टॉप न्यूज

पवार का रागावलेत?

रणधीर कांबळे

रणधीर कांबळे, मुंबई 

शरद पवार हे टोकाची टीका करणारे नेते नाहीत. मात्र जेव्हा कधी ते टोकाची भूमिका घेतात तेंव्हा मात्र त्यामागे त्यांचं लक्ष एकाच लक्ष्यावर नसतं. एकाच वेळी अनेक सावजं टिपण्याचं पवारांची खासीयत आहे. आणि त्यांचं राजकारण जाणणा-या सगळ्यांनाच ते माहित  आहे. खरं तर हे लिहिण्याचं कारण म्हणजे शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना थेट जातीवर भाष्य केलंय. तुमच्या जातीचे कारखाने नीट चाललेत तिथं तुम्ही आंदोलन करत नाहीत, आमच्याकडे येऊन सगळं बिघडवून टाकताहेत...अशा आशयाचं त्यांच विधान आहे...

शरद पवार एवढे का रागवलेत.. जेव्हा पत्रकार महाराष्ट्रातल्या विषयावर पाच सहा  वर्षांपूर्वी पवारांना राज्यातल्या प्रश्नावर त्यांची प्रतिक्रिया विचारायचे तेव्हा हा राज्यातला विषय आहे, त्याबाबत राज्यातल्या नेत्यांना विचारा असे म्हणून टाळायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मग राजू शेट्टी यांच्या ऊसाच्या शेतक-याच्या आंदोलनानं एवढे अस्वस्थ का झाले ? फक्त अस्वस्थच नाही तर थेट लढण्याच्या तयारीत आहेत की काय असे वाटावे.

शरद पवार हे जाणते राजे म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. खरं तर त्यांचा राज्यातले प्रश्न समजून घेण्याचा आवाकाही दांडगा आहे. या आवाक्यामुळंच त्यांनी या राज्यात राज्य करायचं तर साखर कारखानदारीचं बळ आपल्या पाठीमागं राह्यला हवं, हे अनेक वर्षापूर्वीच जाणलं होतं. त्यामुळंच तर मग या कारखान्यांना जीवनरस पुरवणारी जी जी केंद्रं होती त्यावर त्यांनी आपली माणसं अन् वर्चस्व राहिल ,अशी व्यवस्था केली होती . त्यामुळंच जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडून १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा हे सगळे साखर कारखानदारीतले जहागीरदार त्यांच्या बरोबर आले.  या पक्षानं राज्यात महत्वाचं स्थान निर्माण केलं. पण गेल्या काही वर्षात या साखर कारखानदारीचं गणित बिघडू लागलंय. अनेक कारखाने डबघाईला आले. अनेक मोडीत निघाले. त्यामुळे नव्या पिढीनं मोडकळीस आलेले कारखाने स्वस्तात खरेदी करून चालवायला घ्यायची भूमिका घेतली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढच्या पिढीचे नेते आघाडीवर होते. त्यावरही आता लगाम लागलाय.

राज्य सहकारी बँक ही साखर कारखानदारीला टॅानिक पुरवणारी संस्था. या बॅकेंवर सरकारनं  प्रशासक  नेमल्यानं पवार कुटुंबीयांचं वर्चस्व कमी झालं. त्यामुळं आता या कारखानदारांना पवारांच्या उंब-यावर जाण्याचं एक कारण कमी झालंय. अनेक कारखान्यांना त्यांची आर्थिक घडी बसवणं अवघड जातंय. या पार्श्वभूमीकवर आता राजू शेट्टी यांचं आंदोलन जेव्हा सुरू झालं तेंव्हा हे कारखानदार आणखी अडचणीत आलेत.

राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झालीय. पवार साहेंबांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात संदेश देऊनही राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या विरोधात एकाही काँग्रेसच्या नेत्याने चकार शब्द काढला नाही. जे साखर कारखाने चालवतात ते नेतेही यात उतरल्याचं दिसत नाहीत. जर आपण या आंदोलनाच्या विरोधात बोललो तर आपला जनाधार कमी होईल, अशी भिती त्यांच्या उरात भरलीय. त्यामुळेच शरद पवार यांनी एखादं वक्तव्य केलं तर त्यासाठी जीवाचं रान केल्याचा देखावा करणारे राष्ट्रवादीचे नेते यावेळी मात्र आपापल्या गडावरून खाली उतरल्याचं चित्र दिसत नाही. कारण हा त्यांचं सगळं राजकारण हे या सहकारी कारखाने आणि त्या निमित्तानं उभ्या राहिलेल्या अर्थकारणाभोवती फिरत आहे.

जर हे वातावरण असेच राहिलं तर राष्ट्रवादीतले बडे नेते पुढच्या काळात पवार यांच्या बरोबर राहतील का, हा प्रश्न पवारांना सतावतोय यात शंका नाही . कारण या पक्षातले बडे नेते  आधीच आपापल्या कोशात गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे पक्ष म्हणून ते  काम करण्याऐवजी आपआपल्या संस्थानात आपलं स्थान अधिक मजबूत करण्यात गुंतलेले आहेत. 

महाराष्ट्रातल्या अनेक पॅाकेटमध्ये लिंगायत मतांची भूमिका ही निर्णायक आहे. त्यात राजू शेट्टी आणि विनय कोरे यांचं राजकीय समीकरण जुळू लागलंय. त्यांचा पहिला फटका हा काँग्रेसला बसणार हे स्पष्टचं आहे. कोल्हापूर परिसरात आधीच अंतर्गत संघर्षामुळे राष्ट्रवादी उभारी घेईनाशी झालीय तर दुसरीकडे विनय कोरे यांच्या जनस्वराज्य पक्षानं चांगलं नेटवर्क तयार केलंय. जे तोडणं राष्ट्रवादीला अवघड आहे. त्यातच जर राजू शेट्टीची संघटना जर कोरेंना मिळाली तर ती ताकदही राष्ट्रवादीच्या विरोधात काम करेल. त्यामुळेच थोरल्या पवारांनी जेव्हा राजू शेट्टी यांच्यावर त्यांच्या जातीचा आधार घेत टीका केलीय त्याला हा ही एक कंगोरा आहे.

आता पुन्हा एकदा मराठा राजकारणाची तलवार उपसली नाही तर राष्ट्रवादीच्या एकूण राजकारणाला धक्का बसेल. याचाच विचार करून पवार आता मराठा कार्ड बाहेर काढताहेत की काय,  हे पुढच्या काळात स्पष्ट  होईल. पण पवारांच्या या टीकेमागे राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणात मराठा पुन्हा आक्रमक करणं,  राजू शेट्टी आणि विनय कोरेंचा झटका कमी करणं, याचाही विचार या विधानामागं आहे...

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.