टॉप न्यूज

राजभवनावर झाला शपथविधी

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेले अजित पवार यांचा आज मंत्रिमंडळात तेवढ्याच तडकाफडकीनं समावेश झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये सकाळी झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे मंत्री तसंच पवार यांचं कुटुंबीय सोहळ्याला उपस्थित होतं.

हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अजित पवार यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होत असल्यानं राष्ट्रवादीत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

25 सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर आता 'दूध का दूध आणि पानी का पानी' होऊन जाऊ दे, असं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही विधिमंडळ पक्षाचं नेतेपद अजित पवार यांच्याकडं कायम ठेवण्यात आलं होतं. सिंचन श्‍वेतपत्रिका 30 नोव्हेंबरला जाहीर झाली त्याच वेळी हिवाळी अधिवेशनापूर्वीच अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं सूचित झालं होतं. सुमारे अडीच महिन्यांनंतर आज त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन झालं.  

सिंचनाची श्वेतपत्रिका नि:पक्षपातीपणं निघावी, या हेतूनं आपण राजीनामा दिला होता. सिंचन प्रकल्पांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचं तसंच जिल्हावार सिंचन वाढल्याचं आता स्पष्ट झालंय. आरोप करणं हे विरोधकांचं कामच आहे. त्यामुळं त्यांच्याकडं लक्ष न देता मी माझं काम करीत राहीन, असं पवार यांनी शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.  


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.