स्पेशल रिपोर्ट

देशी कोंबडीपालनातून कुकूच कूsss!

शशिकांत कोरे, सातारा
दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय अधिक तारणहार ठरू शकतो. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील वाई फाट्यानजीकच्या जोशीविहीर इथल्या हबीब सय्यद फरास या युवकानं  कोंबडीपालनाचा यशस्वी व्यवसाय केलाय. ब्रॉयलर कोंबड्यांऐवजी देशी कोंबड्याच त्यांनी पाळल्यात. आज त्यांच्या या देशी कोंबड्यांच्या पोल्ट्रीत हजारभर कोंबड्या असून दररोज 500 अंडी मिळालीच पाहिजेत, या दृष्टीनं ते नियोजन करतात. याशिवाय अंड्यांची विक्री करण्यासाठी ते बाह्या सरसावून तयार असतात. यामुळं आणखी दोन पैसे जास्त मिळतात, असा त्यांचा अनुभव आहे. देशी कोंबड्यांचा सातारा जिल्ह्यातील हा एकमेव प्रकल्प आहे.   
 

 

 बाजारपेठेमुळं बदलला व्यवसाय

मुळात सातारा तालुक्यातील गजवडी इथं राहणारे हबीब सय्यद फरास हे उपजीविकेसाठी वाई येथील जोशीविहीर  इथं आले. सुरुवातीस ते बोकड, शेळीपालन करीत होते. पण बाजारपेठेत ब्रॉयलर कोबडीस असणाऱ्या जास्त मागणीमुळं त्यांनी आपल्या मूळ शेळीपालनाच्या व्यवसायाऐवजी देशी कोबंडीपालन करण्याचा निर्णय घेतला.

  

intro1एक हजार कोंबड्यांचा कलकलाट
कोंबडीपालनासाठी त्यांनी फलटण इथल्या मोमीन व्हेंचर्समधून एक हजार पिल्लांची खरेदी केली. एक दिवसाची ही पिल्लं पंधरा रुपये दरानं मिळण्यासाठी 15 दिवस आधी बुकिंग करावं लागतं. या लहान पिल्लांना बल्बखाली ऊब मिळाल्यावर ती एका महिन्यात मोठी होतात. फरास यांनी या देशी कोंबड्यांची योग्य वाढ झाल्यावर त्यातील नरांची विक्री आणि मादीचा उपयोग अंडी उत्पादनासाठी केला. हा व्यवसाय करण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याची गरज भागवणं आणि आरोग्यासाठी लसीकरण करणं आवश्यक आहे, असं फरास म्हणतात. त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांचीही मदत घेतलीय.

 

 

 

नासाडी अन्नातून वाचवले 60 हजार रुपये
एक हजार कोंबड्यांना खाद्य पुरवणं हे मोठ्या जोखमीचं काम. ग्रामीण भागात ज्वारी, सुकट आदी खादय देण्याची प्रथा आहे. याशिवाय खाजगी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केलेलं खाद्य कोंबड्यांना देण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. या खर्चात बचत करण्यासाठी हबीब फरास यांनी शक्कल लढवली. यासाठी त्यांनी जोशीविहीर भागातील हॉटेल, ढाबा, तसंच मंगल कार्यालयातील उरलेलं अन्न फेकून दिलं जातं, हे हेरलं. हे नासाडी होणारं अन्न ते स्वतः दररोज डबे भरून आपल्या गाडीनं आणतात. हे अन्न ते आपल्या कोंबड्यांना खाद्य म्हणून देतात. यासाठी त्यांना केवळ 40 हजार रुपये खर्च येतोय. अशा प्रकारे खाजगी कंपनीकडून खाद्य विकत घेण्यासाठी होणाऱ्या लाखभर रुपयांच्या खर्चात कपात होऊन त्यांची सुमारे 60 हजार रुपयांची बचत होतेय.

  

introस्वतःच सेल्समन बनून कमवले दुप्पट पैसे
वर्षाला किमान एक हजार कोंबडे विकण्याचं उद्दिष्ट हबीब फरास यांचं आहे. साधारणपणं बाजारात 200 रुपयास कोंबडं विकलं जातं. पण फरास यांचं स्वतःचं दुकान आहे. ते आपल्याच दुकानातून कोंबड्यांची रिटेल विक्री करतात. त्यामुळं सर्वसाधारणपणं 200 रुपयांस विकला जाणारा कोंबडा ते 350 रुपयांस विकतात. थोडक्यात, 15 रुपयास घेतलेलं एक छोटं पिल्लू पूर्ण वाढ झाल्यावर 350 रुपये देऊन जातं. त्यामुळं कोंबड्यामागं अधिकची रक्कम मिळून त्यांची उलाढाल जवळजवळ तीन लाखांपर्यंत होते. दिवसाकाठी 100 अंडी मिळतात. या अंड्यांपासून 500-600 रोज मला मिळतात. शिवाय कोंबड्यांपासून मिळणारं चार ट्रेलर खत पाच हजार रुपये दरानं विकल्यावर त्यांना अधिकचे 20 हजार रुपये मिळतात. कोंबडीपालन करत असताना पिल्लांची अधिक काळजी घ्यावी लागते. तरीही 1100 पिल्लांपैकी 100 पिल्लं मरतात, असं फरास सांगतात.  गावागावातून वा घरांतून किमान एक-दोन कोंबड्या पाळल्या जातात. पण या कोंबडीपालनास व्यावसायिक दृष्टिकोन दिल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकतं, शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय केला तर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊन त्यांना अधिकचं उत्पन्न मिळू शकतं, हेच हबीब फरास यांनी आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केलंय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.