टॉप न्यूज

भारतभरातून लाखो अनुयायांची उपस्थिती

ब्युरो रिपोर्ट

मुंबई – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 56व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळलाय. पंचशिलेचे झेंडे, फिती यामुळे चैत्यभूमी परिसराला निळाईची भरती आली असून 'जय भीम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमू्न गेलाय. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन हस्तांतरित करण्याची घोषणा कालच झाल्यानं चैत्यभूमीवर डोकं टेकताना भीमसैनिकांच्या भावना दाटून येतायत.

यंदाही गर्दीचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज आहे.  

खेड्यापाड्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी त्यांच्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्यात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केलं. 

पुस्तक स्टॉलवर झुंबड

तीन दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे जथ्थे चैत्यभूमीवर धडकत आहेत. काल सायंकाळपासूनच चैत्यभूमीकडं जाणारे सर्व रस्ते आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीनं भरून वाहत होते. बाबासाहेबांचा जयजयकार करीत, रांगेनं दर्शन घेऊन ही मंडळी प्रतिमा, तसंच आंबेडकरी चळवळीच्या गीतांच्या कॅसेट्सची खरेदी करीत आहेत. पुस्तकांचे सुमारे साडेतीनशे स्टॉल्स असून खरेदीसाठी तिथं झुंबड उडाल्याचं चित्र आहे.

मुंबई महापालिकेनं पाणी, निवारा, शौचालयं, स्नानगृहं आदी व्यवस्था उपलब्ध केल्या आहेत. सरकारी रुग्णालयांची आरोग्य पथकं रुग्णांवर उपचार करीत आहेत. सेवाभावी संस्था-संघटना अन्नदान, पाणीवाटप करीत आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. 

भीमसैनिक इंदू मिलकडे

इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याची घोषणा झाल्यानं अभिवादन केल्यानंतर सर्वांचीच पावलं इंदू मिलकडे वळत आहेत. आपल्या दैवताचं स्मारक कसं असेल, याची आता सर्वांना उत्सुकता आहे. 

स्मारकाचा आराखडा लवकरच

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंदू मिलची जागा देण्याचं आश्वासन काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलं होत. ते आम्ही पाळलं असून स्मारकाचा आराखडा लवकरच तयार केला जाईल,   असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही मार्गी लावला जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.