा प्रकारचा चुकीचा प्रचार करुन जनतेत संभ्रमाचं वातावरणं निर्माण करण्याचा प्रयत्न या फुटीरतावादी प्रतिगामी वृत्तीचे लोक करतायत. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही तरतुदी या विधेयकात नाहीत, उलट अंधश्रद्धा निर्मुलन हे वारकरी संप्रदायाचं काम असल्यानं खऱ्या वारकऱ्यांचा या विधेयकाला पाठिंबाच आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्र्वर महाराज वाबळे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिली.

 

 

तर जनतेचा रोष ओढवेल – एन. डी. पाटील

डॉ. दाभोलकर आयुष्यभर विघातक सामाजिक शक्तींशी लढले, लढता लढता त्यांचा बळी गेला. अजुनही त्यांचे मारेकरी मोकाट फिरतायेत. त्यांनी दिलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकाचं घोंगडं थोडीथोडकी नव्हे 14 वर्ष झाली भिजत पडलंय. आतातरी सरकारनं उदासिनतेतून बाहेर येऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करावं. अन्यथा सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असं ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.

 

 

15विरोध करण्यासारखं काही नाही - अविनाश पाटील

समाजातील ज्या घटकांना हे विधेयक नकोय त्यांनी त्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून काही संघटनांना विधेयकाच्या विरोधात उभं केलं. पण आता विधेयकाच्या अनेक तरतुदींमध्ये बदल करण्यात आलाय. सगळ्या तरतुदी या अधिक सोप्या आणि सुटसुटीत करण्यात आल्यात त्यामुळं आता या विधेयकाला कोणीही आक्षेप घ्यावा किंवा विरोध करावा, अशा कोणत्याही तरतुदी या विधेयकात नाहीत अशी माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.

 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यात दाभोलकरांचा खून झाल्यानंतर लोकांचा प्रक्षोभ शांत करण्यासाठी सरकारनं लगेच जादूटोणा विरोधी वटहुकूम जारी केला. पण या वटहुकूमावर पुढच्या सहा महिन्यात सभागृहात चर्चा होऊन जोपर्यंत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रुपांतर होऊ शकत नाही. तसं झालं नाही तर तो वटहुकुम रद्दबातल होईल. त्यामुळं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं हे विधेयक मंजूर करणं सरकारच्याच हिताचं आहे, अशा एकमुखी सूर मोर्चातून उमटत होता आणि त्याला सर्वसामान्यांचाही प्रतिसाद मिळत होता.

 

जादूटोणा विरोधी विधेयकातील अशा आहेत तरतूदी

१) भूत उतरविण्याच्या बहाण्यानं एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवून मारहाण करणं, त्याचा विविध प्रकारे छळ करणं, चटके देणं, मूत्र, विष्ठा खायला लावणं आदी कृत्य करणं, 

२) तथाकथित चमत्काराचा प्रयोग करून फसविणं, ठकवणं, दहशत बसवणं, आर्थिक प्राप्ती करणं
३) अलौकिक शक्तीच्या प्राप्तीसाठी जिवाला धोका होईल अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतील अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणं
४) गुप्तधन, जारण मारण, करणी भानामती या नावानं अमानुष, अनीष्ट, अघोरी कृत्य करणं, नरबळी देणं
५) अतिंद्रिय शक्ती असल्याचं भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणं, न ऐकल्यास वाईट परिणामांची धमकी देणं, एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, अपशकुनी आहे, सैतान आहे असं जाहीर करणं
६) जारण – मारण, चेटुक केल्याच्या आरोपावरून मारहाण करणं. विवस्त्रावस्थेत धिंड काढणं, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं
7) भूत पिशाच्चाना आवाहन करून घबराट निर्माण करणं, मृत्यूची भीती घालणं, भुताच्या कोपामुळं शारीरिक इजा झाली, असं सांगून अघोरी उपाय करण्यास प्रवृत्त करणं
8) कुत्रा, साप, विंचू चावला तर एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्र तंत्र, गंडे दोरे, किंवा त्यासारखे उपचार करणं
9) बोटानं शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणं, गर्भवती महिलेच्या गर्भातील बालकाचे लिंग बदलण्याचा दावा करणं
10) स्वतःमध्ये अलौकिक शक्ती आहे अथवा आपण कोणाचे तरी अवतार आहोत असा दावा करणं आणि आपण पवित्र आत्मा असल्याचं भासवून नादी लागलेल्या व्यक्तीला, पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती, प्रियकर होतास, होतीस असं सांगून अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणं किंवा एखाद्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी लैगिंक संबंध ठेवणं
11) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचं भासवून त्या व्यक्तीचा धंद्यासाठी आणि व्यवसायासाठी वापर करणं. अशा बारा अघोरी प्रकारांवर त्यात बंदी आहे.
महत्वाचे - वारकरी पंथाच्या उपक्रमांवर, धार्मिक कामांवर, सत्यनारायणादि कार्यांवर, देवस्थानांमधील पूजांवर – एकूण सर्वसामान्य धार्मिक कार्यक्रमांवर मात्र बंदी नाही. तेव्हा या कायद्याबाबत गैरसमज बाळगू नये. त्याचा जास्तीत जास्त प्रसार करून तो सामान्य जनतेला सहज समजावा यांसाठी प्रत्येक सुजाण नागरिकांनी तो जनतेपर्यंत न्यावा, असं आवाहन पुरोगामी संघटनांनी केलंय.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.