स्पेशल रिपोर्ट

4 टक्के दरानं कर्ज देण्याची मागणी

शशिकांत कोरे, सातारा
 "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तु वेडा कुंभार" हे गीत आपण ऐकलं असेलंच. बारा पगड समाजामध्ये किमयागार अशी कुंभार समाजाची ओळख आहे. काळ बदलतोय. गावातील लोकांच्या उपजिविकेची साधनंही बदलतायंत. त्याचा परिणाम पारंपरिक कुंभारकामावर देखील झालाय. पूर्वी मकरसंक्रातीसाठी सुगडी बनवण्याची लगबग गावागावातील कुंभारवाड्यांमध्ये दिसायची. आता केवळ 5 टक्केच लोकं हे वाण तयार करतात.

महागाईचा परिणाम

वाण बनवण्यासाठी नदीकाठच्या गाळाची माती चाळून घेतली जाते. त्यामध्ये घोड्याची किंवा गाढवाची लीद वापरली जाते. पण आता पुरेशी लीद मिळत नाही आणि नवीन पिढीही लीद आणण्यास तयार होत नाही. त्यामुळं लीदऐवजी उसाचं बगॅस वापरलं जातं. चाकावर तयार होणारी सुगडी भट्टीत भाजावी लागतात. त्यासाठी जळण लागतं. त्याचा भाव वाढलाय. एकूणच काय तर वाढत्या महागाईचा फटका या छोट्या पारंपरिक कारागिरांना बसतोय.

4 टक्के दरानं कर्ज द्या 

चाकावर संक्रातीचं वाण बनतानाचं दृश्य मनमोहक असतं. पण त्या कुंभाराच्या डोऴयातील अश्रू मात्र कोणाला दिसत नाहीत. दिवसेंदिवस या व्यवसायास घरघर लागली असताना आता बिहारी, युपी, राजस्थानी अशा परप्रांतीय लोकांनी या व्यवसायात शिरकाव केल्यानं या कारागिरांपुढील अडचणी आणखी वाढल्यात. या सर्व गोष्टींचा विचार करुन शासनानं चार टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध द्यावं, अशी या कारागिरांची मागणी आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.