टॉप न्यूज

शरद जोशींनी केली गोळीबाराच्या सीबीआय चौकशीची मागणी

ब्युरो रिपोर्ट

सांगली - पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस आंदोलनाला राजकीय वास येतोय. सीबीआयनं त्याचा बारकाईने अभ्यास करावा, असं शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात.

चालू हंगामात उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रूपये मिळावी, या मागणीसाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्टयात संतापाचा आगडोंब उसळलाय. सांगली जिल्हयातील वसगडे येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चंद्रकांत नलावडे या तरूण शेतकऱ्याचा बळी गेला. शरद जोशी यांनी आज दुपारी वसगडे येथे जाऊन मृत नलावडे याच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील सूचक विधान केले. 

'पश्चिम महाराष्ट्रात हातवाले आणि घड्याळवाले यांचे प्राबल्य आहे. शेतकरी संघटना जी राजकारणापासून बाजूला उभी होती ती राजकारणात ओढली गेली. वेगवेगळ्या पक्षांमध्ये ती द्वंदवाचे स्थान झाले आहे, त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास व्हायला हवा. याची तसेच गोळीबाराच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी', अशी मागणी शरद जोशी यांनी केली.

येत्या २१ नोव्हेंबर रोजी सांगलीत ऊस परिषद घेण्यात येणार असून त्या परिषदेला राजू शेट्टी यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या होऊ घातलेल्या ऊस परिषदेच्या निमित्ताने सर्व शेतकरी संघटनेचे नेते एकाच व्यासपीठावर येऊन लढा आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.