टॉप न्यूज

सहकारमंत्र्यांचाच फड जाळला

अविनाश पवार

यंदाच्या हंगामात सुरू झालेलं ऊसदरासाठीचं आंदोलन आता चांगलंच भडकलंय. कारखान्याचे बॉयलर पेटण्याआधीच शेतातील उभा ऊस पेटू लागलाय.  सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाच त्याचा पहिला फटका बसला. त्यांच्या इंदापुरातल्या शेतातील उभा ऊस पेटवून देण्यात आलाय. आता या जाळपोळीचा धूर राज्यभरात पसरतोय. त्यातच पोलीस गोळीबारात तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्यानं सांगली जिल्हा अजूनही खदखदतोय. 

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं अख्खा सांगली जिल्हा 21 तारखेपर्यंत अशांत म्हणून घोषित झालाय. किसान महासंघानंही या आंदोलनात उडी घेतलीय. दिल्लीतील कृषी भवनासमोर कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे मृत नलावडे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सांगलीकडं रवाना झालेत. शेट्टी यांना आता जामीन मंजूर झाल्यानं तुरुंगातून बाहेर येऊन आंदोलनाची पुढील दिशा काय जाहीर करतात, याकडं शेतरकऱ्यांचं लक्ष आहे.

पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं हे आंदोलन सुरू केलं आहे. 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या नरूटवाडीतील कुंडलिक कोकाटे या आंदोलक युवकाचा मृत्यू झाल्यानं इथला शेतकरी अधिकच संतप्त झालाय. त्यातच काही लोकांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या, तसंच त्यांच्या नेतृत्वाखालील कर्मयोगी साखर कारखान्याच्या संचालकांच्या शेतातील ऊस पेटवून दिला. हर्षवर्धन पाटील यांचा दोन एकर, कारखान्याचे संचालक तुकाराम जाधव यांचा दोन एकर, तर पाटील यांचे निकटवर्तीय मंगेश पाटील यांचा पाच एकर ऊस अज्ञात व्यक्तींनी जाळला आहे. यासंदर्भात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं आंदोलनाची धार थोडी कमी झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय.  पण आग धुमसतेच आहे. आता सर्वांचं लक्ष शेट्टी यांच्या भूमिकेकडं लागलंय. 

ठळक घडामोडी

  • खासदार शेट्टींना जामीन मंजूर
  • शरद जोशी सांगलीकडे रवाना
  • आंदोलनात शेतकरी किसान महासंघ सक्रीय
  • दिल्लीत पवारांच्या पुतळ्याचे दहन

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.