टॉप न्यूज

पुन्हा 'दादा'...!

रणधीर कांबळे

रणधीर कांबळे

मुंबई - अखेर अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात परतलेत. खरं तर अजितदादांच्या एंट्रीमुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढणं साहजिकच आहे. कारण दादा मंत्री असणं खरं तर पक्षाच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.

दादांनीही सांगितलंय की, मंत्रिमंडळात त्यांनी परतावं म्हणून कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर खूप दबाव होता. पण खरं तर दादांनाच मंत्रिमंडळातून बाहेर असण्यातला फरक प्रकर्षानं जाणवला असेल. तो सर्वच अर्थानं... विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी तीन दिवस दादांनी पुन्हा येणं यालाही काही अर्थ आहे. खरं तर त्यांच्या पुनरागमनाची बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच एनसीपी प्रदेशाध्यक्ष कालपर्यंत दादांच्या मंत्रिमंडळात प्रवेश करण्याच्या बातम्यांना अफवा असल्याचं सांगण्याची कसरत करत होते. सिंचन श्वेतपत्रिका एवढ्या युद्धपातळीवर मंत्रिमंडळाला सादर झाली त्यातच दादांचं पुनरागमन होत होतं, हे स्पष्ट झालं होतं. पण आता काही अपशकुन नवा मुद्दा उपस्थित करून होऊ नयेत, याच्याच धडपडीत एनसीपीचे नेते होते. खरं तर दादांचं पुनरागमन व्हावं यासाठी काही नेत्यांनी गेल्या आठवड्यात सिंचन श्वेतपत्रिका सादर होण्याअगोदरपासूनच वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न होता. पण त्यातही हेच जाणवत होतं की, खरंच त्यासाठी जोर लावावा, की न लावावा. याबाबत नेत्यांच्या मनात संभ्रम होता. कारण त्यासाठी जास्त आग्रह दिसला तर त्याचा फायदा होईल की तोटा याबाबत स्पष्ट झालं नव्हतं. कारण दादांच्या राजीनामानाट्यामागं मोठे साहेब आहेत, अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या. त्या कुणी ठामपणानं नाकारल्या गेल्या नव्हत्या. शिवाय पक्षातल्या अनेक बड्या नेत्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटली होती. ते नेतेही कुठेच दादांच्या पुनरागमनासाठी आग्रही होते, असं काही चित्र दिसत नव्हतं.

सिंचन खात्यातल्या अनेक टेंडरबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. त्याबाबत आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्याची उत्तरं श्वेतपत्रिकेत दिली नाहीत त्याचं काय, असाही आता प्रश्न उपस्थित होतोय. सिंचन खात्यातल्या भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात याचिका आहे, तिचा निकाल अद्याप आला नाही, अशा वेळी सिंचन खात्यातल्या भ्रष्टाचाराच्या निमित्तानं राजीनामा खरंच दिला गेला होता, तर मग न्यायालयाच्या निकालाची वाट का बघितली गेली नाही, हाही प्रश्न आता उपस्थित केला जाईल.

दादांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश होताना राष्ट्रवादी-काँग्रेसमधल्या इतर खात्यांतल्या जागाही भरल्या जातील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीतल्या मंत्रिमंडळाबाहेर असणाऱ्या नेत्यांना होती. पण ती आता फोल ठरलीय. खरं तर या बाहेर असणाऱ्या नेत्यांनी दादांच्या पुनर्प्रवेशासाठी जोर लावला होता त्याला हेही एक कारण होतं, हेही लपून राहिलं नाही. कारण हे नेते त्यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची छुपी चर्चाही त्यानिमित्तानं करत होते.

दादा कुठल्याही खात्याचा कारभार अधिवेशनादरम्यान स्वीकारणार नाहीत, अशी माहिती दिली जात होती, जेणेकरून विरोधकांचा रोख दादांच्या विरोधी राहू नये. खरं तर दादांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेनं एवढे आरोप झालेला नेता राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रभर कसा फिरू शकतो, अशी त्यांना टार्गेट करण्याची रणनीती आखली गेली होती. पण त्यानंतर बाळासाहेबांच्या तब्येतीमुळं आणि निधनामुळं शिवसेना शोकग्रस्त होती. आता अधिवेशनादरम्यान शिवसेना किती आक्रमक राहणार आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

पण सध्या तरी अजितदादांनी पुन्हा एंट्री करून आपण आपली स्टाईल सो़डलेली नाही, हाच संदेश दिलाय.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.