टॉप न्यूज

काव्यहोत्रानं गाजला संमेलनाचा दुसरा दिवस

मुश्ताक खान

रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस संपला तो मान्यवर कवींच्या काव्यमैफलीनं. तसंच आजचा दुसरा दिवस सुरू झाला तो नवोदित कवींच्या काव्यहोत्रानं.

''छातीत फुले फुलण्याची 

मन वाऱ्यावर झुलण्याची

दिली वेळ निराळी होती

ही वेळ निराळी आहे''

किंवा 

''ते दिवस आता कुठे 

जेव्हा फुले बोलायची

दूर ती गेली तरीही 

सावली भेटायची''

यांसारख्या अरुण म्हात्रेंसारख्या नामवंत कवींच्या ओळी मनात साठवून रसिक घराकडं परतले आणि आज सकाळपासून पुन्हा नवीन, दमदार, तसंच आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कवितांनी तृप्त झाले. सकाळी दहापासून धगधगणारं काव्यहोत्र सूर्य कलंडताना शांत झालं. 

'पावसाच्या थेंबांनी 

साठली गोडी स्पर्शाची 

मंद सरींनी अंगही भिजले

भिजली दोर हृदयाची'

यासारख्या मनावर मोरपिस फिरवणाऱ्या कविता आणि रसिकांची उत्स्फूर्तता हेचं याचं वैशिष्ट्य होतं. याशिवाय रसिकांकडून लेखी मतदान घेऊन प्रत्येक तासाला एक मानकरी कवी निवडून त्यांचा सत्कार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला.

साहित्य संमेलन फक्त तुमचं नाही तर आमचंही, असं हक्कानं सांगत बाल कलाकारांनीही आपली विशेष दखल सर्वांना घ्यायला लावली. 'बाल धम्माल' या कार्यक्रमांतर्गत फ्रेंडशिप दापोलीच्या बाल कलाकारांनी आपली कला सादर केली. तर दुसरीकडं 'सप्तसूर माझे' या खास कार्यक्रमात अलवारपणं अनेक गोष्टी उलगडून सांगणाऱ्या अशोक पत्कींशी सुसंवाद साधला. 

'मराठी भाषेतील शिक्षण–सद्यस्थितीची आव्हाने' या विषयावरचं चर्चासत्रही चांगलंच गाजलं. पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे अनेक पत्रकार यानिमित्तानं आपल्या गाजलेल्या बातम्यांचे अनुभव घेऊन अवतरले ते याच साहित्य संमेलनात...  

गाईड हद्दपार करा...

काल शुक्रवारी पहिल्या दिवशी उद्घाटन कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकरांनी चांगलीच रंगत आणली. महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. पत्रलेखनासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याचबरोबर गाईड ही संकल्पना हद्दपार करणं गरजेचं आहे, असं आवाहन नायगावकर यांनी केलं. नेहमीप्रमाणं आपल्या खुमासदार शैलीत कोपरखळ्या मारत नायगावकरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 

आज इथे होतो उद्या नसू कदाचित

पण काव्यगंध दरवळत राहील मनाच्या मातीत...

आजचा दिवस संपताना अशीच सर्वांची अवस्था होती.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.