टॉप न्यूज

नगर, नाशिकमध्ये स्फोटक परिस्थिती

ब्युरो रिपोर्ट

अहमदनगर / औरंगाबाद – नगर जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटलाय. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध झुगारत अखेर मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्‍यात आल्यानं आंदोलक संतप्त झाले असू्न भडका कधीही उडू शकतो, अशी स्फोटक परिस्थिती सध्या आहे. नाशिकमधील नेतेमंडळींचाही पाणी सोडण्याला विरोध असू्न त्यांचीही साथ नगरकरांना मिळत आहे.

कडक पोलीस बंदोबस्‍तात बुधवारी सकाळी 9 वाजता मुळा धरणाचे दरवाजे उघडण्‍यात आले. धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्‍यात येत आहे. मुळा धरण ते जायकवाडीपर्यंतचं अंतर जवळपास 60 किलोमीटर आहे. पुढील दोन दिवसांमध्‍ये हे पाणी जायकवाडीमध्‍ये पोहोचेल, असा अंदाज आहे.

पाणी देण्यास तीव्र विरोध

पाण्याच्या प्रश्नामुळे अहमदनगर जिल्हा ढवळून निघालाय...एकीकडे मुळा धरणाचं पाणी जायकवाडीला देण्यास नगर उत्तरच्या सर्वपक्षीय नेत्यांनी कडाडून विरोध केलाय, तर दुसरीकडे जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या कर्जत, जामखेडसाठी कुकडीचं पाणी द्यावं म्हणून जोरदार आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुळा धरणातून पाण्याचं आवर्तन बुधवारी सोडण्यात आलं. त्याला विरोध करण्याकरता, शिवराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुळा धरणाच्या चारीतच जलसमाधी आंदोलन केलं. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. पाण्याचा प्रवाह जोरात येताच, हे कार्यकर्ते काही काळ वाहवले गेले. त्यांना नंतर प्रशासनानं ताब्यात घेतलं. त्याआधी काल कलेक्टर कचेरीसमोरही या कार्यकर्त्यानी धरणं आंदोलन केलं. दरम्यान, काल राहुरीत सगळ्या पक्षांच्या नेते-आंदोलकांनी रास्ता रोको करून अचानक नंतर मुळा धरणावर हल्लाबोल केला आणि यंत्रणा ताब्यात घेतली. त्यांनी चक्क धरणातून नगर जिल्ह्याच्या शेतीसाठी बळजबरीनं पाणी दोन्ही कालव्यांतून सोडून दिलं. त्यासंबंधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी नाट्यमयरीत्या कलेक्टर कचेरीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

मराठवाड्याचे नेते संतापले

अहमदनगरच्या या तीव्र विरोधामुळे मराठवाड्याचे नेते संतापले आहेत. यामुळे व्यथित झालेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ चा नारा देत स्वतंत्र मराठवाडा स्थापन करण्याची हाक दिली आहे. स्वतंत्र मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद करावी, असं त्यांनी `जयक्रांती` साप्ताहिकात नमूद केलंय. नाशिक, नगरच्या टोळीनं जायकवाडी धरणात येणारं पाणी अडवून अखंड महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. दंगल पेटवून रक्ताचे पाट वाहतील, असं म्हणणार्‍या टोळीची, मराठवाड्यानं गुलामीचं जीवन जगावं, येथील नागरिक लाचार बनावेत, अशी इच्छा असून त्यासाठी स्वतंत्र मराठवाडा स्थापन करण्यास ही मंडळी भाग पाडत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हाकेला दबक्या आवाजात मराठवाड्यातून प्रतिसाद मिळतोय.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.