टॉप न्यूज

'लोअर-दुधना'च्या चौकशीची मागणी

ब्युरो रिपोर्ट

परभणीकर बघतायत 32 वर्षांपासून वाट 

परभणी -  जिल्ह्यातील सेलू, जिंतूर आणि परभणी या 3 तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारं लोअर-दुधना धरणाचं काम गेल्या 32 वर्षांपासून रखडलंय. यावर आतापर्यंत तब्बल 1100 कोटी रुपये खर्च झाले असून आणखी 800 कोटी रुपये लागणार आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय जाधव यांनी केलीय. तर घशाला कोरड पडलेले परभणीकर काहीही करून तातडीनं धरणाचं काम पूर्ण करण्याची मागणी करतायत. राज्यभरातील अपूर्ण असलेल्या प्रकल्पांची थोड्याफार फरकानं अशीच स्थिती आहे. 

परभणीच्या सैलू तालुक्यातील लोअर-दुधना प्रकल्पाला 1979 साली प्रशासकीय मान्यता मिळाली.  त्यावेळी याचं बजेट होत केवळ 28 कोटी. त्यानंतर वाढीव खर्च गृहीत धरून 1992 साली 47 कोटी मिळाले.   त्यानंतर आजपर्यंत प्रकल्पाची किंमत वाढत वाढत तब्बल 1800 कोटींवर गेलीय. आतापर्यंत 1100 कोटी रुपये खर्चही झालेत.  परंतु 2011 मध्ये पूर्ण होणारा हा प्रकल्प अजून अपूर्णच आहे. तो पूर्ण होण्यासाठी आणखी 800 कोटी रुपयांची आवश्यकता असून 2015 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचं या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिंपणे सांगत आहेत.

प्रकल्प रखडल्यामुळे 1992साली लोअर- दुधना संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या संघर्ष समितीनं वेळोवेळी आंदोलनं करून पाठपुरावा केल्यानं प्रकल्प इथपर्यंत आलाय. परंतु निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि उदासीन व भ्रष्ट अधिकारी यांच्यापुढं आता आम्ही हात टेकलेत, असं संघर्ष समितीचे निमंत्रक राजेंद्र वाईकर यांनी सांगितलं.

प्रकल्पासाठी मागील 32 वर्षांत परिसरातील 17 ते 18 गावांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनही काही गावं मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे पाणी येईल आणि हा भाग सुजलाम सुफलाम होईल, हे स्वप्न अधुरं राहिलंय. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.