
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या कारकीर्दीत आदिवासी विकास मंत्रालयानं बोल्डेवाडीत ‘इकोटेक व्हिलेज’ ही आगळी वेगळी संकल्पना राबवली. देशातला हा पहिलाच प्रयोग. ४ जून २००८ ला योजनेला मंजुरी मिळून काम सुरू झालं. वर्ध्याच्या ‘सेंटर फॉर सायन्स फॉर व्हिलेजेस’नं हा प्रकल्प उभारला. अवघ्या सव्वा वर्षात हे इकोटेक व्हिलेज उभं राहिलं. दोन कोटी रुपये खर्च करून गावात १०२ सुरेख घरं बांधण्यात आली. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आता एखाद्या रिसॉर्ट सारखं दिसतं. जुन्या बोल्डावाडीत कोणत्याही सुविधा नव्हत्या. रस्ते नव्हते, पाण्याचे हाल, मातीची मोडकळीस आलेली घरं, अशी परिस्थिती होती. आता चित्र पालटलं. इथं पाणीपुरवठ्यासाठी टाकी आली. १० बायोगॅस प्लाँट, एक सामाजिक सभागृह, पाच दुकानं, संस्कार केंद्रही बांधण्यात आलं. शिवाय गावांतर्गत २०-३० फूट रुंदीचे दगडी रस्ते बांधून अगदी सुनियोजित असं गाव उभं राहिलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं लावण्यात आली. सौर उर्जेवर चालणारे दिवे बसवण्यात आले. आता या नव्या टुमदार घरांमध्ये आदिवासी कुटुंबांनी संसारही थाटलाय. गावात नळाचं पाणी आलं. त्यामुळे महिलांचे कष्ट वाचले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं. घरात डिश टीव्ही आणि खेळायला ग्राऊंड मिळाल्यानं बोल्डावाडीतली मुलंही खूश झाली. बोल्डावाडी म्हणजे आदीवासी विकासाचं एक मॉडेलच बनलंय. अशा प्रकारच्या योजना देशात इतर आदीवासी भागांमध्येही राबवल्या जाव्यात अशी अपेक्षा इथले आदिवासी युवक व्यक्त करतायत. शिवाय आदिवासींसाठी सगळीकडे असे प्रकल्प उभे राहिले तर आदिवासीही विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील, असं आजूबाजूच्या गावकऱ्यांना वाटतंय. इकोटेक व्हिलेजची वैशिष्ट्ये १. घर बांधकाम 1. बांधकामात कुठंही सिमेंट आणि लोखंडाचा वापर नाही 2. बांधकामासाठी पूर्णपणे इको फ्रेंडली साहित्याचा वापर 3. हे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम राहतं २. मजबूत दगडी रस्ते 1. रस्त्यांमध्ये डांबर किंवा सिमेंटचा वापर नाही 2. रस्ते दगडी असून मजबूत आहेत 3. बैलगाडीसाठीही भक्कम रस्ता ३. वृक्षारोपण 1. बोल्डावाडीत प्रत्येक घरासमोर झाड 2. झाडांना ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय ४. पाण्याची व्यवस्था 1. ट्यूबवेलद्वारे पाणी टाकीत 2. प्रत्येक घरासमोर नळ 5. वीज पुरवठा बायोगॅस प्लँटद्वारे वीज निर्मिती सर्व घरांमध्ये वीज
Comments
- No comments found