टॉप न्यूज

वस्त्रोद्योग मंत्र्यांचं आश्वासन

ब्युरो रिपोर्ट

नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्तावित इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारकडं लवकरच हस्तांतरीत करण्यात येईल, त्याबाबत 6 डिसेंबरपूर्वी अधिकृत घोषणा केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी दिलंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाला त्यांनी हे आश्वासन दिलं.

गेल्या वर्षीच सर्वपक्षीय शिष्टमंडळाला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी याबाबत आश्वासन दिलं होतं, असंही शर्मा यांनी स्पष्ट केलं.

या जागेच्या हस्तांतरणापूर्वी सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्य सचिव, अन्य अधिकारी या समितीचे सदस्य आहेत.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि माझी भेट घेऊन सतत या बाबीचा पाठपुरावा केला, असेही ते म्हणाले.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ही जमीन सर्वप्रथम खाजगी मालकीची होती. त्यानंतर 1974च्या दरम्यान ही जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आली. या जमिनीचा वापर उद्योगासाठी करता येईल, अशी अट होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून राज्य सरकार स्तरावरचे नियम शिथील केले. त्यानंतर केंद्रस्तरावरच्या तांत्रिक बाबींविषयी तोडगा कसा काढावा, असा प्रश्न होता. परंतु एक-एक करत जवळपास सर्व तांत्रिक प्रश्न सोडवण्यात यश मिळाले आहे, असं शर्मा यांनी नमूद केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी म्हणजे 6 डिसेंबरपूर्वी या जागेबाबत घोषणा होईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर प्राधिकरण स्थापन करुन तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक उभारण्यात येईल, असंही ते म्हणाले.

या शिष्टमंडळात केंद्रीयमंत्री मिलींद देवरा, राज्यमंत्री प्रतिक पाटील, खासदार विलास मुत्तेमवार, एकनाथ गायकवाड, माणिकराव गावित, दत्ता मेघे, भालचंद्र मुणगेकर, विजय दर्डा, भास्करराव पाटील खतगावकर, अविनाश पांडे, प्रिया दत्त, जयवंत आवळे, सुरेश टावरे, हुसेन दलवाई, बळीराम जाधव, मारोतराव कोवासे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, आदींचा समावेश होता. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.