टॉप न्यूज

संविधानदिन उत्साहात साजरा

ब्युरो रिपोर्ट

मुंबई- आज 26 नोव्हेंबर. संविधान दिवस. राज्यात आणि देशभरात सर्वत्र हा दिवस साजरा केला जातोय.  राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आज संविधानाच्या प्रास्ताविकाचं जाहीर वाचन केलं. सर्व सरकारी ऑफिसांमध्येही सामूहिक वाचन करण्यात आलं. ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांनी रॅली काढून जनजागृती केली. तर मंत्रालयातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संविधानाच्या प्रास्तविकाचं सामूहिक वाचन केलं.

नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. सर्वात मोठी रॅली रिझर्व बँक चौक ते दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात आली. रिटायर्ड आयएएस अधिकारी ई. झे़ड. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीमध्ये 500 हून अधिक लोक सहभागी झाले. संविधान वाचनानं या रॅलीची सुरुवात झाली. रिझर्व बँक चौकाचं नामकरण संविधान चौक म्हणून करण्याची मागणी यानिमित्तानं आंबेडकरी संघटनांनी केली. काही कार्यकर्त्यांनी तर 25 तारखेच्या मध्यरात्रीच या चौकाचं नामकरण 'संविधान चौक' म्हणून केलं. 

दिल्लीत कार्यक्रम  

महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त आणि प्रधान सचिव विपीन मलिक यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यासोबत संविधानाच्या प्रास्ताविकाचं सामूहिक वाचन केलं. ही संविधानाची उद्देशिका सर्व भारतीयांनी आपल्या आपल्या मनात रुजवावी, असं आवाहन मलिक यांनी यावेळी केलं.

भारतीय संविधानातील मूलभूत गोष्टी या माणसांच्या प्रतिष्ठापूर्वक जगण्याशी आणि विकसित अस्तित्वाशी अतिशय निगडित आहेत. संविधानाची ओळख सर्वांना पटवावी यासाठी नागपूरचे तत्कालीन जिल्हा परिषदेचे सिईओ ई. झेड. खोब्रागडे यांनी 2005 मध्ये संविधान प्रास्ताविकाचे वाचन सुरुकेले. शाळांमधून प्रार्थनेच्या वेळी या वाचनाची सुरुवात झाली.  त्यांच्या या प्रयत्नामुळंच आज राज्यातील सर्वच शाळांतील जवळपास दोन कोटी मुलं-मुली दररोज प्रास्ताविकाचं वाचन करतात. 

भारतीय संविधान प्रस्तावना

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम ,

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा 

व त्याच्या प्रत्येक नागरिकांस:

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय,

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वात्यंत्र;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा 

व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 

यांचे आश्वासन देणारी बंधुता 

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत 

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित 

करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.