टॉप न्यूज

सरकार फक्त बघतंय

अविनाश पवार

मृत आंदोलकाच्या कुटुंबियांची शरद जोशींनी घेतली भेट 

अविनाश पवार, इंदापूर

आम्हाला फार पैसा नको, फक्त उत्पादन खर्च सुटेल एवढा भाव आमच्या शेतमालाला द्या...शेतकरी संघटनेची ही जुनी मागणी. त्यासाठी शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे संघर्ष सुरु आहे. या संघर्षात कित्येक शेतकऱ्यांना आपल्या प्राणांची आहुतीही द्यायला लागलीय. पण सरकारच्या काळजाला पाझर फुटत नाहीये. सध्या सुरु असलेल्या ऊसदर आंदोलनातही याच इतिहासाची पुनरावृत्ती सुरू आहे.  इंदापूरमधल्या नरुटवाडीतला कुंडलिक कोकाटे हा तरूण शेतकरी या आंदोलनात मृत्यूमुखी पडला. कुंडलिक घरातला कर्ता माणूस. त्यामुळं आता कोकाटे कुटुंबाचा आधारच नाहिसा झालाय. संवेदनाहीन सरकारला त्याच्या कुटुंबियांची साधी विचारपूसही करावीशी वाटलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आज नरुटवाडीला येऊन त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. 

इंदापूरमधल्या सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी कारखान्यासमोर शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनात १० हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. कुंडलिक कोकाटेच्या घरची साडेचार एकर उसाची शेती आहे. ती कसत असताना उस उत्पादनाचा वाढता खर्च पाहता हाती काही येत नाही, हा त्याला अनुभव होताच. शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू झाले आणि त्याच्या खदखदणाऱ्या असंतोषाला वाट मिळाली. त्याने आंदोलनात स्वतःला झोकून दिले. शेतकऱ्याच्या न्याय्य हक्कासाठी मी लढणार, असा बाणा असणारा कुंडलिक मागे फिरलाच नाही. 

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अटक झाल्याचे कळताच हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन इंदापूर बंद ची हाक दिली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी मोर्चा सोलापूर महामार्गाकडे वळविला. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्यांनी आपले लक्ष्य बनवले. त्यावेळी कुंडलिकने वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विचित्र अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.