टॉप न्यूज

कलगी तुरा ऐकू जाईना

अविनाश पवार

अविनाश पवार, मंचर   

कलगीतुरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ राहतं ते भांडण...बऱ्याचदा भांडणालाच कलगीतुरा असं संबोधलं जातं. पण कलगीतुरा नावाची एक लोककला उत्तर पुणे जिल्ह्यात चांगलीच लोकप्रिय आहे. विशेषतः श्रावण महिन्यात सणाच्या दिवशी गावोगावी या कलगीतुऱ्याच्या कार्यक्रमांचं आयोजन होतं. शंकर-पार्वतीमधील वाद या कलगी तुऱ्यातून हिरीरीने लढवला जातो.

सवाल जवाबाची कला 

सृष्टीची निर्मिती शिव-पार्वतीनं केल्याची आख्यायिका आहे. या सृष्टीनिर्मितीबाबत शिव-पार्वतीचं झालेलं भांडण या कलगी तुऱ्यातून सादर केलं जातं. अर्थात यात दोन पार्ट्या असतात. एक कलगीवाले आणि दुसरे तुरेवाले. कलगी ही पार्वतीची बाजू. तर तुरा ही श्री शंकराची बाजू...सृष्टीच्या नानाविध नियमांवर भाष्य करत, मानवी स्वभावाचे कंगोरे, गूढ उकलण्याचा प्रयत्न यातून केला जातो. एकमेकांच्या प्रश्नांना त्यांना उत्तर द्यावं लागतं. 

कार्यक्रमावर मर्यादा

कलगीतुऱ्याचा हा कार्यक्रम कित्येक तास चालतो. मात्र त्याला आता मर्यादा आल्यात. मात्र अजूनही हे कार्यक्रम प्रेक्षकांची गर्दी खेचतायत. आंबेगाव तालुक्यातील थोरंदाळे गावातील शाहीर सुदामराव गुंड यांनी ही कला राज्यभर पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी त्यांच्या पुण्यतिथीला कलगीतुऱ्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जात. या कार्यक्रमात शाहीर सुदामराव गुंड यांचे गाजलेले कलगीतुरे सादर करण्यात येतात.    

कलगीतुऱ्यातून जनजागृती 

आजही सामाजिक जनजागृतीसाठी या लोककलेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, हागणदारीमुक्त गाव या सरकारी उपक्रमांच्या प्रचारासाठी या लोककलेचा प्रभावी वापर केला जातो. 

सरकारी उपेक्षा

काळाच्या ओघात ही लोककला लोप पावत चाललीय. समाजापुढे आम्ही प्रश्न मांडतो पण आमचे प्रश्न सरकारच्या कानापर्यंत पोचतच नाहीत, अशी तक्रार ही कला सादर करणाऱ्या शाहिरांची आहे. महाराष्ट्रात कलगीतुरा सादर करणारे एक हजार शाहीर आहेत. सरकार दरबारी कैफीयत मांडण्यासाठी आता त्यांची संघटनाही स्थापन करण्यात आलीय. सरकारला त्यांची कथा आणि व्यथा ऐकायला कधी वेळ मिळेल कुणास ठाऊक?


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.