टॉप न्यूज

17 गावांची तहान शमणार

ब्युरो रिपोर्ट, सांगली
मिरज पूर्व भागातल्या 17 गावांचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. म्हैसाळ योजनेतून या गावांना पाणी मिळावं म्हणून गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालंय. भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचं पाणी प्रश्नासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आता सुटलेलं आहे. आंदोलनाची दखल घेऊन सरकारनं आज या गावांच्या पाण्यासाठी तातडीची 8 कोटींची मदत जाहीर केलीय. 
 

प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 135 कोटींची मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलीय. बानेवाडी सिंचन योजना 31 मार्चपर्यंत कार्यान्वित करुन भोसे तलावात पाणी सोडण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय.

मुंडे, तावडे सांगलीकडे

दरम्यान, आमदार सुरेश खाडे यांचं उपोषण सोडवण्यासाठी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे सांगलीकडं रवाना झालेत. उपोषणामुळं आमदार खाडे यांची प्रकृती ढासळलीय, तसंच चार अन्य उपोषणकर्त्यांनाही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. पाण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मिरजेतल्या 14 गावांनी बंद पुकारलाय. यावर तातडीचा उपाय म्हणून म्हैसाळ प्रकल्पातलं पाणी भोसे तलावात सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठीच आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय.  uposhan

10 वर्षांपासूनचा प्रश्न

कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्यात म्हैसाळ जलसिंचन योजनेचं पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यात आलंय. मात्र मागील 10 वर्षांपासून मिरज पूर्व भागातील 17 गावं तहानलेली आहेत. या गावांत पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्यांची मोठी टंचाई निर्माण झालीय. या गावांना आधार देणारा भोसे गावातला तलाव पूर्णपणं आटलाय. या तलावात पाणी सोडण्यासाठी येथील शेतकरी 10 वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. बनेवाडी येथील कॅनॉलमधून पाणीउपसा करून भोसे तलावात सोडण्याची योजना आहे. त्याची कामं जवळपास पूर्ण झाली आहेत. केवळ वीजपंप आणि वीजजोडणी केली नसल्यानं पाणी तलावात पोहोचू शकलेलं नाही. येथील भोसे, सोनी, करोली, पाटगाव, कळंबी, सिद्धेवाडी, मानमोडी, खरकटवाडी या गावांतील लोक पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तर म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलची कामं पूर्ण झाली नसल्यानं एरंडोली, खंडेराजुरी, मालगाव, गुंडेवाडी यांसारख्या नऊ गावांत पाणी आलेलं नाही.

आमदार खाडेंची प्रकृती ढासळली

दरम्यान, गेल्या चार दिवसांच्या उपोषणामुळं आमदार सुरेश खाडे यांच्या शरीरातील साखर कमी झाली असून रक्तदाब वाढलाय. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला देण्यात आलाय. मात्र खाडे यांनी हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिलाय. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनीही गर्दी केली आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सरकारनं निर्लज्जपणा सोडून द्यावा, अशा कडक शब्दात सरकारची हजेरी घेतली. आता खाडेंनी उपोषण सोडावं, अशी विनंती भाजपचे नेते मुंडे आणि तावडे करणार आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही आमदार सुरेश खाडे यांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय.

uposhan4महिलाही उतरल्या रस्त्यावर

बनेवाडी येथील कॅनॉलमधून पाणीउपसा करून भोसे तलावात सोडण्याच्या मागणीसाठी सांगलीत सुरू असणारं आंदोलन आणखीनच उग्र स्वरूप धारण करीत आहे. आज या मागणीसाठी भाजप आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि महिलांनी राजवाडा चौकातच ठिय्या आंदोलन करीत सांगलीत चक्काजाम आंदोलन केलं. तब्बल १५ मिनिटं सुरू असणाऱ्या या चक्का जाम आंदोलनामुळं शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.

...तर 15 गावांतील दुष्काळ संपेल

सांगली जिल्ह्यातल्या भोसे तलावात पाणी भरलं तर 15 गावांचा दुष्काळ संपुष्टात येईल. सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांत साधारणपणं 71 गावं आणि 795 वाड्यावस्त्यांवर टॅंकरनं पाणीपुरवठा केला जातो. ही गावं आणि वाड्यावस्त्यांची लोकसंख्या जवळपास दोन लाख 53 हजार 322 इतकी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी फक्त 125 टॅंकरनं पाणीपुरवठा केला जातो. या भागात 20 चारा छावण्या आहेत आणि त्या छावण्यांमध्ये जवळपास 28 हजार जनावरं आहेत. ज्यांना सरकारकडून चारा पुरवठा केला जातो.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.