टॉप न्यूज

पाण्यावरून रणकंदन

राहुल विळदकर

राहुल विळदकर

अहमदनगर – नगर जिल्हा गेले चार दिवसांपासून पाणी प्रश्नावरून धुमसतोय... जायकवाडीला मुळा धरणातून पाणी सोडायला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला, पण सरकारनं मुळातून पाणी सोडलंच. भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख यांनी रास्ता रोको करून थेट मुळा धरणावरच हल्लाबोल केला. चाकं फिरवून त्यांनी जिल्ह्यातल्या शेतीसाठी बळजबरीनं पाणी सोडून दिलं.

सगळ्यात जास्त आंदोलन गाजलं ते शिवराज्य पक्षाच्या जलसमाधीचं. शिवराज्यच्या कार्यकर्त्यांनी थेट मुळा धरणासमोरच पात्रात जलसमाधी आंदोलन केलं. कार्यकर्ते पात्रात असूनही प्रशासनानं बेधडक चाऱ्यांमधून पाणी सोडलं. पाण्याचा प्रवाह वाढला, तसे आंदोलनकर्ते वाहून जाऊ लागले. त्यांना इतरांनी वाचवलं, नाहीतर मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळं आता मुळा नदीकाठचा शेतकरी संतापलाय. मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध नाही, पण फक्त पिण्यासाठी पाणी देणार याचा काय भरवसा, असा सवाल आता विचारला जातोय. औरंगाबाद-पैठणजवळच्या मद्यनिर्मिती कारखान्यांसाठी पाणी देणार असाल, तर हा राजकारण्यांचा डाव असल्याची जळजळीत प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतायत. जायकवाडीचाही डेड स्टॉक मोठा आहे. ते पाणी सध्या का वापरत नाही, असाही उद्वेग व्यक्त होतोय.  

मुळा, भंडारदरा या नगर जिल्ह्यातल्या आणि दारणा या नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून एकूण नऊ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आलंय. हे पाणी आज प्रवरा संगम पार करून जायकवाडीकडं झेपावतंय. नदीकाठच्या सगळ्या गावांचा वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित आहे तो पाणीचोरी होऊ नये म्हणून. शेताजवळून पाणी वाहतंय, पण शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची तगमग चाललीय. बंधाऱ्यांवर पाणी अडवलं जाऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. जायकवाडीला निर्धोक पाणी जावं म्हणून प्रशासनाच्या या खटाटोपांवरूनच नगर जिल्ह्यातला संताप अजून वाढतोय. `आधी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, आता पाण्यात बुडवून मारा,` अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त होतेय. एकंदरीतच राज्याराज्यात चालणारे पाणीतंटे आता थेट प्रदेशांतर्गंत आणि जिल्हा पातळीवर उतरले आहेत.


Comments (1)

  • Guest (संजीव भोर,प्रदेश उपाध्यक्ष शिवराज्य पक्ष महाराष्ट्र.)

    औरंगाबाद जिल्ह्यातील बियर,मद्य,कोल्ड्रिंक्स बनविणाऱ्या कंपन्यांसाठी अहमदनगर जिल्हा शिवराज्य पक्षाचा नाशिक,नगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्यास विरोध--संजीव भोर,प्रदेश उपाध्यक्ष शिवराज्य पक्ष महाराष्ट्र.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.