टॉप न्यूज

विरोधी प्रस्ताव बहुमतानं फेटाळला

ब्युरो रिपोर्ट

नवी दिल्ली - बहुचर्चित थेट परकी गुंतवणुकीचा अर्थात, एफडीआयचा प्रस्ताव लोकसभेनं अखेर मंजूर केलाय. प्रस्तावाच्या विरोधात 218 मतं पडली. तर प्रस्तावाच्या बाजूनं 253 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या सभात्यागानं सरकारचा या मुद्द्यावर विजय झाल्याचं स्पष्ट झालंय. मतदानापूर्वीच दोन्ही पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला होता. 

आता कसोटी राज्यसभेत

लोकसभेत जरी बहुमत मिळालं असलं तरी राज्यसभेत सरकारकडं पुरेसं बहुमत नाही. त्यामुळं राज्यसभेत सरकारची कसोटी लागणार आहे. 

मंगळवारी चर्चेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी विरोधात मतदान केल्यास सरकारला कोणताही धोका नाही, केवळ "एफडीआय'चा निर्णय रद्द होईल, असा खुलासा करून प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन प्रादेशिक पक्षांना केलं होतं. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे स्पष्ट झालंय.  त्यामुळं मतदानात संख्याबळाचं पारडं सरकारच्या बाजूनं झुकलं.

द्रमुकनं सुरुवातीपासूनच प्रस्तावाच्या बाजूनं कौल दिला होता. त्यामुळं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष कोणती भूमिका घेणार, याला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका कालच स्पष्ट केली होती. अखेर मतदानाच्या वेळी त्यांनी सभात्याग केल्यानं सरकारचं काम सोपं झालं. 

सरकारची खरी परीक्षा आता राज्यसभेत होणार आहे. कारण राज्यसभेत सरकारकडं बहुमत नाही. उद्या राज्यसभेत यावर चर्चा होणार आहे.

दरम्यान , ''वॉलमार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या देशाची सेवा करण्यासाठी नव्हे तर कमाई करण्यासाठी येत आहेत. यामुळं देशाचं विभाजन होईल. देशाच्या बाजाराला पाच हजार वर्षांची परंपरा आहे. हा बाजारच नष्ट होऊन त्यावर अवलंबून असणारे श्रमिक, कष्टकरी, उघड्यावर येतील. देशाचा जाडीपी वाढला, तो याच वर्गामुळं. एफडीआयमुळं या वर्गाचं अस्तित्वच नष्ट होईल.  मग देश काय फक्त 15 टक्के लोकांसाठीचं चालवणार काय? असा सवाल जनता दल यु्नायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी चर्चेत भाग घेताना उपस्थित केला. एफडीआयवर तटस्थ भूमिका ठेवणाऱ्या पक्षांना इतिहास कधी माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

''एफडीआय़मुळे शेतकरी आणि  छोट्या किराणा दूकानदांराना फायदा होईल,'' हा सरकारचा दावा माकपचे वासुदेव आचार्य यांनी खोडून काढला. या निर्णयामुळे सर्वात जास्त तोटा शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांचा होईल. एफडीआयमुळं रोजगार निर्मितीत वाढ होत असेल, नवं तंत्रज्ञान येत असेल तर डावे पक्ष त्याचं समर्थन करण्यास तयार आहे. मात्र इथं नेमकं उलट होत असल्यानं आम्ही त्याला विरोध करत आहोत, असंही आचार्य यांनी नमूद केलं.  

लालूप्रसाद यादव यांच्या भाषणादरम्यान अपेक्षेप्रमाणं सभागृहात गोंधळ झाला. अखेर 13 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर वक्तव्य मागं घेत असल्याचं लालूप्रसाद यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर चर्चा सुरळीत सुरू झाली. 

मतदानापूर्वीही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून एफडीआयवर जोरदार टीका केली.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.