टॉप न्यूज

साताऱ्यात जागल्या लहुजींच्या आठवणी

शशिकांत कोरे

क्रांतिगुरू लहुजी उस्तादांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

सातारा - आद्य क्रांतिगुरू लहुजी उस्ताद यांच्या 218व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सातारा शहरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लहुजी उस्ताद यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. लहुजी सेनेच्या वतीनं लोकवर्गणीतून हा उत्सव साजरा केला गेला होता. स्वातंत्र्याच्या क्रांतीचा इतिहास आणि ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणारे क्रांतिगुरू लहुजी उस्ताद यांचे विचार तरुण पिढीमध्ये जागृत ठेवण्याचं काम लहुजी शक्ती सेना राज्यभर करीत आहे.

पुरंदर जिल्ह्यातील पेठ या खेडेगावी 1811 मध्ये लहुजी रंगोजी साळवे यांचा जन्म झाला. देशाला स्वातंत्र्य मिळावं या हेतूनं प्रेरित होऊन 25 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी खडकीत प्रतिज्ञा केली, `जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. जोपर्यंत या देशातून ब्रिटिश हद्दपार होत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही.` ही प्रतिज्ञा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत निभावलीही. यासाठी लहुजींनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. त्यासाठी पुण्यात तालीम स्थापन केली आणि या तालमीतून त्यांनी क्रांतिवीर तयार केले.

महात्मा जोतिबा फुले यांनी दलित आणि उपेक्षित समाजासाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. तेव्हा त्या शाळेमध्ये मुलं पाठवण्यासाठी लहुजींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. देशामध्ये पुरोगामी विचाराचे समाजसुधारक घडवण्याचं कामही त्यांनी केलं. या लहुजी वस्तादांचं कार्य आणि विचार जागृत ठेवण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या सामान्य लोकांनी लोकवर्गणीतून हा उत्सव साजरा केला. यावेळी `जय लहुजी`च्या घोषणा देत शहरातून मोटरसायकलवर रॅली काढली गेली. तर सायंकाळी क्रांतिगुरू लहुजी उस्ताद यांच्या पुतळ्यावर हेलिकॅप्टरनं पुष्पवृष्टी करत पाच फेऱ्या मारल्या.

या उत्सवाच्या वेळी सामान्य जनतेचा ऊर अभिमानानं भरून आला होता. यावेळी शाहीर तानाजी सकट यांनी पोवाडा गाऊन स्वातंत्र्यापूर्वीचा काळ उभा केला. या समारंभाच्या वेळी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं सरकारनं मातंग समाजाला आरक्षण जाहीर करावं, अशी मागणी करण्यात आली.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.