
क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब याला अखेर आज फाशी देण्यात आलीय. पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये सकाळी साडेसात वाजता ही कार्यवाही करण्यात आली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिलीय. डॉक्टरांनीही थोड्या वेळापूर्वी कसाबला मृत जाहीर केलंय. शिवाय येरवडा जेलमध्येच कसाबला दफन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.
मात्र कसाबला फाशी देण्यात एवढी गुप्तता का पाळण्यात आली, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर कसाबला गुपचूप मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून पुण्याला नेण्यात आलं. तिथंच त्याला सकाळी तातडीनं फासावर चढवण्यात आलं.
कसाब आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवला होता. हवालदार तुकाराम ओंबळे यांनी स्वतःचं बलिदान देऊन कसाबला जिवंत पकडलं होतं. त्यानंतर कसाबला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कसाबचा गुन्हा कोर्टात सिध्द केला होता. कोर्टानं दहशतवादी कृत्य केल्याप्रकरणी कसाबला दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली.
या शिक्षेवर हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर कसाबनं फाशीचं रुपांतर जन्मठेपेत व्हावं, म्हणून सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं ही शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर कसाबनं राष्ट्रपतींकडंही दयेचा अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आणि कसाबला ताबोडतोब फाशी देण्यात आली.
दरम्यान, कसाब याला आज देण्यात आलेल्या फाशीचा निर्णय ७ नोव्हेंबरलाच घेण्यात आल्याचं, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत म्हटलयं. फाशी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गोपनीयता पाळण्यात आली होती. ऑपरेशन एक्स नुसार ही सर्व कार्यवाही करण्यात आली. आज सकाळी साडेसात वाजता अजमल कसाबला फाशी देण्यात आली असून, संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. मी देशाला कसाबबाबत लवकर कारवाई करण्याबाबत सांगितल्याप्रमाणे करून दाखविलं आहे. पाकिस्तान सरकारला फॅक्सद्वारे याची माहिती देण्यात आली असून, पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
घटनाक्रम-
२००८
नोव्हेंबर २७- मध्यरात्री दीड वाजता कसाबला पकडून अटक. नायर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं.
नोव्हेंबर २९- पोलिसांनी कसाबचा जबाब नोंदविला. कसाबकडून गुन्ह्यांची कबुली.
नोव्हेंबर २९- दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील सर्व ठिकाणे ६० तासांनंतर सुरक्षित करण्यात यश, नऊ दहशतवादय़ांचा खात्मा.
नोव्हेंबर ३०- कसाबची पोलिसांसमोर कबुली.
डिसेंबर २७, २८- ओळख परेड घेण्यात आली.
२००९
जानेवारी १३- एम. एल. तहलियानी यांची २६-११ च्या खटल्यासाठी विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
जानेवारी १६- कसाबच्या खटल्यासाठी आर्थर रोड जेलची निवड.
फेब्रुवारी ५- कुबेर जहाजावर मिळालेल्या वस्तुंसह कसाबच्या डीएनए नमुन्याची चाचणी
फेब्रुवारी २०,२१- न्या. सौ. आर. व्ही. सावंत-वागुले यांच्यापुढे कसाबची कबुली.
फेब्रुवारी २२- विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती.
फेब्रुवारी २५- कसाबसह इतर दोघांविरुद्ध एस्प्लानेड महानगर न्यायालयात आरोपपत्र दाखल.
एप्रिल १- विशेष न्यायालयाकडून अंजली वाघमारे यांची कसाबचे वकील म्हणून नेमणूक.
एप्रिल १५- २६-११ च्या खटल्याला सुरुवात.
एप्रिल १५- अंजली वाघमारे यांची नियुक्ती रद्द.
एप्रिल १६- एस.जी. अब्बास काझमी कसाबचे नवे वकील म्हणून नेमणूक.
एप्रिल १७- कसाबचा कबुलीजबाब न्यायालयासमोर मांडण्यात आला.
एप्रिल २०- सरकारी पक्षातर्फे कसाबवर ३१२ आरोप.
एप्रिल २९- कसाब अल्पवयीन असल्याचा वकिलाचा दावा तज्ज्ञांनी फेटाळला.
मे ६- आरोप निश्चित, कसाबवर केलेले ८६ आरोप त्याने नाकारले.
मे ८- पहिल्या साक्षीदाराने कसाबला ओळखले.
जून २३- हफीज सईद, झाकी-उर-रेहमान लखवी यांच्यासह २२ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी.
जुलै २०- विशेष न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांच्यापुढे कसाबने गुन्ह्यांची कबुली दिली.
नोव्हेंबर ३०- कसाबचे वकील अब्बास काझमी यांना हटवले.
डिसेंबर १- काझमी यांच्या जागी के. पी. पवार यांची नियुक्ती.
डिसेंबर १६- सरकारी पक्षाने २६-११ चा खटला पूर्ण केला.
डिसेंबर १८- कसाबन सर्व आरोप नाकारले.
२०१०
फेब्रुवारी ११- खटल्यातील एका आरोपीचे वकील शाहीद आझमी यांची कुर्ला येथे हत्या.
फेब्रवारी २२- डेव्हिड कोलमन हेडलीचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला.
फेब्रुवारी २३- अंतिम प्रतिवाद ९ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय.
मार्च ३१- निकालाची तारीख ३ मे निश्चित.
मे ६- कसाबला फाशीची शिक्षा.
जून ८- उच्च न्यायालयात अपीलसाठी आमीन सोलकर, फराना शाह यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती.
ऑक्टोबर १८- उच्च न्यायालयात सुनावणी सुरु.
ऑक्टोबर १९- संताप व्यक्त करीत न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची कसाबची इच्छा. कॅमेरावर थुंकून मला अमेरिकेला पाठवा, असे कसाब म्हणतो. न्यायाधीश त्याला चांगले वर्तन करण्याची सूचना देतात.
ऑक्टोबर २१- प्रत्यक्ष हजर राहण्याची इच्छा पुन्हा वकिलांकडे कसाबने व्यक्त केली.
ऑक्टोबर २७ - सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाचे समर्थन.
नोव्हेंबर ३०- भारतावर युद्ध लादण्याचा आरोप कसाबवर करण्यात आला नसल्याचा प्रतिवाद वकील सोलकर यांनी केला.
डिसेंबर २- कसाब पाकिस्तानहून नावेतून आला नाही. छोट्या नावेत दहाजण बसू शकत नाहीत, असा युक्तिवाद त्याचे वकिलांनी केला.
२०११
जानेवारी १७- न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवला.
फेब्रुवारी ७- मुंबई उच्च न्यायालयाने २१ फेब्रुवारी ही निकालाची तारीख निश्चित केली.
फेब्रुवारी २१- कसाबच्या फाशीचा निर्णय कायम.
जुलै २९- फाशीच्या आदेशाला कसाबचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान.
२०१२
ऑगस्ट २९- सर्वोच्च न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा कायम ठेवली.
८ नोव्हेंबर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्यात आला
२१ नोव्हेंबर - पुण्यातील येरवडा कारागृहात सकाळी साडेसात वाजता फासावर लटकविण्यात आले
Comments
- No comments found