टॉप न्यूज

केळीचं गाव – कंदर!

यशवंत यादव

यशवंत यादव, कंदर, करमाळा

जळगाव किंवा खान्देशची मक्तेदारी संपवून केळीच्या लागवडीत सोलापूर जिल्ह्यातील कंदर या गावानं (ता. करमाळा) जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. हे गाव केळीची राजधानी म्हणून नावारूपास आलं आहे. इथं उसाला पर्याय म्हणून केळीचं पीक पुढं आलं आहे.

आता केळीचं पीक पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात घेतलं जातंय. इथली पीक पध्दतही बदलीय, शेतकरी उसाकडून अधिक पैसे देणाऱ्या केळीकडं वळू लागलाय. ज्या सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार म्हटलं जातं, त्याच जिल्ह्यात आता केळीचं पीक उभारी घेऊ लागलं आहे.

कंदर गावाचं संपूर्ण अर्थकारण आणि राजकारण केळीवरूनच चालतं. केळीचं गाव म्हणून या गावाचा लौकिक जगभर झाला आहे. जवळजवळ गावाच्या निम्म्या क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळी निर्यात करणाऱ्या अनेक कंपन्यानी या गावात आपलं बस्तान बसविलं आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रयोगही या गावात यशस्वी झाला आहे.

इथलं हवामान केळी पिकास पोषक असून इथली जमीनही काळी कसदार आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून इथल्या शेतकऱ्यांनी कंदरची केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवून त्याचा जागतिक ब्रॅंड निर्माण केला आहे.

महाराष्ट्र राज्याचं कृषी खातं आणि  कृषी पणन मंडळ हेही केळी उत्पादकांसाठी चांगल्या योजना राबवत असल्यानं केळीनं कंदरचा कायापालट केला आहे. 2003 मध्ये केवळ 50 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली होतं. पण आज त्यात वाढ होवून जवळजवळ 1200 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आलंय. एकरी उत्पादकता 18 टनावरून 30 टनावर आली आहे. यातून खर्च वजा करता एकरी दीड ते दोन लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळतो, हे इथल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे.

या गावातील केळी क्षेत्र वाढवण्यासाठी आणि केळींची निर्यात वाढविण्यासाठी इथल्या उच्चशिक्षित कृषी सहाय्यक अधिकारी असलेल्या अनिल कांबळे यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. झपाटलेला एक अधिकारी गावाचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो ते त्यांनी आपल्या उदाहरणावरून दाखवून दिलं आहे.

असं घेतलं निर्यातक्षम केळीचं उत्पादन 

जमीन - उत्तम निचरा होणारी 

पीएच - 6.5 ते 7.5 पर्यंत

मशागत - खोल नांगरट, कुळवाच्या पाळ्या दोनदा

केळीचं वाण - G9 (जी 9)

लागवडीसाठी - टिश्यू कल्चर रोपं

लागवड अंतर - 6X5, 7X5, 8X4 फूट

सिंचन पध्दत - ठिबक सिंचन

खत व्यवस्थापन - माती परीक्षणानुसार सरळ खतांचा वापर, ड्रीपमधून विद्राव्य खतं

कीड नियंत्रण - पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी 

रोग नियंत्रण - करपा किंवा सिगाटोका रोगाच्या नियंत्रणासाठी ‘सीओसी’ ची फवारणी करावी

निर्यातक्षम घडाचं व्यवस्थापन 

कमळफूल बाहेर पडताना कमळफुलाला संजीवकाचं इंजेक्शन दिलं जातं. यामुळं केळीच्या फण्या एकसारख्या आकाराच्या येतात. केळीला चमक येते.

कमळफूल पूर्ण उमलल्यानंतर घडावरील सर्व फुलं काढून टाकली जातात. बुरशीनाशकाच्या 3 ते 4 फवारण्या केल्या जातात.

घडावरील प्रत्येक फणीवर प्लॅस्टिक बॅग लावली जाते. त्यानंतर संपूर्ण घडावर मोठी स्कटींग बॅग लावली जाते.

यामुळं कीड रोगापासून संरक्षण होतं. फण्या आकर्षक आकाराच्या होतात. केळींना चमक प्राप्त होते. केळीचं निर्यात मूल्य वाढतं. 

काढणी पश्चात तंत्रज्ञान

घड परिपक्व झाल्यानंतर केळीची मोजमापं घेतली जातात. वरून दुस-या फणीच्या मधल्या केळीची लांबी 9 ते 11 इंच, तसंच जाडी 43 ते 46 मिमी असल्यास ती केळी निर्यातीस योग्य असतात.

घड काढल्यानंतर वजन घेऊन फण्या वेगळ्या केल्या जातात

पॅक हाऊसमध्ये फण्या आणल्यानंतर बुरशीनाशक द्रावणानं धुऊन त्या कोरड्या करून बॉक्समध्ये पॅकिंग केल्या जातात.  सर्व बॉक्स प्री कुलिंग युनिटमध्ये 13 अंश सेल्शियस तापमानाला ठेवले जातात. 

विक्री व्यवस्था

प्री कुलिंग केलेले बॉक्स परदेशात विक्रीसाठी पाठवले जातात.

 


Comments (3)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.