
जिरायतीसाठी नवे कॅश क्रॉप
यशवंत यादव, पंढरपूर -
पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना अवर्षणप्रवण भागात `ड्रॅगन फ्रुट`ची लागवड वरदान ठरत आहे. यामुळे कोरडवाहू शेतीला बळ मिळून गरीब व मध्यमवर्गीय शेतक-यांच्या चेह-यावर हसू फुलणार आहे.
दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असे म्हटले जाते, की चौथे जागतिक महायुद्ध `पाणी` याच विषयावरुन होईल. भारतात एकूण लागवडीयोग्य क्षेत्रापैकी जवळजवळ 84 टक्के क्षेत्र जिरायती आहे. त्यामुळे `ड्रॅगन फ्रुट`ची लागवड हा चांगला पर्याय होऊ शकतो. काळमवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथाल शेतकरी आनंदराव जाधव यांनी केलेल्या प्रयोगावरून ही बाब अधोरेखीत झाली आहे. हे पीक जिरायती शेतीसाठी चांगले आहे. तेल्या रोगामुळे डाळिंब शेती अडचणीत आल्याने त्याला ड्रॅगन पर्याय ठरु शकते, असा त्यांना विश्वास आहे. यावर कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांनी सखोल संशोधन करावे व केंद्र-राज्य सरकारने लागवडीसाठी आर्थिक पाठबळ द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
निवडुंग (कॅकटस) प्रकारातील हे फळपिक माळरानावरही येते. उत्पादन खर्च कमी असून एका झाडापासून अनेक वर्षे फळे मिळतात. अत्यंत कमी पाणी लागते. शिवाय रोग-किडीचा प्रादुर्भाव फारच कमी होत असल्याने कीटकनाशक फवारणीचा खर्चही कमी होतो. फळांचा बहार जून-नोव्हेंबर असा सहा महिने असतो. एकरी सरासरी 18 टनांपर्यंत उत्पादन होते. फळाला दर- किलोला 100-200 रुपये मिळतो. ह्याची फुले रात्रीच उमलतात, त्यामुळे `क्वीन ऑफ नाईट` व `मून फ्लॉवर` असेही संबोधले जाते.
जाधव यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून अनेक शेतकरी येतायत. येथून लागवडीसाठी कटींग्ज नेऊन `ड्रॅगन फ्रुट`शेती करण्याचा निश्चय करीत आहेत.
Comments (1)
-
Guest (मिलिंद चनेकर)
खुपच छान उपक्रम आहे सुन्दर च