
श्री. ना. पेंडसे नगरी, दापोली-
कोकण मराठी साहित्य परिषदेचं १४वं कोकण मराठी साहित्य संमेलन दापोलीत सुरू झालंय. इथल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात उभ्या राहिलेल्या श्री. ना. पेंडसे नगरीत हा तीन दिवसांचा साहित्यिक सोहळा सुरू झालाय. विख्यात कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला हे संमेलन समर्पित करण्यात आलंय.
संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री. ना. पेंडसेनगरी पर्यंत या दिंडीने प्रवास केला. या ग्रंथ दिंडी दरम्यान महिलांच्या लेझीम पथकानं लक्ष वेधून घेतलं. बँड पथकाच्या तालावर ताल धरत नामवंत साहित्यिकांनी या दिंडीत उत्साहानं सहभाग घेतला. यावेळी कोकणातल्या प्रसिद्ध काटखेळानं विशेष दाद मिळवली. संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर यांनी या लोककलाकारांचं कौतुक केलं.
या संमेलनात चर्चा, परिसंवाद, कवी संमेलने, कलाकारांच्या मुलाखती अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
कोमसापने श्री.ना. पेंडसे स्मृती कादंबरी स्पर्धा आयोजित केली असून सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी पंधरा हजार रुपयांचा पुरस्कार या संमेलनात देण्यात येईल. पुरस्कार समारंभाला जोडून 'मराठी कादंबरीतील समकालीन समाज वास्तव' या विषयावर डॉ. मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. विश्वास पाटील, रामदास फुटाणे, वामन होवाळ, फैय्याज आदी नामवंत साहित्यिक आणि कलावंतांची मांदियाळी संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे.
Comments
- No comments found