
उस्मानाबाद – राजकारण्यांसह झाडून सारा 'आहे रे' वर्ग गुलाबी थंडीचा ऊबदारपणा अनुभवण्यात मश्गुल आहे. दुसरीकडं राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील जनता हंडाभर पाण्यासाठी वणवण करतेय. तीव्र पाणीटंचाईचा फटका आताच मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतू लागलाय. राज्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या भैरवनाथाच्या सोनारीत तहानेनं व्याकूळ झालेली माकडं दूषित पाणी प्यायली आणि तब्बल 200 माकडं मृत्युमुखी पडली.
उभा गाव शहारला...
परांडा तालुक्यातील सोनारीचा भैरवनाथ हे राज्यातील अनेकांचं कुलदैवत आहे. भक्तगणांचा इथं नेहमीच राबता असतो. या मंदिराच्या परिसरात सुमारे दोन हजारांहून अनेक माकडं आहेत. तीव्र पाणीटंचाईचा फटका या मुक्या जीवांनाही बसतोय. माणसांची तहान कशीबशी भागते, त्यामुळं या माकडांच्या तहानेकडं लक्ष देणार तरी कोण? तहानेनं सैरभैर झालेल्या या माकडांनी मग मंदिर परिसरात असलेल्या कुंडांकडं आपला मोर्चा वळवला आणि त्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवली. त्यानंतर दररोज सुमारे 20 याप्रमाणं 200 माकडं अचानक मृत्युमुखी पडली आणि उभा गाव शहारला.
दूषित पाण्यानं मृत्यू
या घटनेबाबत ग्रामस्थांनी प्रारंभी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र, याची दखल न घेतल्यानं शेवटी २६ डिसेंबर रोजी गावातील तरुण रस्त्यावर उतरले. हा उद्रेक पाहिल्यानंतर वन विभाग खडबडून जागा झाला. वनरक्षक गुरव यांनी सोनारीला भेट देऊन मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 40 माकडांची पाहणी केली. त्यानंतर उस्मानाबादहून पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकणे यांच्या नेतृत्वाखालील पथक सोनारीत दाखल झालं. त्यांच्या प्राथमिक अहवालानुसार दूषित पाण्यामुळं न्यूमोनिया आणि मलेरिया होऊन या माकडांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय.
तहानच जीवावर बेतली
सोनारी इथं सोनूबाई व काशीबाई अशी दोन प्राचीन जलकुंडं आहेत. चैत्र महिन्यातील सोनारीची यात्रा संपल्यानंतर या दोन्ही कुंडांची स्वच्छता केली जाते. परंतु पाणीटंचाईमुळं यंदा सफाईकडं दुर्लक्ष झालं. त्यातचं एवढ्या घाण पाण्याला जनावरंसुद्धा तोंड लावणार नाहीत, असं सर्वांनाच वाटत होतं. पण काय करणार... भूक आणि तहान माणसाला काहीही करायला लावते. या मुक्या जीवांना अखेर या पाण्यावरच तहान भागवावी लागली, आणि जीव गमवावा लागला.
Comments
- No comments found