टॉप न्यूज

राणेंचा गाडगीळ समितीवर 'प्रहार'

ब्युरो रिपोर्ट

ठाणे – पश्चिम घाट पर्यावरणासंबंधी माधवराव गाडगीळ समितीनं दिलेला अहवाल स्वीकारल्यास तिथं कोणतेही प्रक्रिया उद्योग उभे करता येणार नाहीत. या अहवालामुळं कोकणचा विकासच खुंटणार आहे. त्यामुळं कोकणच्या विकासाआड कोणी येत असेल, तर त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहा, असं आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठाणे इथं केलं.

तसंच 'मी चर्चेला तयार आहे. त्यामुळं एकदा होऊन जाऊ द्या', असं आव्हानही त्यांनी गाडगीळांना दिलंय.

कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या ‘ग्लोबल कोकण पर्यटन परिषदे’चा समारोप करताना  राणेंनी ही परखड आपली मतं मांडली. गाडगीळ अहवालाच्या पान क्रमांक ७४-७५ वर ज्या शिफारसी लागू केल्या आहेत, त्यामुळं कोकणी माणसाच्या जगण्याच्या साधनावरच घाला घातला जाणार आहे. या शिफारसी स्वीकारल्या तर मासेमारी, हॉटेलिंग, हॉस्पिटल उभारणी, काजूप्रक्रिया उद्योगांवर बंदी येणार आहे. कोकणातलं शेतीचं दरडोई प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळं शेतक-यांना केवळ शेतीवर उदरनिर्वाह करणं अवघड आहे, हेही त्यांनी यावेळी नमूद केलं.

विकासाला साथ द्या

कोकणाकडं पूर्वी वेगळ्या दृष्टीने पाहिलं जायचं. मात्र आता तशी परिस्थिती नाही. तिथं झपाटय़ाने विकास होत आहे. विमानतळ, बंदर विकास, विजयदुर्ग किल्ल्याचा विकास हा जागतिक दर्जाचा होत आहे. त्यामुळे कोकणाकडं मोठय़ा प्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहेत. विकासाच्या या प्रक्रियेला साथ द्या, असं आवाहनही राणे यांनी यावेळी केलं. 

गाडगीळांना आव्हान

गाडगीळ अहवालाच्या शिफारसी स्वीकारल्यास कोकणचा विकास खुंटेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर गाडगीळ म्हणतात, त्यांनी अहवालच वाचलेला नाही. अहवाल न वाचता मुख्यमंत्री चर्चेला येतील काय, असा सवाल करून नारायण राणे म्हणाले, ‘हा अहवाल कोकणच्या विकासाला कसा घातक आहे, याबाबत अहवाल समोर ठेवून गाडगीळ यांच्याशी चर्चा करण्याची आपली तयारी आहे.’ 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.