टॉप न्यूज

आरोग्य विभागाची माहेरघर योजना

ब्युरो रिपोर्ट

गोंदिया

सरकारी आरोग्ययंत्रणेबद्दल नेहमीच निराशेनं बोललं जातं. सरकारी दवाखान्यामध्ये सुविधांची बोंबाबोंब असते, अशी पेशंट तक्रार करतात. त्यात तथ्यही असतं. पण गोंदियातल्या नक्षलवादी भागातल्या आरोग्य विभागानं हा गैरसमज दूर केलाय. त्यांनी राबवलेल्या माहेर नावाच्या उपक्रमानं आदिवासी महिलांना दिलासा दिलाय. या महिलांची बाळंतपणं हॉस्पिटलमध्ये सुखकर व्हावीत यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी राबतायत.  

गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर थाटलंय. याशिवाय धर्मशाळा आणि फिरते रुग्णालय या सुविधाही येथे उपलब्ध आहेत. बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना साडीचोळी व बाळाला टकूचं-झबलं दिली जातात. या सुविधांचा फायदा घेण्यासाठी आदिवासी भागातील लोकही आता आपणहून पुढे येऊ लागले आहेत. आदिवासी भागात होणारी सर्व बाळंतपणं रुग्णालयातच होतील, असा विश्वास यातून निर्माण झालाय. विशेष म्हणजे अशा प्रकारची सुविधा देणारा गोंदिया हा राज्यातील पहिला जिल्हा असून भविष्यात याचा सर्वांनाच आदर्श घ्यावा लागणार आहे.

जिल्ह्यात १३ माहेरघर, १६ धर्मशाळा आणि तीन तालुक्यात फिरती रुग्णालयं कार्यरत आहेत. अदिवासी नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या शीला घासले, निर्मला भूमिके या बाळंतपणासाठी मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहेरघरमध्ये दाखल झाल्या आहेत. येथे मिळणाऱ्या सुविधा आणि उपचारांबद्दल समाधानी आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनाही चांगल्या सुविधा मिळत असल्याने तेही खूश आहेत. त्यांना आता उपचारांची कसलीच काळजी वाटत नाहीये. `कधी एकदा बाळाले पाहतोय आसं होन गेलाय.` हे त्यांचे बोलच बरंच काही सांगून जातात.

पायाभूत सोयीसुविधांमुळे आरोग्य केंद्रांत काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी खूश असून पेशंटची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर राहत असल्याचे अनोखे चित्र या आदिवासी भागात पाहायला मिळत आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.